JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Cervical Cancer Vaccine : महाभयंकर कॅन्सरवर पुण्याने दिला जबरदस्त फॉर्म्युला; सीरमने लाँच केली पहिली स्वदेशी लस

Cervical Cancer Vaccine : महाभयंकर कॅन्सरवर पुण्याने दिला जबरदस्त फॉर्म्युला; सीरमने लाँच केली पहिली स्वदेशी लस

पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्युटने केंद्र सरकारच्या बायोटेक्नॉलॉजी विभागासोबत मिळून सर्व्हायकल कॅन्सरवर पहिली स्वदेशी लस तयार करून ती लाँच केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 01 सप्टेंबर : गर्भाशयमुखाच्या कर्करोगाशी (Cervical Cancer Vaccine) असलेल्या लढ्यात भारताने एक ऐतिहासिक पाऊल टाकलं आहे. सर्व्हायकल कॅन्सरवर उपचारासाठी सीरम इन्स्टिट्यूटने (SII) तयार केलेली संपूर्ण स्वदेशी बनावटीची लस (indigenously-made) लाँच करण्यात आली आहे. डीसीजीआयने (DCGI) ही लस तयार करण्यासाठी सीरमला नियामक मान्यता दिली होती. ही लस उपलब्ध झाल्यामुळे आता देशातल्या कित्येक महिलांचा जीव वाचवणं शक्य होणार आहे. गर्भाशयमुखाचा कर्करोग (What is Cervical Cancer) हा गर्भाशयाच्या खालच्या भागातल्या पेशींमध्ये होतो, जो भाग गुप्तांगाशी जोडलेला असतो. बहुतांश प्रकरणांमध्ये हा कर्करोग ह्यूमन पॅपिलोमाव्हायरस (Human Papilloma Virus) नावाच्या इन्फेक्शनच्या विविध प्रकारांमुळे होतो. हे इन्फेक्शन सेक्शुअली ट्रान्समिट होतं. शरीराची रोगप्रतिकारशक्ती या इन्फेक्शनचा (HPV infection) धोका टाळण्यास पुरेशी असते; मात्र कित्येक प्रकरणांमध्ये तसे होत नाही आणि हे इन्फेक्शन वर्षानुवर्षं टिकून राहते. यामुळे तिथल्या पेशी कॅन्सर पेशींमध्ये रूपांतरित होतात. 15 ते 44 वयोगटातल्या महिलांना हा कॅन्सर होऊ शकतो. यामुळे देशात दर आठ मिनिटांना एका महिलेचा जीव जात असल्याचं आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. दर वर्षी 1.23 लाख महिलांना या कॅन्सरचं निदान होतं आणि 67 हजार महिलांचा यामुळे मृत्यू होतो. जगभरात सर्व्हायकल कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी 20 टक्के मृत्यू एकट्या भारतात होतात. हे वाचा -  Brain And Heart : हृदय कमकुवत असणाऱ्यांचा मेंदू लवकर होतो वृद्ध! असं आहे हार्ट आणि ब्रेनचं कनेक्शन पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्यूटने भारत सरकारच्या बायोटेक्नॉलॉजी विभागासोबत मिळून या कॅन्सरवर पहिली स्वदेशी लस (Indian Vaccine on Cervical Cancer) तयार केली आहे. ही HPV लस दोन ते तीन डोसमध्ये देण्यात येते. लस घेणाऱ्या व्यक्तीच्या वयानुसार लशीचे डोस ठरवण्यात येतात. इन्फेक्शन होण्यापूर्वीच महिलांचं किंवा मुलींचे लसीकरण केलं गेलं, तर गर्भाशयमुखाच्या कॅन्सरच्या कित्येक घटना टाळल्या जाऊ शकतात. व्हल्वर आणि व्हजायनल कॅन्सरपासूनदेखील (Vulver and Vaginal Cancer) ही लस संरक्षण करू शकते. जननेंद्रियातले वॉर्ट्स (Genital Warts), गुदद्वाराचा कर्करोग (Anal Cancer), तोंड-घसा-डोकं आणि मानेचे घातक रोग (Mouth, throat, neck and head malignancies) अशा विविध रोगांशी लढण्यात ही लस महिला आणि पुरुष दोघांनाही फायद्याची ठरू शकते. भारतात ही लस उपलब्ध झाली असली, तरी या आजाराबद्दल आणि लशीबद्दल भरपूर जनजागृती होण्याची गरज आहे. 9 ते 15 वयोगटातल्या मुलींना शाळेतच ही लस दिली जाऊ शकते; मात्र त्यासाठी नीट योजना आखण्याची गरज असल्याचं मत सीरम इन्स्टिट्यूटच्या डॉ. स्मिता जोशी यांनी व्यक्त केल्याचं ‘ डीएनए इंडिया ’ने म्हटलं आहे. डॉ. जोशी यांनी या HPV लसीच्या निर्मितीमध्ये मुख्य संशोधक म्हणून काम पाहिलं आहे. सीरमने या लशीची किंमत (HPV vaccine price) अद्याप जाहीर केली नाही. भारतात विदेशी बनावटीच्या ज्या HPV लशी सध्या उपलब्ध आहेत त्यांची किंमत साधारणपणे 2000 ते 3500 हजार रुपये प्रति डोस एवढी आहे. सीरमची लस स्वदेशी बनावटीची असल्यामुळे त्याची किंमत नक्कीच यापेक्षा कमी असणार असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हे वाचा -  अंधारात झोपा की ब्लँकेटमध्ये डास कसे बरे शोधतात? मानवात ती शक्ती का नाही? सर्व्हायकल कॅन्सर कोणत्या टप्प्यात आहे यानुसार रुग्णावर विविध प्रकारचे उपचार केले जातात. अगदी सुरुवातीच्या टप्प्यात कॅन्सर असल्यास कोन बायोप्सी (Cone Biopsy) उपचार केला जातो. ट्रेकेलेक्टोमी (Trachelectomy) हीदेखील एक उपचार पद्धती वापरण्यात येते. यामध्ये गर्भाशय ग्रीवा, गुप्तांगाचा वरचा भाग आणि आजूबाजूच्या उती (tissues) काढण्यात येतात. असं केल्यामुळे प्रजननक्षमता टिकून राहते. या पुढच्या टप्प्यात कॅन्सर असल्यास लिम्फ नोड सॅम्पलिंगसह (पेल्व्हिक आणि/किंवा पॅराऑर्टिक लिम्फ नोड्स) सुधारित रॅडिकल हिस्टेरेक्टॉमी ही शस्त्रक्रिया केली जाते. कित्येक वेळा ही शस्त्रक्रिया नको असल्यास किंवा या शस्त्रक्रियेनंतर रेडिएशन (Radiation treatment for cervical cancer) उपचार पद्धती वापरली जाते. यासोबतच कित्येक प्रकरणांमध्ये रेडिएशनसोबत केमोथेरपीचा वापरही केला जातो. एकूणच, या आजाराची गंभीरता आणि देशातल्या रुग्णांचं प्रमाण पाहता सीरमने तयार केलेली स्वदेशी लस लाखो महिलांसाठी वरदान ठरू शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या