मुंबई, 13 सप्टेंबर: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी एक वाजता जनतेला संबोधित करणार आहेत. राज्यातील भाविक जनतेची भावना लक्षात घेऊन आज तरी मंदिरे सुरु करण्यासंदर्भात घोषणा करतील, अशी आशा आहे. मात्र तसे न झाल्यास 18 सप्टेंबर रोजी अधिक मास प्रारंभ होत आहे. या दिवशी नाईलाजाने आम्हाला स्वतःहून मंदिरे उघडावी लागतील, असा इशारा आध्यात्मिक समन्वय आघाडीचे (Mahavikas Aghadi) प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले (Acharya Tushar Bhosale) यांनी दिला आहे. हेही वाचा… मराठा आरक्षणासाठी युक्तिवादापासून फडणवीस सरकारनेच रोखले,महाधिवक्तांचा गौप्यस्फोट आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी ट्वीट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेच्या भावनांचा आदर करुन त्वरित मंदिरे उघडावीत. आता त्यांनी देव भक्तांच्या आड येऊ नये, कारण आधीच महाराष्ट्रात गेल्या 6 महिन्यांपासून साधु-संतांचा आणि धार्मिक क्षेत्राचा छळ होत असल्यानं या सरकारच्या पापाचा घडा भरत आला आहे, अशी घणाघाती टीका आचार्य तुषार भोसले यांनी केली आहे.
राज्यातील मंदिरे खुली करण्यात यावी, या मागणीसाठी भाजपनं (BJP) गेल्या महिन्यात ‘दार उघड उध्दवा दार उघड’ या आंदोलनाला सुरुवात केली होती. या आंदोलनाला आध्यात्मिक समन्वय आघाडीने पाठिंबा दिला होता. हे घंटानाद आंदोलन म्हणजे ठाकरे सरकारसाठी (Thackeray Govt) धोक्याची घंटा आहे. हे जर असंच सुरु राहिलं तर हाच घंटानाद या ठाकरे सरकारचा कर्दनकाळ ठरेल, असे खोचक वक्तव्य आचार्य तुषार भोसले यांनी केलं होतं. दरम्यान, दुसरीकडे शिर्डीत साईबाबा मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी मनसे आक्रमक झाली आहे. साईमंदिर खुले करा अन्यथा आम्ही स्वतः खुले करून मंदिरात प्रवेश करू, असा इशारा मनसेनं दिला आहे, कोरोनामुळे राज्यभरात लॉकडाऊन लागू झाला. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून राज्यातील मंदिर अद्यापही बंद आहे. केंद्राने सुचना दिल्यानंतरही राज्यातील मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता शिर्डीतील साईबाबांचे मंदिर उघडण्यासाठी मनसे आंदोलन केले. शिर्डीचे साई मंदिर भक्तांना दर्शनासाठी खुले करा, संस्थान कर्मचार्यांचा वेतन कपातीचा निर्णय मागे घ्या, या मागणीसाठी आज मनसेच्या वतीने शिर्डीत आंदोलन करण्यात आले. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत आहे. हेही वाचा… बिहारमधील ज्येष्ठ नेत्याचं कोरोनामुळे निधन, ‘एम्स’मध्ये घेतला अखेरचा श्वास बाळा नांदगावकर यांनी साईबाबांना साष्टांग दंडवत घातले आणि मंदिर भक्तांना दर्शनासाठी खुले व्हावे आणि संस्थान कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीचा निर्णय मागे घ्यावा, असं साकडं साईबाबांना घातलं. साईमंदिर खुले करा अन्यथा आम्ही स्वतः खुले करून मंदिरात प्रवेश करू, असा इशारा मनसेनं दिला होता. त्यामुळे साई मंदिराच्या परिसरात पोलीस प्रशासन आणि संस्थानची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. सकाळ पासूनच शिर्डीच्या साईमंदिराला सुरक्षा वाढवण्यात आली आहे.