JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हुश्श! भविष्यात येणारं 'ते' मोठं संकट अखेर टळलं; तज्ज्ञांनी दिला दिलासा

हुश्श! भविष्यात येणारं 'ते' मोठं संकट अखेर टळलं; तज्ज्ञांनी दिला दिलासा

आकाशातून एक मोठं संकट धरतीवर येत होतं.

जाहिरात

Asteroid Attack

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 04 जुलै : पृथ्वीच्या संदर्भात अंतराळातल्या ग्रहताऱ्यांचं निरीक्षण (Space Research) खगोलशास्त्रज्ञांकडून सतत सुरू असतं. अंतराळातल्या ग्रह-ताऱ्यांचा, त्यांच्या कक्षांचा अभ्यास करून त्याचा पृथ्वीवर काही परिणाम होणार आहे का, याची चाचपणी ते करतात. अशाच एका निरीक्षणातून पृथ्वीला काही वर्षांनी एक लघुग्रह (Asteroid) धडकण्याचा धोका शास्त्रज्ञांनी वर्तवला होता. गेल्या वर्षी अंतराळात फिरणारा एक लघुग्रह पृथ्वीला 2 एप्रिल 2052 रोजी धडकणार असल्याचं गणित अ‍ॅरिझोनातल्या टक्सनमधल्या माउंट लेमॉन ऑब्झर्वेटरीनं मांडलं होतं; मात्र हा लघुग्रह आता पृथ्वीला धडकणार नसल्याचा दिलासा आता युरोपियन स्पेस एजन्सीनं (ESA) दिला आहे. त्यासाठी सर्वांत मोठ्या दुर्बीणीतून निरीक्षण करण्यात आलं. खगोलशास्त्रज्ञ अंतराळात फिरणाऱ्या लघुग्रहांचं सतत निरीक्षण करत असतात. लघुग्रह (Asteroid) म्हणजे अंतराळात फिरणारे काही लहान लहान खडक असतात. या लघुग्रहांची कक्षा काय आहे, त्यांच्या कक्षेत पृथ्वी आली, तर त्याचा काय परिणाम होईल, याचे आडाखे या निरीक्षणांमधून ते बांधत असतात. गेल्या वर्षी 28 ऑगस्टला (28 August 2021) माउंट लेमॉन ऑब्झर्वेटरीनं ‘2021 QM1’ हा लघुग्रह पहिल्यांदा शोधला. दररोज अशा अनेक लघुग्रहांचा शोध लागत असतो. त्यामुळे यात शास्त्रज्ञांना काही वेगळं वाटलं नाही; मात्र संशोधनाअंती शास्त्रज्ञांना या लघुग्रहाबाबत काळजी वाटू लागली. ‘ईएसए’चे प्लॅनेटरी डिफेन्स प्रमुख रिचर्ड मोइस्ल या लघुग्रहाचं निरीक्षण करत असल्यानं त्यांना त्याविषयी थोडी वेगळी शंका आली. हा लघुग्रह 50 मीटर रुंद होता. तो पृथ्वीला धडकण्याची शक्यता निरीक्षकांना सुरुवातीला वाटली. त्यामुळे स्पेस एजन्सीनं त्याला ‘रिस्क लिस्ट’मध्ये (Risk List) टाकलं होतं. पृथ्वीला ज्या लघुग्रहांपासून धोका आहे, त्यांना या लिस्टमध्ये टाकलं जातं. हे वाचा -  Navgrah Upay: पाण्यामध्ये या गोष्टी घालून करा स्नान; लगेच नवग्रह दोष होतील गायब “सुरुवातीच्या निरीक्षणांमध्ये आम्हाला त्या लघुग्रहाच्या कक्षेविषयी माहिती मिळाली. त्यावरून आम्ही भविष्यातला अंदाज बांधला. सूर्याच्या चारही दिशांना हा ग्रह भविष्यात कसा फिरेल याचा अंदाज आम्ही बांधला होता. त्यावरून हा लघुग्रह 2052मध्ये पृथ्वीला धडकेल असं गणित आम्ही मांडलं. अर्थात हा निष्कर्ष काही रात्रींच्या निरीक्षणावरून काढला गेला होता; मात्र नंतरच्या दिवसांत त्याला पाहणंही अवघड झालं,” असं रिचर्ड मोइस्ल यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केलं आहे. थोड्याच कालावधीसाठी निरीक्षण करून काढलेल्या अनुमानामध्ये संदिग्धता असू शकते. म्हणूनच लघुग्रह शोधल्यानंतर ते रिस्क लिस्टमध्ये टाकले जातात व काही दिवसांनंतर त्यातून काढले जातात. त्या लघुग्रहांची पुरेशी माहिती मिळाली, की मगच ते धोकादायक आहेत की नाही हे ठरवलं जातं. ‘2021 QM1’ या लघुग्रहाबाबत मात्र तसं झालं नाही. पृथ्वीला धडकण्याचा धोका लक्षात आल्यानंतर काहीच कालावधीत हा लघुग्रह सूर्याच्या कक्षेच्या जवळ गेला. सूर्याच्या प्रकाशामुळे त्याला पाहणंही शक्य झालं नाही. सध्याच्या कक्षेत हा लघुग्रह “पृथ्वीपासून लांब जात आहे, हे आम्हाला कळत होतं. म्हणजेच तो लांब गेल्यामुळे शोधणंही अशक्य होईल, इतका तो क्षीण झाला होता; पण ते सिद्ध होण्यासाठी आम्हाला काही काळ वाट पाहावी लागली,” असं ईएसएच्या Near-Earth Object Coordination Centreमधले (NEOCC) खगोलशास्त्रज्ञ मार्को मिशली यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. हे वाचा -  आरोग्याबरोबर जीवनातील अनेक समस्या दूर करते नारळ, मिळू शकते शनी दोषातून मुक्ती चिलीमधल्या ईएसएच्या सगळ्यात मोठ्या दुर्बिणीतून (Very Large Telescope, VLT) हा लघुग्रह पाहण्यासाठी तयारी होती. सूर्याच्या प्रकाशातून बाहेर आल्यावर हा लघुग्रह पाहता येणार होता. त्यानुसार लगेचच त्या लघुग्रहाचं निरीक्षण करून त्याबद्दलचा निष्कर्ष खगोलशास्त्रज्ञांनी काढला आहे. त्यानुसार, आता हा लघुग्रह पृथ्वीपासून लांब गेला असल्याने पृथ्वीला त्यापासून कोणताही धोका नाही. त्यामुळेच आता त्याला रिस्क लिस्टमधून काढून टाकण्यात आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या