JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / बिअर, वाईन.. मर्यादित प्रमाणात घेतल्यास होतात अनेक फायदे; संशोधकांचा दावा

बिअर, वाईन.. मर्यादित प्रमाणात घेतल्यास होतात अनेक फायदे; संशोधकांचा दावा

अल्कोहोलचं प्रमाण कमी असलेली वाइन किंवा बीअर ही पेयं मर्यादित प्रमाणात घेतल्यास आरोग्यासाठी फायदा होतो, असं एका संशोधनातून स्पष्ट झालं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 सप्टेंबर : कोणाताही पदार्थ किंवा पेय आरोग्यासाठी उपयुक्त असतं, तसंच ते अपायकारकदेखील ठरू शकतं. म्हणूनच कोणताही पदार्थ किंवा पेय योग्य प्रमाणात घेणं गरजेचं आहे. मद्यपान करणं आरोग्यासाठी घातक असतं; पण अल्कोहोलचं प्रमाण कमी असलेली वाइन किंवा बीअर ही पेयं मर्यादित प्रमाणात घेतल्यास आरोग्यासाठी फायदा होतो, असं एका संशोधनातून स्पष्ट झालं आहे. यामुळे गंभीर आजारांचा धोका कमी होऊ शकतो. यासोबतच आणखी काही पेयं आरोग्यासाठी लाभदायक ठरू शकतात. कोणताही पदार्थ किंवा पेय योग्य प्रमाणात घेतल्यास आरोग्यासाठी निश्चित फायदेशीर ठरतात. मद्यपानामुळे लिव्हर खराब होतं, असं आपण नेहमी ऐकतो-वाचतो; पण अल्कोहोलमिश्रित पेयं मर्यादित प्रमाणात घेतल्यास पचनक्रिया चांगली होऊ शकते. उंदरांवर केलेल्या संशोधनातून स्पष्ट झालं आहे, की बीअर किंवा वाइनमध्ये अल्कोहोलचं प्रमाण कमी असतं. या पेयांमुळे पचनक्रिया चांगली होते. ज्या पेयांमध्ये अल्कोहोलचं प्रमाण कमी असतं, अशी पेयं प्यायल्याने शरीरातली बॅड कोलेस्टेरॉलची पातळी घटते. ब्लड क्लॉटिंग अर्थात रक्ताच्या गुठळीची समस्या रोखली जाते, असा दावा या संशोधनातून करण्यात आला आहे. याशिवाय अशी काही पेयं आहेत, जी मर्यादित प्रमाणात घेतली तर गंभीर आजार दूर राहतात आणि ती आरोग्यासाठी लाभदायक ठरतात. अल्कोहोलमिश्रित पेयांचं सेवन मर्यादित असावं. अन्यथा गंभीर आजारांचा धोका वाढतो. एका संशोधनानुसार, महिलांनी आरोग्यासाठी दिवसभरात 150 मिली म्हणजे एक छोटा ग्लास मद्यपान केल्यास चालू शकतं. पुरुषांनी 300 मिली म्हणजेच दोन ग्लास मद्यपान केल्यास चालू शकतं. यामुळे आरोग्य चांगलं राहतं; मात्र यापेक्षा जास्त प्रमाणात मद्यपान आजारांना आमंत्रण देणारं ठरू शकतं. मर्यादित प्रमाणात चहापान आरोग्यासाठी चांगलं असतं. दूध आणि साखरेच्या चहाच्या तुलनेत ब्लॅक टी, ग्रीन टी किंवा व्हाइट टी पिणं फायदेशीर असतं. असा चहा हृदयरोग, आर्थ्रायटिस, डायबेटीस, डोकेदुखी यांसारख्या आजारांवर उपयुक्त ठरतो. चहामध्ये अँटीऑक्सिडंट, अँटीइन्फ्लेमेटरी आणि अँटीएजिंग गुणधर्म असतात. दीर्घ तारुण्यासाठी आणि आजार दूर राहण्यासाठी नियमित चहापान करावं. ब्लॅक टीमुळे सर्दी, फ्लूसारख्या समस्या दूर होतात. कारण या चहात फ्लॅव्होनॉइड्स असतात. या घटकामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. ब्रिटनमधल्या युको बायोबँक या संशोधन संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात दोन कप चहा घेतल्यास रोग प्रतिकारशक्ती चांगली राहते आणि आयुर्मान वाढतं. वाचा - गर्भाशयाचा कॅन्सर झाल्याचे 80% महिलांना समजतच नाही, या 3 कारणांमुळे वाढतो धोका अल्कोहोल आणि त्याचा शरीरावर होणारा परिणाम यावर अभ्यास केला असता दिसून आलं, की रेड वाइनमध्ये आढळणारा रेझवेराट्रोल हा घटक रोगामुळे रक्तवाहिन्यांचं नुकसान होऊ नये, यासाठी मदत करतो. यासोबतच रक्तवाहिन्यांमधले अडथळे टाळण्यासाठी, उच्च कोलेस्टेरॉलची समस्या कमी करण्यासाठी, चांगल्या कोलेस्टेरॉलची पातळी वाढवण्यासाठी आणि कॅन्सरसारखे आजार टाळण्यासाठी हा घटक फायदेशीर ठरतो. रेझवेराट्रोल हे एक प्रकारचं रसायन असून, त्याचा वापर औषधनिर्मितीसाठी केला जातो. शेंगदाणे, पिस्ता, द्राक्ष, रेड आणि व्हाइट वाइन, ब्लूबेरी, क्रॅनबेरी, कोको आणि डार्क चॉकलेटसारख्या खाद्यपदार्थांमध्ये हे रसायन असतं. पायनॅपल ज्यूस अर्थात अननसाच्या ज्यूसमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक असतात. यामुळे दृष्टी चांगली राहते. यातलं बीटाकॅरोटीन आणि व्हिटॅमिन एमुळे डोळ्यांच्या मोतिबिंदूसारख्या समस्या दूर होतात. अननसात व्हिटॅमिन सी, फायबर आणि पोटॅशियम मुबलक असतं. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. पायनॅपल ज्यूसमुळे पचनशक्ती सुधारते. तसंच संसर्ग टाळता येतो. यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं. याव्यतिरिक्त यामध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट्स संधिवात, हृदयरोग आणि अनेक प्रकारचे कॅन्सर यांसारख्या गंभीर आजारांपासूनदेखील संरक्षण करतात.

