मुंबई, 02 डिसेंबर : राज्यात निवडणुकीनंतर रंगलेल्या सत्ता संघर्षात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करून 80 तासात केंद्राचे 40 हजार कोटी रुपये वाचवल्याचा दावा भाजप खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी केला. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांना 5 हजार 380 कोटी रुपयांची अतिरिक्त मदत देण्याव्यतिरिक्त इतर कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. अनंत कुमार हेगडे यांनी म्हटलं होतं की, तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रात आमचा माणूस 80 तासांसाठी मुख्यमंत्री झाला. त्यानंतर फडणवीस यांनी राजीनामा दिली. आमच्याकडे बहुमत नाही हे आम्हाला माहिती नव्हतं का? तरीही ते मुख्यमंत्री का झाले? हे सर्व नाटक त्यांनी का केलं? असे प्रश्न विचारले जात आहेत.
फडणवीस यांनी अजित पवार यांच्या पाठिंब्याने शपथ घेतली तेव्हा मुख्यमंत्र्यांकडे केंद्राचा 40 हजार कोटींचा निधी होता. जर काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना सत्तेत आले असते तर त्यांनी 40 हजार कोटी रुपयांचा गैरवापर केला असता. त्यामुळे मुख्यमंत्रिपदावर येऊन त्यांनी केंद्राचा निधी परत पाठवल्याचं खळबळजनक वक्तव्य अनंत कुमार हेगडे यांनी केलं.
अनंत कुमार हेगडे एवढंच वक्तव्य करून थांबले नाही तर ही योजना भाजपने याआधीच केली होती. जे घडलं ते सर्व पुर्वनियोजित होतं. त्यानुसार फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर 15 तासात 40 हजार कोटी रुपये केंद्राला परत पाठवले आणि केंद्र सरकारचे पैसे वाचवले असंही ते म्हणाले. आता यावरून फडणवीसांवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही टीका केली आहे. त्यांनी ट्विटरवरून म्हटलं की, फणडवीसांनी 40 हजार कोटींसाठी शपथविधीचं नाटक केलं असेल तर ही महाराष्ट्राशी गद्दारी आहे.आज सकाळीसुद्धा संजय राऊत यांनी ट्विटरवर पोस्ट केली होती. त्यात म्हटलं होतं की, जिनके घर शीशे के होते हैं, वो दुसरों के घर पर पत्थर फेंका नहीं करते|
राज्यात सर्वाधिक जागा जिंकूनही युती तुटल्याने भाजपला सत्तेपासून दूर रहावं लागलं. राष्ट्रपती राजवट लागू केल्यानंतर मध्यरात्री ती उठवण्यात आली आणि अजित पवारांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापनेचा दावा करून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यंमंत्रिपदाची शपथ घेतली. शेवटी अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानं फडणवीस यांचे तीन दिवसांचे सरकार कोसळले आणि त्यानंतर महाविकास आघाडीने सरकार स्थापन करत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केलं.