बारामती, 4 जुलै : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे सरकारमध्ये एकत्र असतानाच एक महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड घडली आहे. पारनेर तालुक्यातील शिवसेनेच्या 5 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे नगर जिल्ह्यातील या नगरसवेकांचा राष्ट्रवादी प्रवेश हा बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झाला. पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी आज बारामतीत येऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी पारनेर तालुक्यातील शिवसेनेतून निवडून आलेल्या पाच नगरसेवकांना बरोबर आणत थेट राष्ट्रवादीत प्रवेशही घडवून आणला.पारनेर नगरपंचायतीच्या नंदकुमार देशमुख, नंदा देशमाने, वैशाली औटी, डॉ. सय्यद, किसन गंधाडे यांनी आज बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. या सर्वांच्या प्रवेशाने पारनेरमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. विशेष म्हणजे पारनेर नगरपंचायतीत शिवसेना व राष्ट्रवादीचेच सत्तेसाठी जुगाड होते. त्यानंतर आता शिवसेनेच्या नगरसेवकांनी थेट राष्ट्रवादीत जाणे पसंद केले आहे. महाविकास आघाडीत तणाव होणार? राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष सरकारमध्ये सोबत काम करत असताना हा पक्षप्रवेश झाल्याने या दोन्ही पक्षांमध्ये तणाव निर्माण होणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र याचा दोन्ही पक्षातील संबंधांवर कोणताही परिणाम होणार नाही, असं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे. ‘सध्या राष्ट्रवादीत असलेले पारनेरचे आमदार निलेश लंके हे आधी शिवसेनेतच होते. आता राष्ट्रवादीत प्रवेश केलेले 5 नगरसेवक हे आमदार लंके यांना माननारे होते. त्यामुळे त्यांचा पक्षप्रवेश झाला,’ असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी म्हटलं आहे. विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांना मोठा धक्का पारनेर शिवसेनेच्या महिला आघाडी तालुकाप्रमुख उमाताई बोरुडे यांच्यासह शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांना पारनेर शहरात मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे. त्यामुळे याबाबत विजय औटी हे काय प्रतिक्रिया देतात, हे पाहावं लागेल. संपादन - अक्षय शितोळे