प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Shutterstock)
मुंबई, 22 जुलै : एकिकडे कोरोनाव्हायरसची प्रकरणं वाढत आहेत. अशात मंकीपॉक्सनेही भारतात शिरकाव केला आहे आणि मंकीपॉक्सचेही नवीन रुग्ण आढळून येत आहेत. आता आणखी एक रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. केरळमध्येच मंकीपॉक्सचा तिसरा रुग्ण सापडला आहे. त्यामुळे आता चिंता अधिक वाढली आहे. केरळमध्ये कोल्लममध्ये 14 जुलैला मंकीपॉक्सचं पहिलं प्रकरण समोर आलं. हाच भारतातील पहिला मंकीपॉक्सचा रुग्ण. त्याला तीव्र ताप होता आणि त्याच्या शरीरावर चकत्या होत्या. 12 जुलैला तो यूएईहून भारतात आला. यूएईमध्ये एका मंकीपॉक्स संक्रमित रुग्णाच्या संपर्कात तो आला होता. त्यानंतर 18 जुलैला कन्नूररमध्ये दुसरा रुग्ण आढळला. 31 वर्षाचा हा रुग्णही दुबईतून आला होता. 13 जुलैला तो दुबईहून परतला आणि त्यानंतर हळूहळू त्याच्यात लक्षणं दिसू लागली. त्याच्यातील लक्षणंही पहिल्या रुग्णासारखीच होती. तर आता आढळलेला मलाप्पुरमधील तिसरा रुग्णही यूएईमधून परतला आहे. 6 जुलैला तो यूएईहून भारतात आला, 13 जुलैला त्याच्यात लक्षणं दिसू लागली.
भारतात आढळलेले तिन्ही मंकीपॉक्सचे रुग्ण परदेशातून आलेले आहेत आणि त्यांच्यातील लक्षणं सारखीच आहेत. त्यांच्यावर केरळमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे वाचा - Monkeypox एड्ससारखा लैंगिक आजार आहे? संसर्गजन्य आजाराच्या तज्ज्ञांनी काय सांगितलं वाचा मंकीपॉक्सचा झपाट्याने प्रसार होत असल्याचे पाहून केंद्र सरकारही सावध झाले आहे. पहिला रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी आवश्यक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची चाचणी, रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांवर देखरेख आणि उपचार यांचा समावेश आहे. प्रवासासाठी गाइडलाईन्स परदेशातून परतणाऱ्या प्रवाशांना आजारी लोकांच्या संपर्कात येणे टाळावे. त्यांना जिवंत किंवा मृत वन्य प्राणी आणि उंदीर, खार, माकडे यांच्या संपर्कात येणे टाळावे. प्रवाशांना वन्य प्राण्यांचे मांस न खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आफ्रिकेतील प्राण्यांपासून बनविलेले क्रीम, लोशन आणि पावडर वापरू नका. आजारी लोक किंवा संक्रमित प्राण्यांच्या संपर्कातील कपड्यांपासून दूर रहा. संशयित रुग्ण कोणाला म्हणायचे? जे लोक गेल्या 21 दिवसांत मंकीपॉक्सने बाधित देशांमध्ये प्रवास करून परतले आहेत आणि त्यांना या आजाराची लक्षणे आहेत त्यांना संशयित रुग्णांच्या यादीत समाविष्ट केले जाईल. शरीरावर पुरळ आलं असेल, खूप ताप, डोकेदुखी, स्नायू दुखणे, अशक्तपणा आणि लिम्फ नोड्स सुजणे ही लक्षणे आहेत. संशयित रुग्ण कोणत्याही वयाचा किंवा लिंगाचा असू शकतो. हे वाचा - तुमच्या आरोग्य विमा पॉलिसीमध्ये मंकीपॉक्स कव्हर होईल का? तज्ज्ञांनी दिलंय उत्तर Monkeypoxmeter.com च्या डेटानुसार, 76 देशांमध्ये याचे रुग्ण सापडले आहेत. सर्वाधिक फटका युरोपमध्ये बसला आहे. त्याच वेळी, या रोगाने प्रभावित शीर्ष 10 देशांमध्ये ब्रिटन, स्पेन, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, पोर्तुगाल, कॅनडा, नेदरलँड्स, इटली आणि बेल्जियम यांचा समावेश आहे.