rat kill home remedies
मुंबई, 17 ऑक्टोबर : कचर्याच्या ठिकाणी उंदीर होतातच. मुळात जिथे धान्य, अन्नपदार्थ असतात, त्या ठिकाणी उंदरांचा प्रादुर्भाव अधिक असतो. धान्याच्या दुकानात तर हमखास उंदीर दिसतात. कधी-कधी हे उंदीर घरातही येतात. त्यामुळे अशा उंदरांना पळवण्यासाठी आपण सापळाही लावतो. विविध उपाय करूनही त्यांचा उपद्रव कमी होत नाही. नुकसान तर होतेच; पण काही वेळा अन्नाची नासाडीही होते. उंदरांना मारण्याऐवजी काही असे उपायही आहेत, ज्यामुळे या त्रासातून सुटका होऊ शकते. जाणून घेऊ या त्याबद्दलची अधिक माहिती. याबद्दल माहिती देणारं वृत्त ‘एनडीटीव्ही इंडिया’ने दिलं आहे. उंदरांना मारण्याची गरज नाही. काही छोट्या टिप्स जाणून घेतल्यास उंदराच्या समस्येवर नियंत्रण ठेवता येईल. त्याबद्दल पाहू या. मिरची पावडर मिरची पावडर किंवा भुकटी यामुळे अनेक प्राण्यांना त्रास होतो. अर्थात, उंदीरही यापासून दूर जातात. मिरची पावडर हा उंदरांना पळवून लावण्यासाठी रामबाण उपाय आहे. घराच्या दरवाज्याजवळ, स्वयंपाकघरातल्या ओट्याजवळ, जमिनीवर कुठल्याही कोपर्यात थोडीशी मिरची पावडर टाकून ठेवावी. अशा ठिकाणी उंदीर वारंवार येतात. त्यामुळे तिथेच मिरची पावडर टाकलेली असेल, तर त्या वासामुळे ते पुन्हा नक्कीच फिरकणार नाहीत यात शंका नाही. हेही वाचा - Diwali 2022 : तोंडावर आलीये दिवाळी, पुजेची भांडी राहिलीये? अवघ्या काही मिनिटात करा चकचकीत लसूण पाणी एक ग्लास पाण्यात किसलेली लसूण घाला. हे मिश्रण व्यवस्थित ढवळा. ज्या ठिकाणी उंदीर वारंवार येतात, तिथे हे शिंपडून ठेवा. उंदीर घरात येणं बंद होईल. तसंच या मिश्रणाची तीव्रता वाढवण्यासाठी तुम्ही लसूण तुकडेही यात टाकू शकता. कांद्याचा वास कांदा हा सहज उपलब्ध असणारा पदार्थ आहे. कांदा कापल्यावर जो दर्प येतो, तो काहीसा उग्र असतो. या वासामुळे उंदीर दूर राहतात. घरातल्या कानाकोपर्यात उंदीर येण्याची शक्यता जास्त असते. अशा ठिकाणी कांद्याचा रस, कांद्याचे तुकडे ठेवणं उपयुक्त ठरतं; पण तुमच्या घरात जर एखादं पाळीव जनावर असेल, तर त्याचा या गोष्टींशी संपर्क येऊ नये याची काळजी घ्या. कारण कांद्याच्या रसाचा किंवा तुकड्यांचा त्यांना त्रास होऊ शकतो. लवंग तेल लवंगांचं तेल नक्कीच गुणकारी आहे. अनेकदा छोट्या कीटकांना पळवण्यासाठी याचा वापर होतो. चार-पाच लवंगांचे तुकडे एका मऊ कपड्यात बांधा. हे कापड उंदराच्या बिळापाशी नेऊन ठेवा. यामुळे उंदरांचा चांगला बंदोबस्त होईल. तसंच पुन्हा उंदरांचा त्रास होणार नाही. अनेकदा छोट्या टिप्स खूप मोठं काम करतात. परंतु, आपल्याला याबद्दल पुरेशी माहिती नसते. बाजारातली विविध विषारी औषधं आणून उंदरांचा नायनाट करता येतो; पण या घरगुती उपायांनी उंदराचा बंदोबस्त करणं सहज शक्य असताना विषारी औषधांची गरजच पडत नाही.