नवी दिल्ली, 29 सप्टेंबर : हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या इतर आजारांची प्रकरणे जगभरात झपाट्याने वाढत आहेत. या आजारांमुळे तरुणांना देखील जीव गमवावा लागत आहे. वर्ल्ड हार्ट फेडरेशनच्या अहवाला नुसार, जगात दरवर्षी 1.86 कोटी लोकांचा मृत्यू हृदयाशी संबंधित आजारांमुळे होतो. मोठ्या संख्येने लोक या संबधीच्या रोगाची सुरुवातीची लक्षणे ओळखू शकत नाहीत. या आजारांबाबत जनजागृतीचा अभाव आहे. हृदयाशी संबंधित आजारांबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी 29 सप्टेंबर रोजी जागतिक हृदय दिन साजरा केला जातो. हृदयविकाराची मुख्य कारणे कोणती आणि त्यापासून दूर राहून निरोगी कसे राहायचे हे आज हृदयरोगतज्ज्ञांकडून जाणून घेणार आहोत. जाणून घ्या हृदयविकाराचे प्रमुख कारण - अपोलो हॉस्पिटल, नवी दिल्ली येथील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. वनिता अरोरा सांगतात की, आजच्या युगात तरुणांना हृदयविकाराचा झटका, कार्डियक अरेस्ट आणि हृदयविकाराच्या इतर आजारांनी ग्रासले आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे खराब जीवनशैली आणि अनहेल्दी चुकीच्या सवयी. धकाधकीच्या जीवनात, बहुतेक लोकांना तणावाचा सामना करावा लागतो, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचे ते कारण बनू शकते. उच्च रक्तदाब, मधुमेह, हाय लिपिड्स, कौटुंबिक इतिहास, लठ्ठपणा, खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि शारीरिक हालचालींशिवाय बैठी जीवनशैली यांमुळे तरुणांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढत आहे. इतर घटकांबद्दल बोलायचे तर, धूम्रपान, दारू, प्रदूषण, जंक फूड यासह अनेक घटक हृदयविकाराला कारणीभूत आहेत. हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे - डॉ.वनिता अरोरा सांगतात की चेस्ट म्हणजेच छातीत जास्त वेदना होणे, हे हृदयविकाराचे महत्त्वाचे लक्षण असू शकते. छातीत दुखण्याच्या वेदना हळूहळू खांदे आणि जबड्यापर्यंत पोहोचल्या तर ते हृदयविकाराचे मोठे लक्षण असू शकते. छातीत जड वाटणे, श्वास घेण्यास त्रास होणे, अचानक घाम येणे ही हृदयविकाराची प्रमुख लक्षणे आहेत. अशा परिस्थितीत, विलंब न करता, हृदयरोगतज्ज्ञांशी संपर्क साधावा. निष्काळजीपणामुळे मृत्यू होऊ शकतो. हृदय कसे तंदुरुस्त ठेवायचे? सर्वप्रथम तुम्हाला तुमची जीवनशैली सुधारावी लागेल. झोपण्याची, उठण्याची, खाण्या-पिण्याची वेळ निश्चित केली पाहिजे. पोषक तत्वांनी युक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा. जंक फूडपासून दूर राहिले पाहिजे. जंक फूड, बेकरी फूड खाणे हानिकारक आहे. जर तुम्ही मधुमेह किंवा रक्तदाबाचे रुग्ण असाल तर रक्तातील साखर आणि बीपी नियंत्रणात ठेवा. त्यामुळे तुमचे हृदय धोक्यांपासून लांब राहील. शारीरिकदृष्ट्या सक्रिय असणे आणि दररोज 40 मिनिटांत 4 किमी वेगात चालणे खूप फायदेशीर ठरू शकते. यामुळे हृदय मजबूत होते. हे वाचा - फिट आणि तंदुरुस्त सेलिब्रिटींना कसा काय हार्ट अटॅक येतो? सर्वांनीच या गोष्टींची काळजी घ्यावी व्यायामशाळेत जाण्यापूर्वी (जीम जॉईन करण्यापूर्वी) एकदा हृदयरोगतज्ज्ञांकडून तपासणी करा. चांगली बॉडी बनवण्याच्या प्रयत्नात कोणत्याही प्रकारचे सप्लिमेंट घेऊ नका. जास्त तणावामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. ताण व्यवस्थापन खूप महत्त्वाचे आहे. तणावामुळे अनेक गंभीर आजार होतात. शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्याचीही काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. जर तुम्ही मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल तर तुमचे हृदयही मजबूत होईल. हे वाचा - हृदयविकाराचा झटका कोणालाही येतोय; आजपासून खाण्याच्या सवयींमध्ये करा हे बदल तुमचे वजन नियंत्रणात ठेवा. लठ्ठपणा कमी करून हृदयविकाराचा धोका कमी करता येतो. वजनावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. धूम्रपानामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. दारू पिणे देखील धोकादायक आहे. या दोन गोष्टींपासून अंतर ठेवा. इतर हार्ट संबंधी बातम्या » येथे वाचा