मुंबई, 22 जुलै : झुरळ तसं काही करत नसलं तरी आपल्या अंगावर चढलं तरी आपल्याला भीती वाटते. असं झुरळ आपल्या शरीराच्या एखाद्या भागातून आत गेलं तर काय होईल… याची कल्पना न केलेलीच बरी. सिंगापूरमध्येमधील एका महिलेसोबत हे घडलं. तिने आपला हा धक्कादायक अनुभव सांगितला आहे. झोपेत तिच्या कानात झुरळ घुसलं आणि त्यानंतर तिची अवस्था अत्यंत भयंकर झाली. आता कानात काहीही गेलं की आपण स्वतः सर्वात आधी ते बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणार. असाच प्रयत्न या महिलेनेही केला. झोपेतून उठल्यावर कानात घुसल्याचं समजताच तिने कान हलवून त्याला बाहेर काढू लागली. तरी झुरळ बाहेर न आल्याने ती इतकी घाबरली की तिने घाईघाईत माऊथवॉश घेतलं आणि कानात ओतलं. हे वाचा - धक्कादायक! आईच्या चहाच्या तलफेमुळे बाळाची भयंकर अवस्था; एक वर्षाच्या चिमुकल्याची करावी लागली सर्जरी माऊथवॉश कानात ओतल्यानंतर आधी कानातून झुरळ फडफडण्याचा येणारा आवाजही बंद झाला. त्यानंतर तिने कानात छोटा चिमटा घातला आणि त्याच्या मदतीने झुरळाला बाहेर काढू लागली. पण झुरळाचा काही भागच तुटून चिमट्यात आला. काही केल्या झुरळ काही पूर्ण कानातून बाहेर येत नव्हतं. इतके प्रयत्न करून थकल्यानंतर अखेर तिने रुग्णालयात धाव घेतली. डॉक्टरांनी तिच्या कानातील झुरळ बाहेर काढलं. पण तिच्या कानात त्या झुरळाचे तुकडे झाले होते. त्यांनी तुकड्यातुकड्यांमध्येच झुरळाला कानातून बाहेर काढलं. 3.5 ते 4 सेमी लांबीचा हा झुरळ होता. झुरळ काढण्याची ही प्रक्रियाही वेदनादायी होती. त्यानंतर डॉक्टरांनी अँटीबॅक्टेरिअल ड्रॉप दिल्याचंही तिने सांगितलं.