नवी दिल्ली, 9 एप्रिल : सध्या उन्हाळा ऋतू (Summer Season) सुरू आहे. उन्हाळा सुरू झाला, की शाळेतली मुलं सुट्ट्यांची आतुरतेने वाट पाहत असतात. उन्हाळी सुट्टी म्हणजे मुलांसाठी प्रवासाची संधी असते. त्यामुळे अनेक पालक आपल्या पाल्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीत (Summer Vacation) वेगवेगळ्या साहसी ठिकाणी पर्यटनासाठी किंवा सहलीसाठी घेऊन जातात. मुलंदेखील उन्हाळ्यात कुठे फिरायला जायचं याचं स्वप्नरंजन करत असतात. अशा वेळी अनेकदा पालकांसमोर आपल्या मुलांना कुठे फिरायला घेऊन जावं आणि त्यासाठी किती खर्च होईल असे प्रश्न उभे राहतात. आपली फॅमिली ट्रिप बजेटमध्ये बसायला हवी असा पालकांचा विचार असतो. यासाठी कमी बजेटमधल्या आणि सुंदर पर्यटनस्थळांचा शोध घेतला जातो. गेली दोन वर्षं तर लॉकडाउन आणि निर्बंधांमुळे कोणालाच मनासारखं फिरता आलं नव्हतं. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात फिरायला जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. तुम्ही आपल्या पाल्यांना उन्हाळी पर्यटनासाठी घेऊन जाण्याचा विचार करत असाल आणि कमी पैशात प्रवास होईल अशा एखाद्या उत्तम ठिकाणाचा शोध घेत असलात, तर अशा काही ठिकाणांची माहिती येथे देत आहोत. याविषयीची सविस्तर माहिती देणारं वृत्त ‘अमर उजाला’ने प्रसिद्ध केलं आहे.
काश्मीर (Kashmir) काश्मीरला भारताचं नंदनवन म्हटलं जातं. उन्हाळ्याच्या सुट्टीत कुटुंबासोबत काश्मीरमध्ये वेळ घालवणं हा एक सुंदर आणि अद्भुत अनुभव ठरू शकतो. तुम्ही दिल्ली ते श्रीनगर थेट विमानाने जाऊ शकता. यामुळे तुमचा वेळ वाचू शकतो. तुम्हाला बजेटमध्ये प्रवास करायचा असेल तर तुम्ही ट्रेन किंवा बसनेदेखील जम्मू-काश्मीरचा प्रवास करू शकता. तिथे तुम्हाला साइटवर फिरण्यासाठी टॅक्सी मिळेल. काश्मीरमध्ये तुम्ही दल लेक, गोंडोला आणि शिकारा यांसह अनेक बागांना भेट देऊ शकता. या बागा अतिशय सुंदर आणि नयनरम्य आहेत. काश्मीरमध्ये राहण्यासाठी तुम्हाला श्रीनगरमध्ये हाउस बोट किंवा पहलगाम आणि गुलमर्गमध्ये चांगल्या प्रतीची हॉटेल्स मिळतील. काश्मीरमध्ये 3 ते 4 दिवसांच्या सहलीसाठी 15 ते 20 हजार रुपये मोजावे लागतात. हा प्रवास तितकाच रिफ्रेशिंग ठरतो.
दार्जिलिंग (Darjiling) पूर्व भारतात भ्रमंती करायची असेल, तर उन्हाळ्याच्या सुटीत तुम्ही दार्जिलिंगला जाऊ शकता. उन्हाळ्यात दार्जिलिंग एखाद्या स्वर्गापेक्षा कमी भासत नाही. कुटुंबासह भेट देण्यासाठी दार्जिलिंग हे सर्व ऋतूंतलं सर्वोत्तम ठिकाण आहे. दार्जिलिंगच्या सुंदर दऱ्या आणि चहाच्या बागा मुलांना भुरळ घालतील. तिथे तुम्ही रॉक गार्डन आणि टायगर हिलसारख्या उत्तम ठिकाणांना भेट देऊ शकता. येथे तुम्हाला फोटोसेशन करण्यासाठी सर्व ठिकाणी सुंदर स्पॉट्स मिळतील. कुटुंबासह दार्जिलिंगला प्रवास करण्यासाठी तुम्हाला 20 ते 30 हजार रुपये खर्च येऊ शकतो.
