गडचिरोली, 10 मे : जिल्हयातील महादवाडी आणि कुराडी जंगलात दोन वेगवेगळ्या वाघांच्या हल्ल्यात (Tiger Attack) दोन महिलांचा मृत्यू (Two Women died) झाल्यानं खळबळ उडाली आहे. या महिला तेंदूपत्ता (Tendu leaf) तोडण्यासाठी जंगलात गेल्या होत्या. वाघांच्या हल्ल्यामुळे तेंदूपत्ता तोडणाऱ्या मजुरांमध्ये (Tendu patta worker) दहशतीचं वातावरण असून पोटापाण्याचं साधन असलेला तेंदूपत्ता कसा तोडायचा असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात सर्वत्र मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून तेंदूपत्ता तोडण्याचे काम सुरू होतं. यंदाही ते सुरू झालं आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणावर मजूर, कामगार तेंदूपत्ता तोडण्यासाठी जंगलात जात आहेत. सोमवारी पोर्ला वन परिक्षेत्राअंतर्गत महादवाडी आणि कुराडी या जंगल परिसरात स्थानिक महीला तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी दोन महिलांवर वाघानं हल्ला केला. (वाचा- Mucormycosis या बुरशीजन्य आजारावर मोफत होणार उपचार; आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा ) पहिली घटना महादवाडी जंगलात घडली. महादवाडी येथील कल्पना या 37 वर्षीय महिला सहकाऱ्यांसमवेत तेंदूपत्ता तोडत होत्या. त्यावेळी अचानक वाघाने त्यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात कल्पना यांचा जागीच मृत्यू झाला आहे. वाघाचा हल्ला होताच आजूबाजूच्या लोकांनी आरडाओरडा केला. त्यामुळं वाघ पळून गेला. दुसरी घटना महादवाडीपासून साडेतीन किलोमीटर अंतरावर घडली. कुराडी गावालगतच्या जंगलात सकाळी साडेआठ ते नऊ वाजताच्या दरम्यान सिंधुबाई मुनघाटे यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. (वाचा- महिलांनो Alert राहा! तुमच्यासाठी भयंकर ठरतेय कोरोनाची दुसरी लाट कारण… ) वन विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही वाघ दीड ते दोन वर्षे वयाचे होते. घटनेची माहिती मिळताच अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहांचे पंचनामे करून शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. मृतकांच्या कुटुंबीयांना तत्काळ दहा हजार रुपये मदत देण्यात आली आहे. नियमानुसार वनविभागाकडून नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याची माहिती आहे. दरम्यान वनविभागाने गडचिरोली परिसरात वाघांचा वावर असल्याचे सांगत नागरिकांनी जंगलात जाऊ नये असं आवाहन केलं आहे. पण तेंदूपत्ता हे या भागातील नागरिकांसाठी पावसाळ्यातील चार महिन्यांच्या उदर निर्वाहासाठीच्या उत्पन्नाचं साधन आहे. त्यामुळं रोजगार महत्वाचा असल्याने नेमके काय करावं असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. परिसरात वाघाचे हल्ले वाढल्यानं वनविभागानं वाघांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.