मुंबई, 24 सप्टेंबर : महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्य सरकार पालकमंत्र्यांची यादी जाहीर कधी करणार? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तब्बल सहा जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यापाठोपाठ भाजप नेते गिरीश महाजन यांना धुळे,लातूर, नांदेड या तीन जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळातील विस्तारात भाजपच्या वाटेला महत्त्वाची खाती आली होती. गृह आणि अर्थ खातं भाजपने घेतलं होतं. विशेष म्हणजे देवेद्र फडणवीस यांनी स्वत:कडे ही खाती ठेवली होती. याशिवाय गृहनिर्माण, ऊर्जा, जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास ही सर्व महत्त्वाची खाती देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेली होती. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खातं ह महत्त्वाचं खातं जाहीर करण्यात आलं होतं. त्यानंतर आता पालकमंत्र्यांच्या यादीतही देवेंद्र फडणवीस यांच्याचकडे जास्त जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. पालकमंत्र्यांची यादी पुढीलप्रमाणे: राधाकृष्ण विखे पाटील - अहमदनगर, सोलापूर, सुधीर मुनगंटीवार - चंद्रपूर,गोंदिया, चंद्रकांत पाटील- पुणे विजयकुमार गावित - नंदुरबार, गिरीश महाजन - धुळे,लातूर, नांदेड, गुलाबराव पाटील - बुलढाणा, जळगाव दादा भुसे- नाशिक, संजय राठोड - यवतमाळ, वाशिम, सुरेश खाडे - सांगली, संदिपान भुमरे - औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) उदय सामंत - रत्नागिरी, रायगड तानाजी सावंत-परभणी, उस्मानाबाद (धाराशिव) रवींद्र चव्हाण - पालघर, सिंधुदुर्ग, अब्दुल सत्तार- हिंगोली, दीपक केसरकर - मुंबई शहर, कोल्हापूर, अतुल सावे - जालना, बीड शंभूराज देसाई - सातारा, ठाणे, मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर ( ‘तुमचा धर्म घ्या आणि पाकिस्तानात चालते व्हा’, राज ठाकरे भडकले ) पालकमंत्र्यांची ही यादी तात्पुरती? राज्य सरकारचा दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही. राज्यात सत्तांतर होवून तीन महिने झाले आहेत. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होईल? याकडे अनेकांचं लक्ष आहे. राज्यात दुसऱ्या टप्प्यातील विस्तार बाकी होताच पण जिल्ह्यानिहाय पालकमंत्र्यांची देखील यादी जाहीर झालेली नव्हती. त्यामुळे विरोधकांकडून राज्य सरकारवर वारंवार टीका केली जात होती. पालकमंत्री हा जिल्ह्याचा प्रमुख असतो. जिल्ह्यातील सर्व विकासकामांना निधी मंजूर करण्यापासून ते अनेक महत्त्वाच्या कामांसाठी पालकमंत्र्याची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे सरकार स्थापन होवून तीन महिने झाले तरी पालकमंत्री कधी घोषित होतील? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. अखेर पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली आहे. ही यादी पुढच्या अडीच वर्षांसाठी जशी आहे तशीच राहण्याची शक्यता कमी आहे. कारण दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार जाहीर झाल्यानंतर नव्या मंत्र्यांनादेखील काही जिल्ह्यांची पालकमंत्रीपदाची जबाबदारी मिळण्याती शक्यता आहे.