लडाख (Leh Ladakh) काश्मीरच्या पलीकडे असलेलं लडाख हेदेखील सहलीसाठी अगदी योग्य ठिकाण आहे. लडाखला सहलीला जाण्यासाठी मे-जून दरम्यानची वेळ अत्यंत योग्य आहे. उन्हाळ्यात भेट देण्यासाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे. तुम्ही काश्मीरमार्गे लडाखला जाऊ शकता. दोन दिवस प्रवास केल्यानंतर तुम्ही लडाखला पोहोचाल. तुम्ही लडाखच्या सहलीचं किमान पाच दिवसांचं नियोजन करू शकता. लेहमध्ये दोन रात्री घालवण्यासोबतच तुम्ही एक रात्र पॅंगॉंग आणि एक रात्र नुब्रा व्हॅलीमध्ये घालवू शकता. या ठिकाणांना भेट देण्यासाठी कमी खर्च येईल. 20 ते 40 हजारांच्या बजेटमध्ये तुम्ही कुटुंबासह लेह-लडाखला फिरून येऊ शकता.
अल्मोडा, उत्तराखंड (Almora Uttarakhand) उन्हाळ्याच्या सुट्टीत कुटुंबासह हिल स्टेशनला जाणं हा एक चांगला पर्याय आहे. उत्तराखंडमध्ये अशी अनेक हिल स्टेशन्स आहेत, जिथं तुम्ही कमी खर्चात भेट देण्याचा विचार करू शकता. यामध्ये अल्मोडा शहराचा समावेश आहे. मुलांना आणि मोठ्यांनादेखील इथली सुंदर नैसर्गिक दृश्यं आणि साहसी खेळ आवडतील. अल्मोडा येथे तुम्ही झिरो पॉइंट, दूनागिरी आणि डीअर पार्क यांसारख्या सर्वोत्तम ठिकाणांना भेट देऊ शकता. अल्मोडाला जाण्यासाठी तुम्हाला दिल्लीहून बस किंवा ट्रेन मिळू शकते. अल्मोडा येथे स्वत:च्या कारनेही जाता येतं. तिथे तुम्हाला हॉटेलमध्ये राहण्यासाठी अगदी बजेटमध्ये रूम मिळतील. यामुळे सात-आठ हजारांतच संपूर्ण कुटुंबासोबत तुम्ही एका चांगल्या सहलीचं नियोजन करू शकता. हे ही वाचा-
बाबो! Boyfriend च्या जीवावर Girlfriend ची ऐश; महिन्याला पगार म्हणून मिळतात तब्बल 82 लाख रुपये
अंदमान (Andaman) उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी एखाद्या हिल स्टेशनवर न जाता अन्य आरामदायी आणि शांत ठिकाणी जायचे असेल, तर समुद्रकिनारा हा उत्तम पर्याय ठरू शकतो. यासाठी तुम्ही अंदमानला जाऊ शकता. अंदमान हे मे महिन्यात फिरण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. तिथले समुद्रकिनारे, तिथलं वातावरण आणि समुद्रकिनाऱ्यावरून दिसणारं नयनरम्य दृश्य तुमच्या शरीराला आणि मनालाही ताजंतवानं करेल. अंदमानला जाण्यासाठी तुम्हाला दिल्ली ते पोर्ट ब्लेअर थेट विमान मिळेल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही दिल्ली ते चेन्नई आणि चेन्नई ते पोर्ट ब्लेअर असा प्रवासही करू शकता. अंदमानला भेट देण्यासाठी दोन दिवसांची सहल पुरेशी आहे. यादरम्यान तुम्हाला हॅवलॉक बेट आणि राधानगर बीचला भेट देता येईल. कुटुंबासह अंदमान प्रवासासाठी तुम्हाला 30 ते 40 हजार रुपये खर्च येऊ शकतो.