नवी दिल्ली, 30 जुलै : जगभरात गेल्या दीड वर्षांपासून धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाला (Corona) प्रतिबंध घालण्यासाठी बाजारात सध्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या लसी (Vaccines) उपलब्ध आहेत. मात्र सध्या बाजारात असलेल्या लसींपेक्षा कैक पट अधिक शक्तीशाली अँटिबॉडिज (Antibodies) जर्मनीत (Germany) तयार होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या अँटिबॉडिज कोरोनाच्या सध्याच्या स्ट्रेनवरही प्रभावी ठरू शकतात, असा दावा वैज्ञानिकांनी (Scientists) केला आहे. शेळीच्या रक्तापासून अँटिबॉडिज सध्या उपलब्ध असलेल्या लसींच्या वापरातून किंवा शरीर तयार असलेल्या कोरोना प्रतिबंधक अँटिबॉडिजचा अभ्यास जर्मनीतील शास्त्रज्ञ करत आहेत. कुठल्या प्रकारे तयार झालेल्या अँटिबॉडिज या अधिक सक्षम ठरतात, याचेदेखील परीक्षण सुरू आहे. त्यातच शेळीच्या रक्तापासून तयार करण्यात आलेल्या अँटिबॉडिज या अधिक परिणामकारक ठरतील, अशी शास्त्रज्ञांना अपेक्षा आहे. सध्याच्या अँटिबॉडिच्या क्षमतेपेक्षा 1 हजार पट अधिक क्षमता या नव्यानं संशोधित करणाऱ्या अँटिबॉडिजमध्ये असल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. असा होतो परिणाम नव्यानं संशोधित करण्यात आलेल्या अँटिबॉडिज या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवायला मदत करतात. शरीरात कोरोना व्हायरसचा शिरकाव झाल्यानंतर या अँटिबॉडिज त्या व्हायरसच्या पेशींना चिकटून बसतात. त्यामुळे काही काळातच व्हायरस निष्क्रिय होतो, असं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. या अंटिबॉडिज तयार करण्यासाठी येणारा खर्च हा सध्याच्या लसींपेक्षा अत्यल्प असल्यामुळे अधिकाधिक लोकांसाठी यापासून तयार झालेली लस फायद्याची ठरणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. हे वाचा - श्रीलंकेत टीम इंडियांवर COVID-19 चं सावट, 2 महत्त्वाच्या खेळाडूंना कोरोनाची लागण शेळीच्या रक्तापासून तयार झालेल्या या लसींवर अद्याप केवळ संशोधन सुरू आहे. त्याची प्रत्यक्ष माणसांवर जेव्हा चाचणी कऱण्यात येईल आणि ट्रायलच्या सर्व फेज पूर्ण होतील, त्यानंतरच याची खरी क्षमता स्पष्ट होणार आहे. या प्रकारच्या लसीचे दुष्परिणाम होऊ शकतात का, यावरदेखील संशोधन सुरू आहे. मात्र हे सर्व टप्पे लसीनं पार केले, तर मात्र गरीब देशांसाठी ही लस वरदान ठरण्याची शक्यता आहे.