न्यूयॉर्क, 15 मे: पॅलेस्टाईनी बंडखोर (Palestinian Militants) आणि इस्रायली फौजा (Israeli Security Forces) यांच्यामध्ये जेरुसलेममधल्या (Jerusalem) अक्सा मशिदीवरून वाद सुरू आहे. या वादाने हिंसक रूप धारण केलं आहे. तीन धर्मांची पवित्र तीर्थस्थळं त्या मशिदीच्या आवारात असल्यामुळे अनेक शतकांपासून हे ठिकाण महत्त्वाचं आहे. ‘न्यूयॉर्क टाइम्स’ ने एका विशेष लेखात त्याबद्दलचा इतिहास उलगडून दाखवला आहे. अक्सा मशीद (Aqsa Mosque) अक्सा मशीद हे इस्लाम धर्मातल्या सर्वांत पवित्र स्थळांपैकी एक आहे. ख्रिश्चन, ज्यू आणि मुस्लिम या तीन धर्मांसाठी पवित्र असलेल्या ‘ओल्ड सिटी ऑफ जेरुसलेम’मध्ये ही मशीद हराम अल शरीफ नावाच्या जागेत वसलेली असून, ती जागा 35 एकरची आहे. त्या जागेला ज्यू धर्मीय टेम्पल माउंट असं म्हणतात. अरेबिक भाषेत अक्सा या शब्दाचा अर्थ ‘लांब अंतरावरचा’ असा होतो. इस्लामिक साहित्यात त्याचा संदर्भ असून, प्रेषित मोहम्मद एका रात्रीत मक्केवरून या मशिदीत आले आणि इथून स्वर्गस्थ झाले, असं मानलं जातं. या मशिदीत एका वेळी पाच हजार जण राहू शकतात. आठव्या शतकाच्या पूर्वार्धात ही मशीद बांधून पूर्ण झाली असावी, असं मानलं जातं. सोनेरी घुमटाची ही मशीद जेरुसलेमचं प्रतीक मानली जाते. हे सगळं क्षेत्रच पवित्र असल्याचं मुस्लिम मानतात आणि मशिदीच्या आवारातही सुट्टीच्या कालावधीत मोठ्या संख्येने मुस्लिम नमाज पढतात. Explainer: ख्रिश्चन, ज्यू आणि मुस्लिमांचे या एका जागेसाठीच आहेत वाद; काय आहे महत्त्व आणि इतिहास? ज्यूंच्या (Jew) मते टेम्पल माउंट (Temple Mount) (हिब्रूमध्ये हर हबायित) ही त्यांच्यासाठी सर्वांत पवित्र जागा आहे. कारण तिथे दोन पुरातन मंदिरं होती. बायबलमधल्या उल्लेखानुसार त्यातलं पहिलं मंदिर किंग सोलोमॉनने बांधलेलं होतं आणि ते बॅबिलोनियन्सनी उद्ध्वस्त केलं. दुसरं मंदिर इसवी सनाच्या पहिल्या शतकापूर्वी 600 वर्षं उभं होतं आणि ते रोमन सम्राटांनी उद्ध्वस्त केलं. युनेस्कोने (UNESCO) ओल्ड सिटी ऑफ जेरुसलेमला (Old City of Jerusalem) आणि तिच्या भिंतींना जागतिक वारसास्थळाचा दर्जा (World Heritage Site) दिलेला आहे. मशिदीवर नियंत्रण कोणाचं? 1967मध्ये अरब आणि इस्रायली यांच्यामध्ये झालेल्या युद्धात ओल्ड सिटीच्या भागासह पूर्व जेरुसलेमवर इस्रायलने कब्जा केला. नंतरच्या काळात इस्रायलने संयुक्त जेरुसलेम ही आपली राजधानी असेल असं जाहीर केलं; मात्र त्यांच्या या कृतीला आंतरराष्ट्रीय पातळीवर कधीच समर्थन मिळालं नाही. सध्या तिथे स्टेटस को (Status Quo) म्हणजे जैसे थे स्थिती असून, ती अत्यंत नाजूक आहे. अनेक दशकं या मशिदीचं व्यवस्थापन ‘दी वक्फ’ (The Waqf) या इस्लामिक ट्रस्टकडे असून, त्या संस्थेचं नियंत्रण जॉर्डनकडे (Jordan) असून, जॉर्डनकडूनच त्या संस्थेला अर्थसाह्य केलं जातं. 1994मध्ये इस्रायल आणि जॉर्डन यांच्यामध्ये शांतता करार झाला असून, तेव्हाही जबाबदारी ‘दी वक्फ’कडेच देण्यात आली. इस्रायली जवान त्या जागेवर उपस्थित असतात आणि ‘वक्फ’शी समन्वय साधतात. ज्यू आणि ख्रिश्चनांना त्या ठिकाणी भेट देण्याची परवानगी आहे; मात्र ‘स्टेटस को’ स्थितीनुसार मुस्लिमांप्रमाणे त्यांना तेथे प्रार्थना करण्याची परवानगी नाही. टेम्पल माउंटभोवती असलेल्या भिंतीचे शिल्लक असलेले अवशेष वेस्टर्न वॉल म्हणून ओळखले जातात. त्या वॉलजवळच असलेल्या पवित्र पठाराजवळ ज्यू प्रार्थना करतात. येथे मुस्लिमेतरांबाबत भेदभाव केला जात असल्याचा आरोप केला जातो. त्यामुळे वेळोवेळी हिंसाचार उसळत असल्याचं सांगितलं जातं. इस्रायलने जेरुसलेम जिंकल्याचा दिवस