जालना, 8 मे : शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस (Congress) यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या महाविकास आघाडी सरकारला (Maha Vikas Aghadi Government) आता अडीच वर्ष पूर्ण झाले असले तरी भाजप (BJP) नेत्यांच्या मनात सत्तापासून लांब राहावं लागण्याची उद्विग्नता आजही धगधगती आहे. शिवसेनेने मुख्यमंत्रीपदासाठी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. याच गोष्टीवरुन भाजप नेत्यांकडून वारंवार शिवसेनेवर निशाणा साधला जातोय. विशेष म्हणजे भाजपच्या काही दिग्गज नेत्यांनी याआधी तर हे सरकार कोसळणार असल्याची भविष्यवाणी करुन डेडलाईनही जाहीर केली होती. पण महाविकास आघाडी सरकार सध्या तरी स्थिर आहे. या सगळ्या घडामोडी घडत असताना भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधत हल्लाबोल केला आहे. “आम्ही त्यांना युतीतून बाहेर काढलं की ते पळून गेले, याचा निर्णय जनतेने करावा. लग्न आमच्याशी ठरलं होतं. मात्र ते दुसऱ्यांसोबत पळून गेले. स्वत:ला मुख्यमंत्री होण्यासाठी आम्हाला सोडून दिलं. एका मुख्यमंत्रीपदामुळे त्यांचे सर्व आमदार-खासदारदेखील नाराज आहेत. ते काय आमचा कोथळा काढतील. वेळ आल्यावर आम्हीच त्यांचा कोथळा काढू”, अशा शब्दांत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेवर घणाघाती हल्लाबोल केला. भोकरदन तालुक्यातील राजूर येथे दानवे यांच्या हस्ते विविध प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ( ‘‘ज्या पद्धतीने पोपटाने..’’, नाव न घेता नवनीत राणांचा संजय राऊतांवर हल्लाबोल ) युवासेना अध्यक्ष आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे 10 जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी शिवसेनेकडून सुरू असलेल्या असली आ रहा है नकली से सावधान या बॅनरबाजीवर देखील रावसाहेब दानवे यांनी टीका केली. कोण असली आणि कोण नकली याचा फैसला करण्याचा अधिकार मतदाराला आहे. येणाऱ्या निवडणुकीत जनताच याचा फैसला करेल, असा पलटवार दानवेंनी केला. याबरोबरच मुख्यमंत्री यांच्या अच्छे दिनाच्या वक्तव्यावर देखील दानवेंनी टीका केली. जनतेने भाजप-सेनेला मतदान केले. मात्र तुम्ही बगावत केली. धोका देत सत्तेसाठी आम्हाला सोडून काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत गेले. मुख्यमंत्री झाले, तुम्हाला तर अच्छे दिन आले. मात्र त्यामुळे राज्यातील 12 कोटी जनतेला बुरे दिन आले, असा टोला दानवे यांनी लगावला. यावेळी रावसाहेब दानवे यांना ओबीसी आरक्षणाबाबतही प्रश्न विचारण्यात आला. त्यावरुन त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. “इम्पेरिकल डेटाशी केंद्र सरकारचा काहीही संबंध नाही. इम्पेरिकल डेटा द्या, अशी कोणतीही सूचना कोर्टाकडून केंद्राला आलेली नाही. कोर्टा जेव्हा राज्य सरकारकडे इम्पेरिकल डेटा मागत आहे तेव्हा ती राज्य सरकारची जबाबदारी आहे. हे राज्य सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरलेलं आहे. वीजेचं संकट, कोविडचा काळ, मराठा समाजाचं आरक्षण, धनगर किंवा ओबीसींचं आरक्षण असूद्या, सर्वच ठिकाणी हे सरकार अपयशी ठरले. हे सरकार ज्या-ज्यावेळी अपयशी ठरलं त्यावेळेस त्यांनी केंद्र सरकारवर खापर फोडलं. मंत्रिमंडळात आता जे काही ओबीसी नेते आहेत ते फक्त शोभेचे वस्तू आहेत. त्यांचं सरकारमध्ये काहीच चालत नाही. ओबीसी समाजावर अन्याय करणं हे राज्य सरकारचं धोरणच आहे”, अशी टीका रावसाहेब दानवे यांनी केली.