औरंगाबाद, 17 मे : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मुंबई, पुणे पाठोपाठ आता औरंगाबाद शहरात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1000 टप्पा गाठणार अशी भीती वर्तवली जात आहे. तर मागील 14 तासात 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. औरंगाबाद शहरात आज सकाळी 57 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 958 वर पोहोचली आहे. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. तसंच शासकीय व वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) मागील 14 तासांमध्ये दोन महिला आणि एक पुरूष अशा तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे आतापर्यंत 29 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. **हेही वाचा -** गुजरातमध्ये पोलिसांवर तुफान दगडफेक, जमावाला पांगवण्यासाठी अश्रू धुराचा मारा कोरोनाबाधित असलेल्या 35 वर्षीय महिलेचा आज सकाळी सहा वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसंच संजय नगरातील 52 वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा 16 मे रोजी सायंकाळी 7 वाजून 45 मिनिटांनी मृत्यू झाला. त्यांना उच्च रक्तदाब, दम्याचा त्रासही होता. तर जलाल कॉलनी येथील 32 वर्षीय पुरूष रुग्णाचा 16 मे रोजी रात्री 9 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला.
शहरात आज 57 कोरोनाबाधित रुग्ण आढळले औरंगाबाद जिल्ह्यात आज जालान नगर (1), उलकानगरी (1), रोहिदास हाऊसिंग सोसायटी (1), संजय नगर (1), सातारा परिसर (1), गणपती बाग, सातारा परिसर (6), विद्यानगर, सेव्हन हिल (1) , एन सहा,सिडको (1), पुंडलिक नगर (5), हुसेन कॉलनी (8), राम नगर (3), बहादूरपुरा (8), बारी कॉलनी, गल्ली नं. दोन (1), कबाडीपुरा, बुड्डीलेन (3), शरिफ कॉलनी (3), बाबर कॉलनी (3), सिंधी कॉलनी (1), न्याय नगर (1), न्याय नगर, दुर्गा माता कॉलनी (1),सिल्क मिल कॉलनी (1), घाटी (1), रेंटीपुरा (1), अन्य (2) तर कन्नड तालुक्यातील देवळाणा (2) या भागात वरील कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. एकीकडे शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे 255 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला आहे. शहराच्या बंदोबस्तात जलद कृती दल रस्त्यावर औरंगाबादमध्ये कोरोना पोझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सगळे उपाय प्रशासनाने केले मात्र, ही साखळी खंडित होऊ शकली नाही. आतापर्यंत शहरात 100 टक्के लॉकडाउनचा पर्याय प्रशासन वापरला होता. यामध्ये फक्त दवाखाने आणि औषध विक्रीच सुरू आहे. परंतु, तरीही नागरिकांचा वावर रस्त्यावर दिसतच आहे. **हेही वाचा -** मोठी आनंदाची बातमी, कोरोनावर उपचार करणार राज्यातलं तालुका पातळीवरील पहिलं रुग्णालय अखेर पोलिसांनीही औरंगाबादकरांपुढे हात टेकले आहे. आता शहराच्या बंदोबस्तात जलद कृती दल रस्त्यावर उतरवले आहे. शहरातील ज्या भागात कोरोना पोझिटिव्ह रुग्ण जास्त प्रमाणात वाढत आहेत. त्या भागात आज जलद कृती दलाने संचलन केले आहे. आता घराबाहेर विनाकारण कुणी बाहेर आढळून आलं तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश जलद कृती दलाला देण्यात आले आहेत. संपादन - सचिन साळवे