जेरुसलेम डे म्हणून दर वर्षी साजरा केला जातो. तेदेखील तणाव वाढण्याचं एक कारण मानलं जातं. कारण त्यामुळे पॅलेस्टिनींच्या भावना दुखावतात. पूर्व जेरुसलेम हे भविष्यातल्या पॅलेस्टिनी राज्याच्या राजधानीचं शहर असावं, असं त्यांचं स्वप्न आहे. Explainer: इस्रायलमध्ये झपाट्याने बंद केले जात आहेत कोरोनाचे वॉर्ड! काय असेल कारण? इस्रायलला त्या जागेचा पूर्ण ताबा हवाय का? इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू (Benjamin Netanyahu) यांच्यासह इस्रायली अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे, की त्यांना स्टेटस को ही स्थिती बदलायची इच्छा नाही. इस्रायलमधल्या काही धार्मिक गटांनी मात्र त्या वादग्रस्त ठिकाणी प्रार्थना करण्याचा अधिकार मिळण्याची मागणी बरीच वर्षं लावून धरली आहे. त्या जागेवर ज्यू धर्मीय मोठ्या संख्येने भेट देत असून, हे स्टेटस को स्थितीचं उल्लंघन आहे, अशी तक्रार एप्रिल महिन्यात जॉर्डनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अधिकृतपणे केली. सध्याच्या निदर्शनांचं वेगळेपण काय आहे? मशिदीच्या कम्पाउंडशी संबंधित नसलेल्या अनेक मुद्द्यांवरून काही ज्यू आणि पॅलेस्टिनींमध्ये तणाव वाढत होता. सोमवारी (10 मे) अल अक्सा मशिदीत हिंसाचाराला तोंड फुटलं. काही आठवड्यांपूर्वीही ओल्ड सिटीच्या परिसरात इस्रायली आणि पॅलेस्टिनींमध्ये हिंसक वाद झाले होते. जेरुसलेममधल्या ऑर्थोडॉक्स ज्यू धर्मीयांवर काही पॅलेस्टिनींनी हल्ला केला. अतिरेकी विचारांच्या ज्यू धर्मीय गटाने एक मोर्चा काढून अरबांना मृत्युदंड देण्याबद्दलच्या घोषणा दिल्या. रमजान महिन्याच्या पहिल्या काही आठवड्यांत पॅलेस्टिनींना ओल्ड सिटीतल्या त्यांच्या फेव्हरिट प्लाझामध्ये एकत्र येण्यास पोलिसांनी परवानगी दिली नाही, हेही पॅलेस्टिनींच्या रागाचं एक कारण होतं. इस्रायली सेटलमेंट कन्स्ट्रक्शनला जागा करून देण्यासाठी पूर्व जेरुसलेममधल्या शेख जर्राशेजारच्या पॅलेस्टिनी रहिवाशांना इस्रायली पोलिसांकडून हाकलून दिलं जाण्याची शक्यता होती. त्यावरूनही तणावात वाढ झाली आणि पॅलेस्टिनींनी इस्रायली पोलिसांशी वाद घातला. गेल्या दोन वर्षांहून अधिक काळात इस्रायलमध्ये झालेल्या चार निवडणुका निर्णायक झाल्या नाहीत. तसंच, या महिन्यात होणार असलेल्या पॅलेस्टाइनच्या निवडणुका पॅलेस्टाइनचे अध्यक्ष महमूद अब्बास यांनी अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या आहेत. Explained : या कारणामुळे एक-दोन नव्हे सीमेवर हजारो गावं निर्माण करत आहे चीन इस्रायली-पॅलेस्टिनी वाद 1990मध्ये ज्यूंच्या काही गटांनी प्राचीन काळी उद्ध्वस्त केल्या गेलेल्या मंदिरांच्या जागी पायाभरणी करण्याची मागणी केली होती, तेव्हा हिंसाचाराला तोंड फुटलं होतं. त्यात प्राणहानीही झाली होती. तेव्हा अमेरिकेसह अनेक देशांनी इस्रायलवर टीका केली होती. 2000 साली ज्यूंचा त्या जागेवर असलेला हक्क पुन्हा सांगण्यासाठी उजव्या विचारांचे इस्रायली राजकीय नेते एरियल शेरॉन यांनी त्या जागेला भेट दिली होती. त्यामुळे इस्रायली-पॅलेस्टिनींमधील वाद विकोपाला पोहोचला होता आणि दंगल झाली. 2017मध्ये तीन अरब-इस्रायली नागरिकांनी दोन इस्रायली पोलिसांना ठार केलं. त्यामुळे दंगल उसळली होती. त्यामुळे इस्रायली प्रशासनाने त्या जागेला प्रवेश देणाऱ्यांवर निर्बंध आणले आणि तिथे मेटल डिटेक्टर्स, कॅमेरे बसवले. त्या गोष्टींचा अरबांना राग आला. त्यामुळे जॉर्डनसोबतच्या संबंधांत तणाव आला, हिंसाही झाली. शेवटी अमेरिकेला मध्यस्थी करावी लागली. नंतर इस्रायलने मेटल डिटेक्टर्स काढून टाकले.