मुंबई, 13 सप्टेंबर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दसरा मेळावा घेण्यावर ठाम आहेत. दसरा मेळावा विक्रमी करण्याचा निर्धार एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदार-खासदारांनी केला आहे. मुख्यमंत्री दसरा मेळावा घेण्याबाबत ठाम असले तरी मेळावा कुठे घेणार, याची माहिती नंतर जाहीर करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित त्यांच्या गटातील सर्व आमदार, खासदार, नगरसेवक आणि पदाधिकारी यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर गुलाबराव पाटील यांनी दसरा मेळाव्याबाबत माहिती दिली. 5 तारखेला संध्याकाळी दसरा मेळावा होणार आहे. दसरा मेळाव्यासाठी परवानगी मागितली आहे. कुठे परवानगी मिळेल, त्याठिकाणी निश्चित दसरा मेळावा होईल. मोठ्या संख्येने कार्यकर्ते दसरा मेळाव्यासाठी येतील, असं गुलाबराव पाटील म्हणाले. तसंच 20 ते 30 तारखेदरम्यान मुख्यमंत्र्यांची शिव संवाद यात्रा सुरू होणार असल्याचंही गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.
दसरा मेळाव्याचा वाद शिवसेनेचा पारंपरिक दसरा मेळावा दादरच्या शिवाजी पार्कवर होतो, पण यावेळी ठाकरे आणि शिंदे गटाने शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी अर्ज केला आहे. शिवसेना नेमकी एकनाथ शिंदेंची का उद्धव ठाकरेंची, हा वाद सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगाकडे असल्यामुळे बीएमसी आयुक्तांनाही याबाबत निर्णय घेताना अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.