bone strength
मुंबई, 25 ऑक्टोबर: दैनंदिन आयुष्य हे धकाधकीचं आहे. आहाराच्या अनियमित वेळा, प्रवास, कामाचा ताण यामुळे तब्येतीकडे दुर्लक्ष होतं. परिणामी, लहान वयात तब्येतीच्या समस्या गंभीर बनतात. तब्येतीच्या तक्रारींमध्ये महत्त्वाची समस्या म्हणजे हाडं कमकुवत होणं, हाडं ठिसूळ झाल्यानं तुटणं. आहारातल्या त्रुटींमुळे या समस्या उद्भवतात. शरीरातलं कॅल्शियमचं प्रमाण कमी झाल्यास हाडं कमकुवत होतात. वयोमानामुळे शरीरातलं कॅल्शियम कमी होतं. परंतु, हल्ली तरुणांमध्येही या समस्येचं प्रमाण वाढलेलं आहे. यालाच ऑस्टिओपोरॉसिस (Osteoporosis) म्हणतात. त्याबद्दल जनजागृती करण्यासाठी 20 ऑक्टोबरला जागतिक ऑस्टिओपोरॉसिस दिन पाळला जातो. हाडं कमजोर झाल्यास सांधेदुखी वाढते; पण हाडं कमकुवत किंवा ठिसूळ बनण्यापूर्वी शरीराकडून काही संकेत मिळायला सुरुवात होते. हे संकेत कुठले आणि कसे ओळखायचे याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊ. याबद्दलची माहिती देणारं वृत्त ‘आज तक’ने दिलंय. 1. हाताची पकड कमकुवत होणं शरीराशी निगडित विविध समस्यांवर वैद्यकीय क्षेत्रात संशोधन सुरू असतं. या संशोधनातून असं आढळलंय की, हाताची पकड आणि मनगट, तसंच पाठीचा कणा आणि Hip Bone यांची सक्षमता परस्परावलंबी असते. रजोनिवृत्तीनंतर स्त्रियांच्या शरीरातल्या हाडांच्या सक्षमतेबद्दल झालेल्या संशोधनात एक गोष्ट आढळून आली. त्यानुसार स्त्रियांच्या हाताची पकड किती मजबूत आहे यावर हाडांची कार्यक्षमता अवलंबून असल्याचं लक्षात आलं. 2. नखं कमकुवत होणं आणि तुटणं कॅल्शियम आणि कोलॅजेनच्या कमतरतेमुळे नखं कमकुवत होतात आणि तुटतात. कॅल्शियम आणि कोलॅजन हाडं मजबूत ठेवण्याचं काम करतात. नखं वारंवार तुटणं हा तुमच्या शरीरातलं पोषक घटकांचं प्रमाण कमी झाल्याचा संकेत मानला जातो. परिणामी, हाडं कमकुवत व ठिसूळ होण्याचं ते एक लक्षण आहे. हेही वाचा - अनेक तास एकाच जागी बसून काम करताय? मग हे एकदा वाचाच 3. स्नायू आणि हाडांमध्ये वेदना होणं व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम यांसारखे पोषक घटक हाडांसाठी उपकारक ठरतात. या घटकांच्या कमतरतेमुळे स्नायूंमध्ये पेटका किंवा गोळा येणं, सांधेदुखी, हाडांमध्ये वेदना होणं यासारख्या तक्रारी उद्भवतात. यासाठी पौष्टिक आणि सकस आहार गरजेचा ठरतो. 4. शरीराला बाक येणं किंवा पोक काढून चालणं फ्रॅक्चर झाल्यावर हाडांच्या सक्षमतेवर परिणाम होतो. हाडांची झालेली झीज, हानी भरून यायला वेळ लागतो. वय वाढल्यावर हाडं कमकुवत होतात. त्यामुळे चालताना अनेक जण पुढे वाकून चालतात. तसंच पाठीवर काही ओझं नसलं तरी ज्या व्यक्ती पोक काढून चालतात, त्यांची हाडं कमकुवत झाल्याचं ते एक लक्षण असू शकतं. त्याचप्रमाणे बसण्याची पद्धत चुकीची असल्यास पाठीच्या कण्याजवळचे स्नायू दुखावले जातात. परिणामी, कालांतराने हाडं कमकुवत बनतात. 5. फिटनेसच्या तक्रारी तुमच्या तब्येतीच्या तक्रारी वारंवार उद्भवत असतील, तर तुम्ही फिटनेसकडे लक्ष देणं गरजेचं आहे. अनेकदा हाडं कमकुवत झाल्यास तब्येतीच्या तक्रारी वाढतात. संशोधनात असं दिसून आलंय, की वजन कमी करण्यासाठी जो व्यायाम केला जातो, त्यात हाडांचं नुकसान कमी होते. कॅल्शियम आणि हाडं मजबूत होण्यासाठी उपयुक्त पेशींच्या माध्यमातून हाडं अधिक मजबूत होतात.
6. हृदयाची धडधड वाढणं एका मिनिटाला हृदयाचे ठोके 60 ते 100 इतके असतात. तज्ज्ञांच्या मते, मिनिटाला 80 किंवा त्यापेक्षा जास्त ठोके पडल्यास हिप्स, पेल्विस आणि स्पाइन फ्रॅक्चर होण्याची शक्यता वाढते. हृदयाच्या ठोक्यांवरून तुमच्या तब्येतीची पारख करता येते. 7. हिरड्या कमकुवत होणं हाडं कमकुवत झाल्यास हिरड्यामध्ये वेदना जाणवायला लागतात. हिरड्यांमुळे दात मजबूत राहतात; पण वयोमानानुसार हाडांप्रमाणेच हिरड्याही कमजोर होतात. हिरड्या कमकुवत झाल्यास दात पडण्याची शक्यता असते. हाडं मजबूत आणि कणखर असतील, तर शरीरही तंदुरुस्त राहतं. यासाठीच हाडांशी निगडित कोणत्याही समस्येकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणं हितावह ठरेल.