JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'मला सगळे विचारतात की तुमचं काय होणार...', पंकजांचं स्वत:च्या राजकीय वाटचालीबाबत महत्त्वाचं विधान

'मला सगळे विचारतात की तुमचं काय होणार...', पंकजांचं स्वत:च्या राजकीय वाटचालीबाबत महत्त्वाचं विधान

“तुम्ही माझी चिंता करु नका. मला सगळे विचारतात की तुमचं काय होणार आहे? तुम्ही काय करणार आहात? तुम्हाला काय मिळणार? नाही, मला याची अजिबात चिंता नाही”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बीड, 3 जून : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना भाजपकडून (BJP) विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी (MLC Election 2022) उमेदवारी मिळणार, अशी चर्चा गेल्या आठवड्यात रंगली होती. पण भाजपकडून त्यांना विधान परिषदेची संधी देण्यात आली नाही. पंकजा मुंडे यांना काल याबाबत प्रश्न विचारला असता आपण उद्या गोपीनाथ गडावर त्याचं उत्तर देणार असल्याचं म्हटलं होतं. अखेर पंकजा यांनी उत्तर दिलं आहे. भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचा आज आठवा स्मृतीदिवस आहे. गोपीनाथ यांच्या स्मृतीदिनानिमित्ताने परळीच्या गोपीनाथ गडावर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) उपस्थित होते. या कार्यक्रमात मंचावरुन भाषण करताना पंकजा यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीबाबत महत्त्वाचं विधान केलं. “तुम्ही माझी चिंता करु नका. मला सगळे विचारतात की तुमचं काय होणार आहे? तुम्ही काय करणार आहात? तुम्हाला काय मिळणार? नाही, मला याची अजिबात चिंता नाही. दिलेल्या संधीचं सोनं करणं हे वडील गोपीनाथ मुंडेंचे संस्कार आहे. मला माझ्या विधानसभा निवडणुकीतील पराभवाचं सुद्धा सोनं करता आलं, यापेक्षा मोठी पुण्याई कुणाकडे आहे? हा पराभव मला दिल्लीकडे घेऊन गेला. शिवराज सिंह चौहान नावाच्या सात्विक नेत्यापर्यंत घेऊन गेला. हा पराभव खूप काही शिकून गेला. आपलं भविष्य कुणीही बिघडवू शकत नाहीत”, अशी भावनिक प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली. “आता जे सरकारमध्ये सुरु आहे, जे टीव्हीवर बघायला मिळतं त्याबाबत मनामध्ये थोडासा विशाद वाटतो. जात, धर्म, व्यक्तीगत हेवेदावे यांच्या पलीकडे जावून महाराष्ट्राच्या हिताचं काम करण्यासाठी मुंडे यांचं आशीर्वाद लाभला आहे”, असंदेखील पंकजा म्हणाल्या. ( पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याआधी कानपूरमध्ये राडा, दोन गट आमनेसामने, प्रचंड दगडफेक, घटनेचा थरारक VIDEO समोर ) “जीवनात कर्म आणि धर्म एका हातात हात घेऊन चालत असतात. धर्माने कुणी वाईट वागत असेल तर कितीही चांगलं कर्म करुन जमणार नाही. अधर्म करुन तुम्ही चांगलं काम केलं, पूल बांधले, बंधारे बांधले, रस्ते बांधले, त्यामध्ये कार्यकर्त्यांना पैसे खायला द्याल, पण असं राजकर्त्यांकडून अपेक्षित नाही. कर्म आणि धर्म एकत्र जायला पाहिजेत. अशाप्रकारचं राजकारण केलं पाहिजे. जीवन जगताना सत्व, तत्व आणि ममत्व या तीन सूत्रांवर माझं जीवन आहे. सत्व राजकारणात पाहिजे. कुणी कितीही वेड्यात काढलं की ताई तुम्हाला हे जमलंच नाही. तर मला कधीच वाईट वाटलं नाही. मला कुणाचं हृदय तोडणं जमलं नाही. सामान्य माणसाशी नाळ जोडण्याचं काम जमलं. सत्व सोबत घेऊन तत्वाने काम करुन आपल्याला लोकांच्या ममत्व मनात असलं पाहिजे. हे ममत्व शिवराजजी आणि सर्व कार्यकर्त्यांना घेऊन आलं आहे”, असं पंकजा म्हणाल्या. “महाराष्ट्र सरकारला शिवराज सिंह चौहान ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी केलेलं काम बघून बुद्धी आणि प्रेरणा लाभो, त्यांनी आमच्या शिवराज सिंह यांचं अनुकरण करुन या महाराष्ट्राच्या समस्त ओबीसींवर आलेल्या संकटापासून बाहेर काढा. ओबीसींचे मोर्चे, ओबीसींचे मेळावे घेणं आणि ओबीसींचा मी नेता आहे हे म्हणणं यासाठी आम्हाला ओबीसींचं आरक्षण नकोय. तर ओबीसींचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी आरक्षण सुरक्षित पाहिजे”, असं पकंजा राज्य सरकारला उद्देशून म्हणाल्या. पंकजा यांनी यावेळी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या कामांचं कौतुक केलं. “आपण मध्यप्रदेशात जे करुन दाखवलं ते देशात कुणालाही जमलं नाही. तुम्ही ओबीसींचं आरक्षण सुरक्षित करण्याचं काम केलं त्यामुळे आम्ही आपला सन्मान करतो. ही जागा गोपीनाथ मुंडे यांचं स्मरणस्थळ आहे. त्यामुळे आम्ही पु्ष्पहाराने आपलं स्वागत करु शकलो नाही. पण आम्ही प्रेम आणि सदिच्छांनी आपलं स्वागत केलं आहे. आमच्या या सन्मानाचा आपण स्वीकार करा. ज्यांनी लाडली लक्ष्मी बनवली, त्यापासून प्रेरणी घेऊन मी महाराष्ट्रात माझी कन्या भाग्यश्री योजना सुरु केली. आपल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनापासून प्रभावित होऊन महाराष्ट्रात ग्रामसडक योजना सुरु केली. गरीब आणि वंचितांचे नेते गोपीनाथ मुंडे आज आपल्यात नाहीत. पण आपल्यासारखे नेते जेव्हा आमच्यासोबत, आमच्या कुटुंबासोबत जोडले जातात तेव्हा आजही मला माझ्या वडिलांचा आभास होतो”, असं पंकजा म्हणाल्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या