आज मी तुम्हाला एक वेगळीच कथा सांगणार आहे. पण ही कथा खरी आहे. कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. पण जरा गुगल करून पाहिलं तर तुम्हाला माझ्या म्हणण्यावर विश्वास बसेल. ही कथा आहे जेन आणि पॉल ब्रिग्स या कुटुंबाची. लग्नानंतर एके ठिकाणी फिरायला गेले असताना त्यांना एक मूल दिसलं. तो निराधार होता. या निराधार बाळाला आई-बाबा मिळावेत म्हणून त्यांनी त्याला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. 1985 पासून त्यांची दत्तक घेण्याची प्रथा आजतागायत सुरू आहे. आतापर्यंत त्यांनी विविध देशातील तब्बल 38 मुलांना दत्तक घेतलं आहे. कदाचित तुमचा यावर विश्वास बसणार नाही. कोणी 38 मुलं कसं काय दत्तक घेऊ शकतं??
मूल होत नाही म्हणून दत्तक घेणं ही बाब वेगळी, मात्र स्वत:चं मूल असतानाही दत्तक मूल घेण्याकडे लोकांचा कल वाढत असल्याचं दिसत आहे. हीच आहे तरुणाई आणि त्यांचे विचार. आजच्या तरुणाईला सामाजिक जाणीव नाही असं म्हटलं जातं. मात्र आपण समाजासाठी काही करत असू तर ते ढोल वाजवून सांगण्याची गरज नसते, हे तरुणाईला माहीत आहे. कदाचित ते अधिक प्रक्टिकल आहे, असंही म्हणू शकतो. सद्यस्थितीत देशातील अनाथ मुलांची संख्या ही भीषण आहे. अवघ्या महाराष्ट्रात कोरोना काळात तब्बल 4500 ते 5000 बालके अनाथ झाली आहे. त्यांच्या आई-वडीलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ही परिस्थिती केवळ कोरोनातील मात्र भारतातील 300,000 मुले व्यावसायिक देहविक्रयात गुंतलेली आहेत. एचआयवी/एड्सग्रस्त 4.2 दशलक्षांमध्ये 14 वर्षाखालील मुलांचे प्रमाण 14% आहे. देवदासी, वेश्याव्यवसाय यात अडकलेल्या महिलांच्या मुलांचं भवितव्य एकतर रस्त्यावर असतं, नाहीतर ते गुन्हेगारी क्षेत्रात शिरतात. त्यांना वेळीत यातून बाहेर काढणं आवश्यक आहे. त्यांना सरकारी मदत मिळते. अनेकांची व्यवस्था अनाथ आश्रमात होते. मात्र काही ठरावित वयापर्यंतच आश्रमात राहता येतं. यानंतर त्यांना बाहेर पडावच लागतं. असा हट्ट कशासाठी? अनेकदा कुटुंबातील ज्येष्ठ मंडळी मुलांना स्वत:चच मूल व्हावं म्हणून जबरदस्ती करीत असतात. मात्र हा हट्ट कशासाठी? सध्या अनेक दाम्पत्य स्वत: मूल जन्माला घालण्याऐवजी मूलं दत्तक घेतात. त्या निमित्ताने दोन्ही गोष्टी साध्य होतात, एक तर तुमची मूल होण्याची इच्छाही पूर्ण होते शिवाय त्या अनाथ मुलाला हक्काचं घर मिळतं. काही दाम्पत्य स्वत:च एक मूल आणि एक मूल दत्तक घेतात. हा पर्याय देखील कौतुकास्पदच आहे. स्वत:चं मूल होण्याचा अट्टहास का? अनेक घरांमध्ये महिलेला मूल होत नसेल, यात पुरुष किंवा महिला कोणाचाही दोष असू शकतो. अशा घरांमध्ये लाखो रुपये खर्च करून विविध उपचारांचा अवलंब केला जातो. मात्र नेहमीच हे उपचार फायद्याचे असतातच असं नाही. अनेकदा महिलांना यामुळे नुकसान सहन करावं लागतं. त्यांना आरोग्याचे अनेक प्रश्न उद्भवतात. त्याशिवाय लाखोंमध्ये पैसा ओताला लागतो. यापेक्षा एखाद्या बाळाला दत्तक घेणं ही पद्धत अधिक सोपी आणि सुलभ आहे. मात्र आपल्याकडे सामाजिक आणि कौटुंबिक दबाव इतका असतो की, एखादा वेगळा मार्ग चोखाळणाऱ्याला दोष लावले जातात. मात्र आजची तरुणाई याही पुढे गेली आहे. परदेशात दत्तक मूल घेण्याचं वारं खूप आधीच वाहू लागलं होतं. त्यात परदेशातील अनेक कुटुंब एकाच वेळेस 3, 4 तर कधी त्याहूनही जास्त मूलं दत्तक घेतात. हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींनीचाही दत्तक मूल घेण्याकडे कल आहे. भारतातही अनेक मध्यमवर्गीत कुटुंबही एक स्वत:च मूल आणि दुसरं दत्तक. असाही पर्याय निवडतात. अभिनेत्री सुश्मिता सेन हिने लग्नापूर्वीच दोन मुली दत्तक घेतल्या. विशेष म्हणजे तिने वयाच्या 24 व्या वर्षी पहिली मुलगी दत्तक घेतली. त्यामुळे सामाजिक जाणीवा जपणाऱ्या आजच्या सर्व तरुणाईला आमचा सलाम…