मुंबई 20 सप्टेंबर : वाहन खरेदी करताना आपण त्यातल्या फीचर्सना खूप प्राधान्य देतो. मागील काही वर्षांतील आकडेवारी याबद्दल बरंच काही सांगते. सर्वोत्कृष्ट किंवा टॉपचं मॉडेल विकत घेण्याकडे ग्राहकांचा कल जास्त आहे. अर्थात, तुलनेने बेस किंवा बेसिक फीचर्स असलेली मॉडेल्स विकत घेणार्यांची संख्या जास्त आहे. पण आधुनिक फीचर्स असलेली वाहनं (Advanced Features of Cars) विकत घेण्याचं प्रमाण खूप वाढलंय. स्वत:च वाहन असावं असं अनेकांचं स्वप्न असतं. वाहन घेतल्यावर लोकं त्यात नवनवीन अॅक्सेसरीज इन्स्टॉल करतात. या अॅक्सेसरीज फायदेशीर आहेतच. पण यामुळे विविध समस्यांनाही तोंड द्यावं लागू शकतं. अर्थात, या अॅक्सेसरीजचे साईड इफेक्टदेखील आहेत. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. अपघात होण्याच्या इतर कारणांपैकी एक म्हणजे नवी फीचर्स असलेली वाहनं चालवणं हेही प्रमुख आहे. मॉडर्न अर्थात आधुनिक फीचर्सची वाहनं घेणं यात गैर काहीच नाही. पण असं वाहन चालवताना ड्रायव्हरने जागरूक असणं गरजेचं आहे. कधी-कधी ही नवी फीचर्स तुमचं लक्ष विचलित करू शकतात. हलगर्जीपणामुळे झालेल्या अपघातांबद्दल आपण नेहमीच ऐकतो. म्हणूनच वाहन किंवा गाडी चालवताना काही गोष्टींबद्दल सावध राहिलो (Precautions while driving) तर अपघात टाळणं शक्य आहे. म्युझिक ऐकत गाडी चालवणं टाळा हल्लीच्या कारमध्ये म्युझिक सिस्टिम असतेच. किंबहुना वाहन विकत घेताना या गोष्टीचासुद्धा विचार होतोच. गाडी चालवताना गाणं ऐकण्यात गैर काहीच नाही. पण आवडता म्युझिक ट्रॅक लावण्यासाठी, गाणं बदलण्यासाठी किंवा म्युझिक सेटिंग्ज बदलण्याच्या नादात आपलं लक्ष विचलित होतं. म्हणूनच वेळ पडल्यास गाडी थांबवून हे करणं योग्य होईल. कारण लक्ष विचलित झाल्यावर अपघात होण्याची शक्यता वाढतेच. काळजी घेतली तरच प्रवास सुखाचा होईल. जीपीएसऐवजी वापरा ऑडिओ फीचर अनेक नव्या मॉडेल्समध्ये जीपीएसची (GPS Tracker) सुविधा असतेच. पण हे जीपीएस किंवा मोबाईलमधलं गुगल मॅप्स तुमचं लक्ष विचलित करू शकतात. जर तुम्ही गुगल मॅप्स वापरत असाल तर त्यांच्या ऑडिओ फीचरचा उपयोग करावा. तसंच रस्ता आणि त्यावरचे ट्रॅफिक पाहण्यासाठी स्क्रीनकडे पाहू नका. अशावेळी गुगल मॅप्सचं ऑडिओ फीचर उपयोगी ठरतं. या गोष्टी पाळल्यास गाडी चालवताना अपघात होण्याचं प्रमाण नक्की कमी होईल. मल्टिमीडिया स्क्रीनचा वापर करा जपून नव्या गाड्यांमध्ये डॅशबोर्डवर मल्टिमीडिया(Avoid use of Multimedia Screen) डिस्प्ले लावलेला असतो. त्यातला व्हिडिओ ऑप्शन केवळ गाडी थांबलेली असेल तेव्हाच वापरता येतो. गाडी चालवताना व्हिडिओ पाहिल्यास अपघात होऊ शकतो आणि रस्ते-वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल दंडदेखील होतो. अनेकदा लोकं अॅक्सेसरीज म्हणून हा स्क्रीन गाडीत बसवतात. गाडी चालवताना व्हिडिओ पाहतात. परिणामी, लक्ष विचलित होऊन अपघात होतात. केवळ हलगर्जीपणामुळे आपल्यासोबत इतरांचा जीवही धोक्यात येऊ शकतो. फोन वापरू नका कार चालवताना फोनचा होणारा वापर अंगाशी(Avoid Phones while driving) येतो. त्यामुळे अपघात घडतात. अनेकजण कार चालवताना सोशल मीडिया पाहणं, फोनवर बोलणं या गोष्टी सर्रासपणे करताना आढळतात. असा बेफिकीरपणा चांगलाच भोवतो. परिणामी, अपघात होऊन गंभीर दुखापत किंवा मृत्युही होऊ शकतो. म्हणूनच कार चालवताना फोनवर बोलणं टाळावं. अगदीच गरज असल्यास ब्लूटूथ सुविधेचा वापर करावा. फोटो काढणं, सनरूफ आणि एसीची सेटिंग्ज बदलणं कार ड्राईव्ह करताना अनेकांना सेल्फी किंवा ग्रुप फोटो घेण्याची सवय असते. असं करणं हे तुमच्या जीवावर बेतू शकतं. तसंच सनरूफ आणि एसीची सेटिंग्ज बदलण्यात लक्ष गुरफटतं. यामुळे अपघात होतात. गाडी थांबवून मगच या सर्व गोष्टी करणं चांगल्या राहील. अपघात होण्यामागची महत्त्वाची तीन कारणं 1. स्टेअरिंग व्हिलवरून हात दूर होणं - म्युझिक सिस्टिम, सनरूफ, एसी यांची सेटिंग बदलण्यात लक्ष गुरफटणं. 2. गाडी चालवताना रस्ताकडे दुर्लक्ष - सतत फोन वापरणं, जीपीएस पाहणं यामुळे ड्रायव्हरचं समोरच्या रस्त्यावरचं लक्ष विचलित होणं. 3. ड्राईव्ह करताना हलगर्जीपणा करणं - सोशल मीडियावर लक्ष, मागे बसलेल्या लोकांशी बोलण्यासाठी मागे पाहणं आणि फोटो-व्हिडिओ घेणं.