मुंबई, 03 सप्टेंबर : मागच्या दोन महिन्यापूर्वी शिवसेनेतील काही आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. सरकार कोसळण्यासोबतच शिवसेनेला मोठा धक्काही बसला कारण आमदारांसह खासदार, पदाधिकारी अशा अनेकांनी शिवसेनेची साथ सोडली. यापाठोपाठ आता काँग्रेसला महाराष्ट्रात मोठा झटका बसणार असल्याचे समोर येत आहे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह नऊ आमदार भाजपच्या संपर्कात असून लवकर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर काँग्रेसचे जेष्ठ्य नेते बाळासाहेब थोरात यांनी घडलेल्या घडामोडींवर भाष्य केले आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माझे सहकारी अशोक चव्हाण यांच्या संदर्भात माध्यमांमध्ये येत असलेले वृत्त असत्य, खोडसाळपणाचे व लोकांची दिशाभूल करणारे आहे. अशोकरावजी हे भारत जोडो यात्रेच्या नियोजनात सक्रिय आहेत. आम्ही एकत्र मिळून महाराष्ट्रात काँग्रेस अधिक मजबूत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा : ‘जनाधार नसणाऱ्यांना मुख्यमंत्री केलं, तेच शहाणपणा शिकवतात’, पृथ्वीबाबांवर ‘सुशील’ निशाणा!
माध्यमांनी अशोक चव्हाण यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या संदर्भाने जबाबदारीने वृत्तांकन करणे अपेक्षित आहे, मात्र गेल्या काही दिवसात अशोक चव्हाण आणि काँग्रेसच्या संदर्भाने चुकीच्या बातम्या देऊन जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केला जात असल्याचेही यावेळी थोरात म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनीही केला खुलासा
माझी अशोक चव्हाण यांच्याशी भेट झालेली नाही. गणपतीच्या दर्शनाच्या निमित्ताने मी पोहोचलो आणि अशोक चव्हाण निघाले होते, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. चव्हाण आणि फडणवीस यांची भेट आशिष कुलकर्णी यांच्या घरी झाल्याची तसेच त्यांच्यात राजकीय चर्चा झाल्याचे बोलले जात आहे, यावर फडणवीस यांनी आपले मत व्यक्त केले.
मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत विचारले असता, मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल, असे ते म्हणाले. काँग्रेसच्या मंत्र्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार का, असा प्रश्न विचारल्यावर मात्र फडणवीस यांनी मौन बाळगले. मी पुण्याचा पालकमंत्री होणार नाही, पुण्याची लोकसभाही लढवणार नाही. तुम्हाला मी महाराष्ट्रात नको आहे का, असा सवाल त्यांनी यावेळी केला. तसेच या सर्व फक्त माध्यमातील चर्चा आहेत, असेही ते म्हणाले.
हे ही वाचा : शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात ‘राज’ गर्जना की..? महाराष्ट्राच्या राजकारणातील चार मोठ्या शक्यता
कोण आहे आशिष कुलकर्णी?
भाजपचे पदाधिकारी असलेले आशिष कुलकर्णी हे सध्या शिंदे आणि भाजप सरकारमधले समन्वयक आहेत. आशिष कुलकर्णी हे अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. आशिष कुलकर्णी यांचा राजकीय प्रवास मात्र रंजक आहे. आशिष कुलकर्णी हे एकेकाळी उद्धव ठाकरे यांच्या जवळचे होते.