बीअरमुळे डिमेन्शिया बरा होऊ शकतो, असं अनेक संशोधनांमधून स्पष्ट झालं आहे. आपल्या मेंदूच्या पेशी जाळ्यानं वेढलेल्या असतात. त्या विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात. उंदरांवर केलेल्या अभ्यासातून असं दिसून आलं आहे, की बीअरप्रमाणेच कमी प्रमाणात अल्कोहोल घेतलं, तर मेंदूतली ही प्रणाली अधिक कार्यक्षम बनण्यास मदत होते. बीअरमुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो, असा दावा यापूर्वीच्या संशोधनातून करण्यात आला आहे. मर्यादित प्रमाणात बीअर घेतली तर पुरुष, तसंच महिलांची खासकरून मेनोपॉजनंतर हाडं मजबूत होतात. काही बीअरमध्ये कॅलरीजचं प्रमाण जास्त असतं. अशी बीअर प्यायल्याने वजन वाढू शकतं; पण बीअरमुळे अनेक प्रकारच्या वेदना दूर होऊ शकतात. टोमॅटोमध्ये अनेक पोषक घटक असतात. रोज टोमॅटो ज्यूस प्यायल्यास ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी होतो. टोमॅटो सेवनामुळे एडिपोनेक्टिन हॉर्मोनची पातळी वाढते. या हॉर्मोनमुळे हा आजार दूर राहतो. टोमॅटो ज्यूसमुळे पचनशक्ती वाढते. ब्लड क्लॉटिंगची समस्या दूर होते. तसंच बॅड कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते. वजन कमी होण्यासाठी, डोळ्यांचे विकार टाळण्यासाठी टोमॅटो ज्यूस हा उत्तम पर्याय आहे. कॉफी आरोग्यासाठी फायदेशीर असते, असं अनेक संशोधनांमधून स्पष्ट झालं आहे; पण नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार, ज्या व्यक्ती नियमित कॉफी पितात त्यांचा अकाली मृत्यू होण्याची शक्यता 17 टक्क्यांनी कमी होते. कारण एक कप कॉफीत लिव्हरचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी आवश्यक गुणधर्म असतात. यामुळे माणसाची रोग प्रतिकारशक्ती आणि आयुर्मान वाढतं. कॉफीमुळे शरीरातली ऊर्जा वाढते. यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते. डायबेटीस टाइप-2 असलेल्या रुग्णांसाठी कॉफी लाभदायक मानली जाते. जिन आणि टॉनिक हा कॉकटेलचा एक प्रकार आहे. तो जिन (अल्कोहोलचा प्रकार) आणि टॉनिक वॉटरपासून (सोडा ड्रिंक) तयार केला जातो आणि त्यात बर्फ घालून सर्व्ह केला जातो. यामुळे ताप, खोकला, शिंका येणं, सर्दीची लक्षणं दूर होतात. पोटाच्या आरोग्यासाठी हे कॉकटेल उत्तम आहे. यामुळे अन्नाच्या कणांचं विघटन करून पचनास मदत करणाऱ्या एन्झाइम्सची संख्या वाढते. तसंच अंगावरची सूज कमी करण्यासही हे कॉकटेल उपयुक्त ठरतं. पेय कोणतंही असलं तरी मर्यादित प्रमाणात घेतलं तरच ते आरोग्यासाठी लाभदायक ठरतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या