JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / World No Tobacco Day: आजच सोडा धूम्रपान, अन्यथा या गंभीर आजारांना पडाल बळी

World No Tobacco Day: आजच सोडा धूम्रपान, अन्यथा या गंभीर आजारांना पडाल बळी

2020 मध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगानं मृत्यू होणाऱ्यांचं प्रमाण अधिक होतं असं जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) म्हटलं आहे. या कर्करोगाचं मुख्य कारण आहे धूम्रपान (Smoking).

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 31 मे : जगभरात कर्करोगानं (Cancer) होणाऱ्या मृत्यूंमध्ये फुफ्फुसाचा कर्करोग (Lungs Cancer) हे महत्त्वाचं कारण आहे. फुफ्फुसाच्या कर्करोगानं होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण 19 टक्के आहे. 2020 मध्येदेखील फुफ्फुसाच्या कर्करोगानं मृत्यू होणाऱ्यांचं प्रमाण अधिक होतं असं जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) म्हटलं आहे. या कर्करोगाचं मुख्य कारण आहे धूम्रपान (Smoking). आज जागतिक तंबाखूविरोधी दिन (World No Tobacco Day) आहे. त्या निमित्ताने धूम्रपानाच्या घातक परिणामांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्याविषयी काही वैद्यकीय तज्ज्ञांनी माहिती दिली आहे. ‘मिड डे डॉट कॉम’नं दिलेल्या वृत्तानुसार, सिगरेट ओढणाऱ्या लोकांना फुफ्फुसाचा कर्करोग होण्याची किंवा त्यामुळे मृत्यू होण्याची शक्यता धूम्रपान न करणाऱ्या लोकांच्या तुलनेत 15 ते 30 पट जास्त असते. दिवसातून काहीच सिगरेट्स (Cigarettes) ओढल्या किंवा अधूनमधून ओढल्या तरीही हा कर्करोग होऊ शकतो; मात्र दीर्घ काळ आणि मोठ्या प्रमाणात सिगरेट ओढणाऱ्या व्यक्तीला अधिक धोका असतो. सिगरेटमध्ये मुख्य घटक असतो तंबाखू. तंबाखू आरोग्यासाठी हानिकारक असते; मात्र तंबाखूचं सिगरेट किंवा धूर येणाऱ्या पद्धतीनं सेवन करणं अन्य प्रकारच्या सेवनापेक्षा अधिक धोकादायक असतं. तंबाखूच्या धुरामध्ये सुमारे सात हजार संयुगं असतात. त्यातली बरीचशी विषारी असतात. तंबाखू चावून खाल्ल्यानं तोंडाचा कर्करोग आणि दात, हिरड्यांचे आजार, तसंच हृदयाशी संबधित आजार होतात, अशी माहिती मेंगलोरच्या के. एस. हेगडे हॉस्पिटलचे ऑन्कोलॉजिस्ट विजीथ शेट्टी यांनी दिली. कारच्या बॅटरीमध्ये (Car Battery) किंवा रस्ते तयार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या डांबरात ज्याचा उपयोग केला जातो अशी कॅडमियमसारखी अनेक प्रकारची रसायनं सिगरेट्समध्ये असतात. त्यामुळे धूम्रपान न करणं हेच उत्तम आरोग्यासाठी श्रेयस्कर असतं, असं सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट अनिल हेरूर यांनी सांगितलं. धूम्रपानामुळे शरीरात कोणत्याही भागाचा कर्करोग होऊ शकतो. स्वरयंत्र, मूत्रमार्ग, मूत्राशय, ग्रीवा, अन्ननलिका, यकृत, फुफ्फुस, स्वादुपिंड, पोट, गुदाशय, घसा, जीभ आणि टॉन्सिल इत्यादींसह अन्य भागाचा कर्करोग होण्याची आणि इतर आजारांची शक्यताही अधिक असते, अशी माहिती बेंगळुरूच्या एचसीजी हॉस्पिटलचे ऑन्कोलॉजिस्ट श्रीनिवास बी. जे यांनी दिली. सध्या पसरलेल्या कोविड19च्या साथीत धूम्रपान न करणार्‍यांच्या तुलनेत धूम्रपान करणार्‍या व्यक्तींमध्ये कोविडसह इतर गंभीर आजार होण्याचं प्रमाण अधिक आढळलं आहे. हा विषाणू प्रामुख्यानं फुफ्फुसांवर हल्ला करतो आणि धूम्रपान फुफ्फुसांना कमकुवत करतं. त्यामुळे कोविड आणि इतर आजारांवर मात करणं अवघड होतं, असं मत बेंगळुरूमधील एस्टर सीएमआय हॉस्पिटलचे ऑन्कोलॉजिस्ट डॉ. आदित्य मुरली यांनी व्यक्त केलं आहे. धूम्रपान सोडल्यानंतर 9 महिन्यांच्या आत फुफ्फुसांची क्षमता 10 टक्क्यांपर्यंत सुधारते. त्यामुळे खोकला कमी होतो आणि सहजतेनं श्वास घेता येतो. वयाच्या विशी-तिशीत धूम्रपान करण्याचा फुफ्फुसांवरील परिणाम जाणवत नाही. परंतु नंतर वयानुसार फुफ्फुसांची क्षमता कमी होते. मोठ्या वयात फुफ्फुसांची क्षमता चांगली असणं म्हणजे निरोगी वृद्धावस्थेचं द्योतक आहे. धूम्रपान सोडल्यानंतर 2 ते 12 आठवड्यांच्या आत रक्ताभिसरण सुधारतं. यामुळे चालणं आणि धावणं यांसारख्या क्रिया सहजपणे करता येतात. धूम्रपान बंद केल्यानंतर मानसिक तणाव कमी होतो. तणावग्रस्त असताना धूम्रपान करण्याऐवजी ताणतणावाला तोंड दिल्यास त्याचा अधिक फायदा होतो. धूम्रपान थांबवल्यानं प्रजनन क्षमता सुधारते. महिलांमध्ये धूम्रपान सोडल्यास गर्भाशयातील अस्तराचा दर्जा सुधारतो. पुरुषांमध्ये अधिक चांगल्या दर्जाचे शुक्राणू तयार होतात. यामुळे निरोगी बाळाला जन्म देण्याची शक्यता वाढते. धूम्रपान करणाऱ्या लोकांचा कर्करोग, हृदयरोग आणि फुफ्फुसांचा आजारानं लवकर मृत्यू होतो. वयाच्या 30व्या वर्षापर्यंत धूम्रपान सोडणाऱ्या लोकांचं आयुष्य दहा वर्षांनी वाढतं. जे 60व्या वर्षी ही सवय सोडतात त्यांचं आयुष्य 3 वर्षांनी वाढतं. त्यामुळे ही सवय जितक्या लवकर सोडली जाईल, तितकं आयुष्य वाढतं. निरोगी दीर्घायुष्य हवं असेल तर धूम्रपान न करणंच उत्तम.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या