मुंबई, 25 ऑक्टोबर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसोबत त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी दिवाळी साजरी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिवाळीनिमित्त भेटवस्तूही दिल्या. महाराष्ट्रात परतीच्या पावसामुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांनी धीर सोडू नये, तसंच खचून जाऊ नये, सरकार तुमच्या पाठीशी आहे, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिलं. राज्यातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कृषि कृती विकास आराखडा तयार करत असल्याचे सांगतानाच नैसर्गिक आपत्तीत सरकार तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. तुम्ही धीर सोडू नका. राज्य शासन तुमच्या पाठीशी असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. अतिवृष्टी, अवकाळी पाऊस यांमुळे बळीराजाला नैसर्गीक आपत्तीला तोंड द्यावे लागते. याप्रसंगी मी आपणा सर्वांना ग्वाही देतो की, तुम्ही धीर सोडू नका, खचू नका, आम्ही तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत, असं मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यातील शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांच्या मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय घेतला आणि त्याची तातडीने अंमलबजावणी केली. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत एकाच वेळी 7 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 2500 कोटी रुपये प्रोत्साहनपर रक्कम जमा करण्यात आली. सेंद्रीय शेतीवर भर देतानाच विविध सिंचन प्रकल्पांच्या कामांना मंजूरी देऊन लाखो हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. शेतकरी आणि कृषी विकासासाठी घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिली.