अकोला 08 मार्च : किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर काही दिवसांपूर्वी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चांगलेच चर्चेत आले होते. अशात आता पुन्हा एकदा इंदुरीकर महाराज चर्चेत आले आहेत. यावेळी अकोल्यात आपल्या किर्तनाच्या व्हिडिओ क्लिप काढून यूट्यूबवर अपलोड करणाऱ्यांसाठी त्यांनी विचित्र भाषेचा उपयोग केला (Controversial Statement of Indurikar Maharaj).
आपल्या किर्तनाच्या व्हिडिओ क्लिप यूट्यूबवर टाकणाऱ्यांना इंदुरीकर महाराज म्हणाले, की ‘अशा लोकांची मुलं दिव्यांग जन्माला येतील. त्यांचं वाटोळं होईल.’ या वादग्रस्त विधानानंतर आता ते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. अकोला शहरातील कोलखेड भागात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी इंदुरीकर महाराजांचं किर्तन आयोजित केलं होतं. यावेळी निरुपणा करताना इंदुरीकर महाराजांनी युट्यूबर्सवर सडकून टीका केली. इंदुरीकर महाराज यावेळी बोलताना म्हणाले, की माझ्या जीवावर आतापर्यंत 4 हजारांवर लोकांनी युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करून कोट्यावधी रूपये कमावले. याच लोकांनी आपल्याला अडचणीत आणलं असल्याची तक्रार इंदुरीकर महाराजांनी केली. याच कारणामुळे अशा लोकांबद्दल राग व्यक्त करत माझे व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांना दिव्यांग मुलं होतील, त्यांचं चांगलं होणार नाही, असं ते म्हणाले.
इंदुरीकर महाराज आपल्या वक्ततव्यामुळे चर्चेत आल्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेकदा त्यांच्या वक्तव्यांमुळे ते वादात अडकले आहेत. 2020 साली एका कीर्तनामध्ये त्यांनी सम तिथीला मुलगा होतो आणि विषम तिथीला मुलगी होते, असं म्हटलं होतं. त्यानंतर त्यांचं हे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात सापडलं. यासोबतच कोरोना काळातही आपण लस घेतली नसून घेणारही नाही असं म्हणत त्यांनी कोरोनाला एकच औषध आहे मन खंबीर ठेवा, असा सल्ला दिला होता.