घटनास्थळी गोंधळ होण्याच्या शक्यतेमुळे मुलीसह मुलाच्या नातेवाईकांना सिटीचौक पोलीस ठाण्यात आणले.
अविनाश कानडजे, प्रतिनिधी औरंगाबाद, 01 ऑक्टोबर : आजी आजोबाच्या इच्छेसाठी एका 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विवाह एका 26 वर्षाच्या मुलासोबत लावून देण्यात येत असल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद शहरात समोर आली आहे. वेळीच दामिनी पथक आणि सिटी चौक पोलिसांनी विवाह सोहळ्याच्या ठिकाणी जाऊन विवाह रोखला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ वर्षाच्या मुलासोबत १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देण्यात येत असल्याची माहिती दामिनी पथकास मिळाली. या माहितीनुसार पथकाने घटनास्थळी धाव घेत सिटीचौक पोलिसांच्या मदतीने विवाह रोखला. ही घटना गुरुवारी रात्री घडली. दामिनी पथकाच्या सहायक निरीक्षक सुषमा पवार यांच्या पथकास लोटा कारंजा येथील शादीखान्यात १२ वर्षांच्या मुलीचा विवाह होत असल्याची माहिती एकाने फोनद्वारे दिली. त्यानुसार पथक घटनास्थळाचा शोध घेत पोहोचले. तेव्हा त्याठिकाणी शंभर ते दीडशे लोक जेवण करीत होते. एका 12 वर्षांच्या मुलीने नवरीचे कपडे घातल्याचेही दिसून आले. तेव्हा दामिनी पथकाने सिटीचौकचे वरिष्ठ निरीक्षक अशोक गिरी यांना माहिती दिली. तेव्हा त्यांनी उपनिरीक्षक रोहित गांगुर्डे यांच्या पथकास घटनास्थळी पाठविले. हे पथक पोहोचल्यानंतर दामिनी पथक आणि सिटीचौकच्या पथकाने नवरीसह नवरदेवाच्या नातेवाईकांकडे आधारकार्डसह इतर कागदपत्रे मागितली. (मुलं चोरणारा समजून शेकडो लोकांनी त्याला घेरलं अन्.., ठाण्यातील धक्कादायक घटनेचा Video) तेव्हा मुलगी १२ वर्षांची, तर मुलगा २६ वर्षांचा असल्याचे स्पष्ट झाले. घटनास्थळी गोंधळ होण्याच्या शक्यतेमुळे मुलीसह मुलाच्या नातेवाईकांना सिटीचौक पोलीस ठाण्यात आणले. त्याठिकाणी नातेवाईकांनी १२ वर्षांच्या मुलीचे लग्न करणार असल्याची कबुली दिली. तसंच माफी मागून मुलगी १८ वर्षाची होईपर्यंत लग्न करणार नसल्याचे लेखी लिहून दिले. त्यानंतर सर्वांना सोडून देण्यात आले. हा विवाह रोखण्यासाठी सिटीचौकचे निरीक्षक गिरी, उपनिरीक्षक राेहित गांगुर्डे, भरोसा सेलच्या निरीक्षक अम्रपाली तायडे, दामिनीच्या सपोनि. सुषमा पवार, हवालदार निर्मला निभोरे, कल्पना खरात, रुपा साकला, गिरीजा आंधळे, मनिषा बनसोडे, सुजाता खरात यांनी मोलाची भूमिका बजावली. (नवी मुंबईत तरुणाला चौघांकडून प्रचंड मारहाण, धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, पाहा VIDEO) धक्कादायक म्हणजे, बारा वर्षांच्या मुलीचे वृद्ध आजी-आजोबाच्या समोरच विवाह झाला पाहिजे. त्यांची प्रकृती ठिक नसते. त्यांचे काही होण्यापूर्वी विवाह लावण्याचा निर्णय घेतला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.