नवी दिल्ली, 9 जून : कॅन्सर (Cancer) अर्थात कर्करोग हा जीवघेणा आजार मानला जातो. या आजाराचं लवकर निदान झालं तर रुग्ण बचावण्याची शक्यता वाढते. कॅन्सरचं निदान झाल्यावर सर्जरी, केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपीच्या मदतीनं उपचार केले जातात. सर्वसामान्यपणे कॅन्सर म्हणजे मृत्यू असा लोकांचा समज आहे. अर्थात तो खरादेखील आहे. कारण हा आजार पूर्णपणे बरा होण्यासाठी ठोस असे उपचार उपलब्ध नाहीत. परंतु, न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीनमध्ये एक संशोधन प्रकाशित झालं आहे. कॅन्सरवर औषध (Medicine) मिळाल्याचा दावा या संशोधनात करण्यात आला आहे. याबाबत तज्ज्ञांनी मत व्यक्त केलं आहे. ‘टीव्ही 9 हिंदी’ने या विषयीची माहिती दिली आहे. कॅन्सरवर औषध सापडल्याचा दावा न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीनमध्ये (New England Journal Of Medicine) प्रकाशित एका संशोधनात करण्यात आला आहे. संशोधकांनी रेक्टल कॅन्सर (Rectal cancer) झालेल्या 18 रुग्णांवर डॉस्टरलिमॅब (Dosterlimab) या औषधाच्या ट्रायल घेतल्या. या औषधामुळे सहा महिन्यात रुग्णांमधील कॅन्सरचा ट्यूमर (Cancer Tumor) नाहीसा झाला, असं संशोधकांचं म्हणणं आहे. या औषधाची ट्रायल झाल्यानंतर रुग्णांची एंडोस्कोपी, पेट स्कॅन आणि एमआरआय करण्यात आला. पण त्यात कुठेही ट्यूमर आढळला नाही. या रुग्णांनी यापूर्वी केमोथेरपी, रेडिएशन थेरपी आणि सर्जरी हे उपचार घेतले होते. परंतु, त्याचा खास फायदा झाला नाही. डॉस्टरलिमॅब औषधामुळे सर्व रुग्णांमधील कॅन्सरचा ट्यूमर नाहीसा झाला, असं संशोधकांनी सांगितलं. या संशोधनाचे लेखक डॉ. लुईस डियाज म्हणाले, “डॉस्टरलिमॅब या औषधामुळे कॅन्सर नष्ट झाला आहे. इतिहासात पहिल्यांदाच एखादं औषध कॅन्सरवर चांगलं प्रभावी ठरलं आहे. या औषधाचे कोणतेही दुष्परिणाम दिसून आले नाहीत. हे संशोधन कॅन्सर उपचारातील सर्वात मोठं यश आहे.” ( नाराजीची तुफान चर्चा, मविआला राज्यसभा निवडणुकीत फटका बसणार? ) परंतु, या औषधाबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. त्या अनुषंगाने ‘टीव्ही 9’ ने देशातल्या प्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञांशी संवाद साधला. याबाबत दिल्ली येथील धर्मशीला नारायणा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. अंशुमान कुमार (Dr. Anshuman Kumar) यांनी सांगितलं, “शरीरातली रोगप्रतिकारक शक्ती नॉर्मल पेशी (Normal Cells) आणि रेक्टल कॅन्सरच्या पेशींमधला फरक ओळखू शकत नाही. कोरोनाप्रमाणे रेक्टल कॅन्सरच्या पेशी स्वतःला लपवतात. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती या पेशी ओळखू शकत नाहीत आणि आजार बळावतो; पण डॉस्टरलिमॅब औषध रेक्टल कॅन्सरला ओळखून त्याच्या पेशी उघड करते. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती या पेशींशी लढून त्या नष्ट करतात.” “हे औषध आशेचा एक किरण आहे. परंतु कॅन्सरवर ठोस उपचार सापडले असं म्हणणं योग्य नाही. या औषधाचा वापर केवळ 18 रुग्णांवर करण्यात आला आहे. या औषधाच्या परिणामाचे पुढील काही वर्ष निरीक्षण करणं आवश्यक आहे. या संशोधनात सहभागी असेलल्या सर्व रुग्णांचा पुढील पाच वर्षांपर्यंत फॉलोअप ठेवावा लागेल. जर या कालावधीत त्यांना पुन्हा कॅन्सर झाला नाही तरच आपण एकाच औषधाने कॅन्सरवर इलाज झाला असं म्हणू शकतो. त्यामुळे लगेच आनंद व्यक्त करणं योग्य ठरणार नाही. तसेच कॅन्सरवर औषध सापडलं, असा विचार करणंही योग्य नाही. जर छोट्याशा अभ्यासाच्या आधारे हे औषध कॅन्सरवरील उपचार म्हणून स्वीकारलं गेलं आणि इतर रुग्णांनी ते घेतलं तर ते सर्व रुग्णांवर परिणामकारक ठरू शकेलच असं नाही. त्यामुळे पुढील काही वर्षं या औषधाच्या परिणामांबाबत प्रतीक्षा करणं आवश्यक आहे”, असं डॉ. कुमार यांनी सांगितलं. डॉ. अंशुमान म्हणाले, “हे संशोधन केवळ रेक्टल कॅन्सरच्या रुग्णांवर झालं आहे. जगभरात ब्रेस्ट, सर्व्हायकल, ब्लड आणि पोटाच्या कॅन्सरचे कोट्यवधी रुग्ण आहेत. कॅन्सरवर ठोस उपचार मिळाले, अशा स्वरुपाचं वृत्त काही माध्यमं देत आहेत. पण ते चुकीचं आहे. कारण यामुळे संबंधित रुग्णांमध्ये उत्साह निर्माण होईल आणि ते हे औषध घेण्याचा प्रयत्न करतील. कोणत्याही रुग्णालयाला हे औषध देण्याची अजून परवानगी नाही. या औषधाला तज्ज्ञांच्या समितीनं परवानगी दिलेली नाही. जोपर्यंत या औषधाचे ट्रायलचे (Trial) सर्व टप्पे पूर्ण होत नाहीत, अधिकाधिक लोक ट्रायलमध्ये सहभागी होत नाहीत तोपर्यंत या औषधाला मंजुरी मिळणार नाही आणि ते बाजारात उपलब्ध होणार नाही.” “यापूर्वी एका औषधाच्या अनुषंगाने अभ्यास प्रकाशित झाला होता. हे औषध कॅन्सरवर 100 टक्के फायदेशीर आहे, असं सांगितलं गेलं. पण कालावधीनंतर हे औषध निष्प्रभ ठरलं आणि पुढील टप्प्यातील ट्रायलमध्ये अयशस्वी देखील ठरलं”, असं डॉ. अंशुमान यांनी सांगितलं.