मुंबई, 14 ऑक्टोबर : महाराष्ट्रात झालेल्या राजकीय उलथापालथीमुळे अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीला अभूतपूर्व महत्त्व प्राप्त झालं आहे. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक होत आहे. 3 नोव्हेंबरला या जागेसाठी पोटनिवडणूक होणार असून 6 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या निवडणुकीत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली आहे, तर भाजपकडून मुरजी पटेल रिंगणात आहेत. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. या निवडणुकीत एकूण 6 उमेदवार रिंगणात आहेत. ऋतुजा लटके आणि मुरजी पटेल यांच्यासह क्रांतिकारी जयहिंद सेना आणि हिंदुस्तान जनता पार्टीचे राकेश विश्वनाथ अरोरा, अपक्ष मिलिंद काशिनाथ कांबळे आणि आणखी एक अपक्ष नीना गणपत खेडेकर यांचा समावेश आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत ‘मशाल’ सोडणार साथ? ठाकरे पुन्हा गोत्यात! शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून डमी उमेदवारही रिंगणात उतरला आहे. ऋतुजा लटके यांच्यासह संदीप नाईक यांनीही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. संदीप नाईक ये युवासेनेचे पदाधिकारी आहेत, तसंच ते शिवसेनेचे अंधेरीमधले माजी नगरसेवकही होते. ऋतुजा लटके यांच्या अर्जाच्या तपासणीवेळी काही अडचण आली तर संदीप नाईक अर्ज मागे घेतील, असं अनिल परब यांनी सांगितलं आहे, त्यामुळे संदीप नाईक यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर ऋतुजा लटके आणि मुरजी पटेल यांच्यासमोर तीन उमेदवारांचं आव्हान असेल. अंधेरीचा ग्राऊंड रिपोर्ट! मराठी, गुजराती, उत्तर भारतीय… कुठला मतदार ठरणार जाएंट किलर!