मी सुजय बर्गे मुंबईत राहतो. सध्या गणेशोत्सव सुरू आहे. त्यामुळे मोठ्या आवाजात लाऊड स्पीकर आलाच. तीन वर्षांपूर्वी आमच्या परिसरात गणेशोत्सवात इतक्या मोठ्या आवाजात गाणी लावण्यात आली होती की अनेकांना त्याचा त्रास होत होता. गणेशोत्सव मंडळांना याबाबत सांगितलं तर ते उलट आमच्याशीच हुज्जत घालू लागले. गेल्या वर्षी कोरोनामुळे तशी परिस्थिती नव्हती. पण यंदा कोरोना नियम शिथील झाले आहेत. सरकारनेही धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यंदा गणेशोत्सवही जोशात असेल. त्यामुळे मोठ्या आवाजात लाऊड स्पीकर, डीजे याची शक्यता नाकारता येत नाही. असं झाल्यास आम्ही नेमकं काय करावं? कुठे तक्रार नोंदवावी? वकील सुजाता डाळींबकर - “भारतीय राज्यघटनेतील कलम 19(1)अ आणि कलम 21 प्रत्येक नागरिकाला चांगले वातावरण आणि शांततापूर्ण जीवन जगण्याचा अधिकार देते. पीए जेकब विरुद्ध कोट्टायम पोलीस अधीक्षक या खटल्यात केरळ उच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते की संविधानातील 19(1)अ अंतर्गत अभिव्यक्ती स्वातंत्र्याची हमी कोणत्याही नागरिकाला मोठ्या आवाजात लाऊड स्पीकर आणि गोंगाट करणारी वाद्ये वाजवण्याची परवानगी देत नाही. जर आपण या संदर्भात कायद्याबद्दल बोललो तर, ध्वनी प्रदूषण (नियमन आणि नियंत्रण) 2000 अंतर्गत, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) औद्योगिक, व्यावसायिक, निवासी आणि शांत ठिकाणे या चार वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रांसाठी ध्वनी मानके निश्चित केली आहेत”
आवाजाची मर्यादा आणि वेळ औद्योगिक क्षेत्रासाठी, दिवसा 75 डीबी (डेसीबल) आणि रात्री 70 डीबी आहे. व्यावसायिक क्षेत्रासाठी दिवसा 65 डीबी आणि रात्री 55 डीबी निवासी क्षेत्रासाठी दिवसा 55 डीबी आणि रात्री 45 डीबी सायलेन्स झोनसाठी दिवसा 50 डीबी आणि रात्री 40 डीबी दिवसाची वेळ - सकाळी 6 ते रात्री 10 रात्रीची वेळ - रात्री 10 ते सकाळी 6 “रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत डीजे लाऊडस्पीकर वगैरे वाजवण्यास सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. गरज असल्यास सरकार गणेशोत्सवासारख्या काही कार्यक्रमांना थोडी शिथिलता देऊ शकतो. मात्र, त्यातही मर्यादा पाळावी लागते. आजकाल गणेशोत्सवात मुलांच्या परीक्षा वगैरे सुरू असून, त्यात रात्री उशिरापर्यंत डीजे मोठ्या आवाजात वाजवता येत नाही. अशावेळी तुम्हाला तक्रार करायची झाल्यास तुम्ही 100 या पोलीस विभागाच्या हेल्पलाईन नंबरवर कॉल करुन तक्रार नोंदवू शकता. तुम्हाला प्रत्यक्ष ठाण्यात जाण्याचीही गरज नाही”