मुंबई, 10, नोव्हेंबर: काही वेळा एखाद्या नात्याचं रूपांतर लग्नात झालं, की कुरबुरी सुरू होतात. वाद वाढतात आणि त्याची परिणती घटस्फोटात होते. प्रेमात पडल्यावर सुंदर वाटणारं नातं अचानक अस्वीकारार्ह वाटू लागतं. त्याचं कारण नात्यामधला विश्वास व एकमेकांना आहे तसं स्वीकारण्याचा अभाव हे असतं. प्रेमात असताना या गोष्टींचा विचार केला जात नाही; मात्र जेव्हा लग्न होतं, तेव्हा काही गोष्टी प्रकर्षानं खटकू लागतात व नातं तुटतं. त्यामुळेच प्रेमात पडल्यावर लग्नाचा विचार करणाऱ्या सर्वांनी काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. नात्याचा पायाच विश्वासाचा असतो. त्याशिवाय अनेक वर्षांचा संसार उभा राहू शकत नाही, हे समजून घेतलं पाहिजे. तुमची गर्लफ्रेंड सतत तुम्हाला फोन करून चौकशी करत असेल, तर याचा अर्थ तिचा तुमच्यावर विश्वास नाही. स्वतःला सतत असुरक्षित समजणं लग्नानंतर घातक ठरू शकतं. तुमच्या प्रत्येक गोष्टीबाबत तिला कळायलाच पाहिजे, असा तिचा अट्टाहास असेल, तर तेही वादाचं कारण ठरू शकतं. अशा गर्लफ्रेंडसोबत लग्न करण्याआधी पूर्ण विचार करा. हेही वाचा - …तर घटस्फोट हाच योग्य पर्याय! जोडीदाराच्या या चुकांकडे दुर्लक्ष करून नाही चालत समविचारी व्यक्तींमध्ये नातं पटकन जोडलं जातं. याचा अर्थ एकमेकांच्या सगळ्याच गोष्टी पटाव्यात असं नाही; मात्र एकमेकांच्या कोणत्याच गोष्टी पटत नसतील, तर मात्र नातं पुढे नेण्याबाबत विचार केला पाहिजे. दोघांची मतं एकमेकांच्या मतांच्या एकदम विरुद्ध असतील व हे सतत होत असेल, तर असं जोडपं फार काळ एकत्र राहू शकणार नाही. दोन व्यक्ती लग्न करून एकत्र येतात, तेव्हा त्यांची दोन कुटुंबं एकमेकांशी जोडली जात असतात. संसार केवळ एकाच व्यक्तीसोबत करायचा असला, तरी नातं घरातल्या प्रत्येकाशी जोडावं लागतं. याची कल्पना गर्लफ्रेंडला नसेल, तर ते तिला समजून सांगावं; मात्र तुमच्या कुटुंबीयांपासून, मित्रमैत्रिणींपासून तुम्हाला तोडण्याचा प्रयत्न ती करत असेल, तर लग्नाचा पुन्हा विचार करा. जोडीदारासोबत त्याच्या घरच्यांनाही जो मनापासून स्वीकारतो तो खरा जोडीदार असतो. त्यामुळे ज्या गर्लफ्रेंडला केवळ जोडीदारच हवा आहे, तिच्याशी लग्न करण्याबाबत पुन्हा विचार करावा. माणसाला आहे तसं स्वीकारल्यानं समोरचा समाधानी राहतो; मात्र लग्नाच्या बाबतीत जर जोडीदाराला आहे तसं स्वीकारलं नाही, तर सतत अपेक्षाभंग होत राहतो. त्यातून चिडचिड व मानसिक त्रास होतो. तुमची गर्लफ्रेंड सतत तुमच्यातले दोष, उणिवा काढत असेल, त्यावरून टोमणे मारत असेल, तर याचा अर्थ तिनं तुम्हाला आहे तसं स्वीकारलेलं नाही. अशा वागण्यामुळे तुम्ही दोघं कधीच सुखी व समाधानी राहू शकणार नाही. लग्नानंतर कदाचित यात वाढ होऊ शकते. गर्लफ्रेंडसोबत लग्न करण्याचा निर्णय घेत असाल, तर या गोष्टींचा जरूर विचार करा. म्हणजे लग्नानंतर पश्चात्तापाची वेळ येणार नाही.