मुंबई, 08 नोव्हेंबर : सोलापूर जिल्ह्यात एकरकमी एफआरपीसाठी जोरदार आंदोलन सुरू आहे. मागच्या काही दिवसांपासून शेतकरी आणि कारखानदार यांच्यात संघर्ष पहायला मिळत आहे. या आंदोलनाची तीव्रता सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात जोरदार आहे. याचबरोबर पंढरपूर तालुक्यातील कारखान्यांच्या निवडणूका सुरू असल्याने कारखानदार काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून असताना खासदार धनंजय महाडिक यांनी नवी खेळी खेळत वातावरणात रंगत आणली आहे.
खासदार धनंजय महाडिक यांच्या भिमा कारखानाची निवडणूक सुरू आहे. पंढरपूर तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीत चुरस आल्याने धनंजय महाडिक यानी नवी राजकीय खेळी खेळली आहे. आमच्या कारखान्याच्या काट्यात एक किलोचा जरी फरक पडला तर एक लाखाचे बक्षीस देऊ, असे जाहीर आव्हान कारखान्याचे अध्यक्ष खासदार धनंजय महाडिक यांनी माध्यमांना माहिती दिली. यामुळे त्यांनी निवडणूकीच्या तोंडावर घेतलेल्या निर्णयामुळे जोरदार चर्चा रंगली आहे.
हे ही वाचा : ‘पातळी खूप खाली चालली’, फडणवीसांनी सत्तारांची केली कानउघडणी, शिंदेंकडेही केली तक्रार
एकरकमी एफआरपी आणि वजनकाटे ऑनलाईन करा यावर माजी खासदार राजू शेट्टी यांनी एल्गार पुकारला आहे. याच मुद्द्यावर राजू शेट्टी यांनी पुण्यात भव्य मोर्चा काढल्याने कारखानदार चांगलेच धास्तावले होते. हाच धागा पकडत खासदार धनंजय महाडिक यांनी वजनकाट्याबाबत जाहीर आव्हान दिल्याने जोरदार चर्चा रंगली आहे.
कोणत्याही शेतकऱ्याने कोणत्याही काट्यावर वजन चेक करुन भीमा कारखान्यावर आणावा आणि आमच्या काट्यावर एक किलो जरी वजन कमी भरले तर एक लाखाचे बक्षीस देऊ ही भूमिका शेतकरी सभासदांना आकर्षीत करण्याची चांगली तयारी असल्याचे बोलले जात आहे.
गेल्या दहा वर्षांपासून या कारखान्यावर खासदार धनंजय महाडिक यांची सत्ता असून यंदाही भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना अशा सर्वच पक्षांचे नेते महाडिक यांच्या स्टेजवर आल्याने ही निवडणूक एकतर्फी होणार असे चित्र आहे. धनंजय महाडिक यांच्यासाठी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे हेही आपल्या खास शैलीत सभा गाजवत आहेत. चोख वजनकाटा, ऊसबिले आणि जाहीर केलेला 2600 रुपयांच्या भावामुळे खासदार महाडिक यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
हे ही वाचा : श्रीकांत शिंदेंचा आदित्य ठाकरेंच्या युवासेनेत सर्जिकल स्ट्राईक, विदर्भात 150 युवासैनिक फोडले
धनंजय महाडिक यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील मैदानात उतरले असून आता भाजपचा परिचारक गट देखील राष्ट्रवादीच्या मदतीला धावल्याने या निवडणुकीतील रंगात वाढत चालली आहे. दोन्ही गटांकडून एकमेकांवर अतिशय बोचऱ्या भाषेत टीका सुरु असल्याने परिसरातील वातावरण देखील तणावपूर्ण बनले आहे. या निवडणुकीत सुरुवातीला परिचारक तटस्थ भूमिकेत दिसत होते. भीमा कारखान्यावर परिचारक यांचीही मोठी ताकद असल्याने परिचारिकांच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिले होते.