यावेळी एका शेतकऱ्याने आसूडच उद्धव ठाकरेंना भेट दिला आणि या सरकारला वठणीवर आणण्याची मागणी केली.
औरंगाबाद, 23 ऑक्टोबर : ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख शेतकऱ्यांच्या भेटीला बांधावर पोहोचले आहे. यावेळी शेतकऱ्यांनी आसूड उद्धव ठाकरेंना भेट दिला आणि या सरकारला वठणीवर आणा, अशी मागणीच केली. उद्धव ठाकरे नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी औरंगाबादेत पोहोचले आहे. दहेगाव आणि गंगापूर परिसरातील गावांची त्यांनी पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा उद्धव ठाकरेंकडे मांडली. यावेळी एका शेतकऱ्याने आसूडच उद्धव ठाकरेंना भेट दिला आणि या सरकारला वठणीवर आणण्याची मागणी केली.
‘हा आसूड तुमच्याच हातात शोभतो. तुम्ही तो वापरत नाही. तो वापरा. मी तुमच्या पाठीशी आहे. या अडचणीच्या काळात एकत्र होता. संकट दूर झाल्यावर शेतकरी दूर होतात. त्यामुळे तुम्ही सगळे शेतकरी एकत्र राहा. हा आसूड घेऊन फिरू नका, तो आता वापरायचा’ असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना धीर दिला. यावेळी मोठ्या संख्येनं शिवसैनिक उपस्थितीत होते. दरम्यान, औरंगाबाद विमानतळावर उद्धव ठाकरे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. महिला शिवसेना कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांचं औक्षण केलं. यावेळी कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला, अशा घोषणांनी परिसरात दणाणून सोडला होता. (CM च्या पक्षातील नेताच म्हणतो, ‘एकनाथ शिंदेंचा होणार रामदास आठवले’, शिवसेनेचा खुलासा) दरम्यान, राज्यावर अस्मानी संकट आले आहे. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे औरंगाबादच्या दौऱ्यावर आहे. पण, त्यांच्या या दौऱ्यावर भाजपच्या नेत्यांनी टीका केली आहे. मात्र, जर कुणी शेतकऱ्यांच्या सुख दुःखात कुणी जात असेल तर कशाला शंका घ्यायची, असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप नेत्यांना खडेबोल सुनावले. (‘शिंदे गटातील 22 आमदार नाराज, भाजपात विलीन होणार’, शिवसेनेचा मोठा गौप्यस्फोट) ‘उद्धव ठाकरे त्यांची तब्बेत ठीक नव्हती म्हणून ते जात आहेत. जर कुणी शेतकऱ्यांच्या सुख दुःखात कुणी जात असेल तर कशाला शंका घ्यायची. त्यातून केंद्र आणि राज्य सरकारकडे मागणी करावी त्यातून जर शेतकऱ्यांचा फायदा झाला तर ती चांगली गोष्ट आहे, असं शरद पवार म्हणाले.