औरंगाबाद , 6 डिसेंबर : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आज (6 डिसेंबर) महापरिनिर्वाण दिन आहे. राज्य घटनेची निर्मिती, अस्पृश्यता निवारण या विषयावर बाबासाहेबांनी केलेलं काम सर्वांनाच माहिती आहे. या दोन क्षेत्रातील कामाबरोबरच त्यांनी महाराष्ट्रातील मागास समजल्या जाणाऱ्या मराठवाड्यासाठीही एक खूप मोठं काम केलं आहे. या कामामुळे मराठवाड्याची तरुण पिढी आजही त्यांना वंदन करते . 66 वर्षांपूर्वी काय घडलं? मराठवाड्याचा अनुशेष अजूनही पूर्ण झाला नाही, अशी तक्रार नेहमीच होत असते. 66 वर्षांपूर्वी तर हा देशातील सर्वात मागास भागामध्ये होता. निजामाशाहीच्या राजवटीमध्ये येथील विकासाकडे संपूर्ण दुर्लक्ष करण्यात आलं. येथील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी हैदराबादमधील उस्मानीया विद्यापीठात जावं लागत असे. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांची गरज ओळखून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी 1950 साली मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसाठी औरंगाबादमध्ये मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. यामुळे मराठवाड्यातील विद्यार्थी मराठवाड्यात शिक्षण घेऊ लागला.
औरंगाबादशी जवळचं नातं बाबासाहेब आंबेडकरांचं औरंगाबादशी नेहमीच जवळचं नातं होतं. त्यांनी मुंबईमध्ये सिद्धर्थ कॉलेजची स्थापना केली. त्यानंतर मराठवाड्यातील विद्यार्थ्यांची अडचण ओळखून औरंबादमध्ये मिलिंद कॉलेज सुरू केलं. मराठवाड्यामध्ये शिक्षणाची दारं बंद होती त्यावेळी बाबासाहेबांनी मिलिंद महाविद्यालय सुरू केलं. चैत्यभूमी, दीक्षाभूमीपाठोपाठ सोलापूरच्या ‘प्रेरणाभूमी’ला आहे महत्त्व! पाहा Video ‘या महाविद्यालयात आजवर लाखो विद्यार्थी शिकले आहेत. आजही हजारो जण शिक्षण घेतात. डॉ. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नागसेनवन परिसरात येणारा प्रत्येक आंबेडकरी अनुयायी या ठिकाणची माती डोक्याला लावतो,’ अशी प्रतिक्रिया या मिलिंद महाविद्यालायच्या प्राचार्या डॉ. वैशाली प्रधान यांनी दिली.
बाबासाहेब आंबेडकर औरंगाबादमध्ये होते त्यावेळी त्यांनी वापरलेल्या साहित्याचं आजही जतन करुन ठेवण्यात आले आहे. त्यांची खुर्ची, अभ्यासाचा टेबल, जेवणाची भांडी, झोपण्याचा पलंग आणि काही कपडे यांचे जतन करण्यात आले असून ते मिलिंद महाविद्यालयात अनुयायांना पाहता येतात.