JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / शरीरातल्या अँटीबॉडीजना चकवा देतोय कोरोनाचा नवा व्हॅरिएंट; नवीन रिपोर्टने खळबळ

शरीरातल्या अँटीबॉडीजना चकवा देतोय कोरोनाचा नवा व्हॅरिएंट; नवीन रिपोर्टने खळबळ

चीनमध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णांदरम्यान समोर आलेले नवीन संशोधन धक्कादायक आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 ऑक्टोबर : जगभरात गेल्या दोन-अडीच वर्षांपासून कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. अनेक देशांनी कोरोनाच्या तीव्र लाटांचा सामना केला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर आणि लसीकरण हे मार्ग सांगितले गेले आहेत. भारतासह अनेक देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरणावर भर देण्यात आला. सध्या बहुतांश देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. संसर्ग कमी झाल्याने सर्व व्यवहार सुरळीत झाले आहेत; मात्र चीनमध्ये अद्याप कोरोनाचं संकट कायम आहे. चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असून काही शहरांमध्ये पुन्हा निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर एका संशोधनातून काहीसे धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. ओमिक्रॉनच्या BA.2.75.2 या व्हॅरिएंटसमोर लस किंवा अन्य अँटीबॉडीज थेरपी निष्प्रभ ठरत असल्याचं स्पष्ट झालं आहे. लवकरच हिवाळा सुरू होत आहे. या कालावधीत रोगप्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या व्यक्तींमध्ये या विषाणूचा संसर्ग वाढू शकतो, असा इशारादेखील देण्यात आला आहे. `टीव्ही नाइन हिंदी`ने याविषयीचं वृत्त दिलं आहे. `कोरोना विषाणू अजूनही पूर्णपणे नष्ट झालेला नाही. तो आपल्या सभोवताली अस्तित्वात आहे. रोगप्रतिकारशक्ती आणि विषाणूचा प्रभाव कमी झाल्याने देशांमध्ये संसर्ग आटोक्यात आल्याचं दिसत आहे; मात्र हा विषाणू कायमच एंडेमिक फेजमध्ये राहिल, असा याचा अजिबात अर्थ नाही. विषाणूत सातत्याने म्युटेशन होत आहे. त्यामुळे नवे व्हॅरिएंट सातत्याने येत असून, यापुढेही येत राहतील. एखादा धोकादायक व्हॅरिएंट आला तर संसर्ग पुन्हा वाढेल. त्यामुळे काळजी घेणं आवश्यक आहे,` असं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. दरम्यान, चीनमध्ये एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढत असताना दुसरीकडे एका संशोधनातल्या निष्कर्षाने चिंता वाढवली आहे. ओमिक्रॉनचा BA.2.75.2 हा नवा व्हॅरिएंट रक्तातल्या अँटीबॉडीजना चकवा देऊ शकतो. त्यावर कोणतीही अँटीबॉडी थेरपी लागू पडत नाही, असा दावा `लॅन्सेट इन्फेक्शियस डिसीज जर्नल`मध्ये प्रकाशित एका संशोधनात करण्यात आला आहे. स्वीडनमधल्या कॅरोलिंस्का इन्स्टिट्यूटने हे संशोधन केलं आहे. संशोधकांच्या मते, लसीकरणाच्या माध्यमातून नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती वाढवली गेली नाही तर येत्या हिवाळ्यात हा संसर्ग वाढू शकतो. वाचा - गरोदरपणात भात खावा की नाही? White की Brown कोणता तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर `कोरोनाविरुद्ध लढण्याची नागरिकांच्या शरीरातली रोगप्रतिकारशक्ती पूर्णपणे नष्ट झालेली नाही; पण ओमिक्रॉनचा BA.2.75.2 हा नवा व्हॅरिएंट मागील व्हॅरिएंट्सच्या तुलनेत अधिक शक्तिशाली आहे. यापुढे अँटीबॉडीज निष्प्रभ ठरतात. स्पाइक प्रोटीनमध्ये दोन वेळा म्युटेशन होऊन हा नवा व्हॅरिएंट तयार झाला असल्याने असं होत आहे,` अशी माहिती इन्स्टिट्यूटचे सहायक प्राध्यापक बेन म्युरेल यांनी दिली. संशोधनाच्या अहवालानुसार, BA.2.75.2 हा व्हॅरिएंट ओमिक्रॉनच्या या वर्षाच्या सुरुवातीला आलेल्या BA.2.75चा एक प्रकार आहे. हा व्हॅरिएंट अनेक देशांमध्ये आढळून आला आहे. अशा प्रकारे, ओमिक्रॉनच्या आधीच्या व्हॅरिएंटपासून बनलेले त्याचे नवीन प्रकार भविष्यात समस्या वाढवू शकतात. त्यामुळे हिवाळ्यात संसर्गाचं प्रमाण वाढेल, असं म्हणता येईल. तथापि यामुळे स्थिती किती बिघडेल किंवा रुग्णालयात दाखल करावं लागेल का याबाबत संशोधकांनी कोणतंही ठोस भाष्य केलेलं नाही.

`सध्या अस्तित्वात असलेली लस ओमिक्रॉनच्या संसर्गाचा सामना करण्यास सक्षम आहे. परंतु, अद्याप अशी कोणतीही लस सापडलेली नाही, जी कोरोनाच्या नवीन व्हॅरिएंटविरुद्ध ठोस संरक्षण देऊ शकेल. आपण लशीवर विश्वास ठेवू शकतो; पण तो किती मर्यादेवर असावा, हे सांगणं कठीण आहे,` असं संशोधकांनी सांगितलं. संशोधनानुसार, स्वीडनमधल्या स्टॉकहोम इथल्या 75 व्यक्तींच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. त्यांच्या रक्तातल्या अँटीबॉडी ओमिक्रॉनच्या BA.5 च्या तुलनेत BA.2.75.2 शी सामना करण्यासाठी पुरेशा सक्षम नसल्याचं दिसून आलं. हे नमुने मागच्या वर्षी तीन टप्प्यांत घेण्यात आले होते. यात पहिला नमुना मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ओमिक्रॉनचा शोध लागण्यापूर्वी घेण्यात आला. त्यानंतर एप्रिलमध्ये ओमिक्रॉनचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर दुसरा नमुना घेण्यात आला. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात आणि सप्टेंबरच्या सुरुवातीला BA.5 व्हॅरिएंटचे सर्वाधिक रुग्ण सापडताच तिसऱ्यांदा रक्ताचे नमुने घेण्यात आले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या