तुषार रूपनवर, प्रतिनिधी मुंबई, 10 मार्च : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या (Assembly Election Result) मतमोजणीला सुरुवात झाली असून समोर आलेल्या कलांनुसार एकूण चार राज्यांत भाजपने (BJP) जोरदार मुसंडी मारली आहे. उत्तरप्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये भाजपने सर्वाधिक जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवणार असल्याचं दिसत आहे. भाजपने मिळवलेल्या या विजयानंतर महाराष्ट्रातील भाजप नेत्यांकडून (Maharashtra BJP leader) मोठी प्रतिक्रिया समोर आली आहे. उत्तरप्रदेश तो झाँकी है, महाराष्ट्र अभी बाकी है भाजपचे नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी म्हटलं, देशात एक नेतृत्व नागरिकांनी मान्य केलं आहे आणि ते म्हणजे भाजपचं आहे. भाजपचे विचार, त्यांचे कर्तृत्व, वागणं, बोलणं यावर नागरिकांचा विश्वास आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीत चार राज्यांत भाजपने मुसंडी मारली आहे. भाजप बहुमत मिळवत मुख्यमंत्री बसवणार आहे. संपूर्ण देश हा लवकरच भाजपामय होईल. उत्तरप्रदेश तो झाँकी है, महाराष्ट्र अभी बाकी है, महाराष्ट्रात देखील त्याचे परिणाम लवकरच दिसून येतील. 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांचे परिणाम महाराष्ट्रात लवकरच दिसून येतील असं सूचक विधान गिरीश महाजन यांनी केले आहे. गिरीश महाजन यांनी केलेल्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. Election Results 2022 Live Updates: कोणाच्या डोक्यावर सजणार विजयाचा मुकूट?, पहा मतमोजणीचे प्रत्येक अपडेट्स ‘10 मार्चनंतर महाराष्ट्रात भाजपचं सरकार येईल’ 10 मार्चनंतर राज्यात सत्ताबदल होईल असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एका मेळाव्यात म्हटलं होतं. कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना चंद्रकांत पाटील यांनी हे विधान केलं होतं. त्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगण्यास सुरुवात झाली होती. चंद्रकांत पाटील यांनी असं का म्हटलं? चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं, पुणे मनपाच्या निवडणुकीच्या संदर्भात कार्यकर्त्यांचे दिवसभर मेळावे सुरू होते त्याच दरम्यान मी म्हटलं. कारण कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्या की, प्रचंड त्रास खालच्या लेवलला सुरू आहे, सत्तेचा दुरूपयोग सुरू आहे. परवा किरीट सोमय्यांवर हल्ला झाला. अशा विषयांवर मी म्हटलं, काही काळजी करु नका. 10 मार्चला उत्तरप्रदेशचे निकाल लागल्यावर सरकार येईल. मी महाराष्ट्राबाबत बोलतोय. 10 मार्चनंतर महाराष्ट्रात सरकार बदल होईल काही काळजी करु नका असं मेळाव्यात म्हटलं. एखाद्या मेळाव्यात कार्यकर्त्यांवर होणाऱ्या अन्यायाबद्दल जे डिस्टर्बन्स वाटत असतं त्यावेळी असं म्हणायचं असतं. चंद्रकांत पाटलांच्या विधानावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं होतं, हे सरकार पडेल… आत्ता पडेल, उद्या पडेल पण पडत नाही… त्यातून मग नैराश्य येतं. मग पुढील तारिख दिली जाते. आता 10 मार्च नंतर 5 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल येतील त्यानंतर ते सरकार पडेल म्हणतात. त्यापूर्वी पश्चिम बंगालच्या निवडणुका झाल्यावर सरकार पडणार म्हणत होते. पहा त्यांनी त्यांचे प्रयत्न सुरू ठेवले पाहिजेत. ईडीच्या माध्यमातून, सीबीआयच्या माध्यमातून, इन्कम टॅक्सच्या माध्यमातून कारण त्यांच्याकडे दुसरं असं काही नाहीये. माझ्या त्यांना पुन्हा-पुन्हा शुभेच्छा आहेत.