मुंबई, 24 नोव्हेंबर : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. गुजरात निवडणुकीच्या प्रचारासाठी काल मंत्रिमंडळाची बैठक झाली नाही का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे. एका पाठोपाठ एक तीन ट्वीट करून आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस यांच्या सरकारवर टीका केली आहे. ‘महाराष्ट्रातील घटनाबाह्य सरकारने शिवसेनेचे आमदार गुजरातला पळवले, मग हक्काचे प्रकल्प गुजरातला नेऊन इथल्या तरुणांचा रोजगार पळवला. आता तिथल्याच निवडणुकीच्या प्रचारात हे सरकार व्यस्त आहे. 1 तासही यांच्याकडे नाही. काल मंत्रिमंडळाची बैठक का रद्द झाली?’ असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे. पीक विमा, ओला दुष्काळ, वीज प्रश्न अशा शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांकडे दुर्लक्ष करून परराज्यातल्या निवडणुकांवर खोके सरकार लक्ष केंद्रीत करत आहे. मंत्रिमंडळ बैठक रद्द होत आहे. महाराष्ट्रात हे काय चाललंय? हे सरकार नेमकं आहे कुणासाठी? या सरकारला महाराष्ट्रातल्या जनतेसाठी वेळ मिळणार आहे का? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे.
‘महामंडळ की प्राधिकरण? अशा गोंधळात खोके सरकार जनतेच्या आरोग्याशी खेळत आहे. औषधाच्या पुरवठ्याचा प्रश्न सोडून यांना निवडणुकांची काळजी जास्त आहे हे दिसतंय. तुम्ही शिवसेनेशी, शिवसैनिकांशी गद्दारी केलीत, पण महाराष्ट्रासोबत गद्दारी करू नका,’ अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. गुजरातमध्ये 1 आणि 5 डिसेंबरला विधानसभेच्या निवडणुका होत आहेत, या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातल्या 4 जिल्ह्यातल्या नागरिकांना सुट्टी देण्यात आली आहे. पालघर, नाशिक, नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील ज्यांची नावे गुजरात राज्यातील मतदार यादीमध्ये समाविष्ट आहेत, अशा मतदारांना मतदानासाठी सुट्टी देण्याचा आदेश उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने जारी केला आहे. यावरूनही राज्य सरकारवर टीका केली जात आहे. तेजस्वींना भेटून आदित्य ठाकरे नितीश कुमारांकडे, तिसरी आघाडी होणार का? स्पष्टच सांगितलं