भारत दरवर्षी संयुक्त राष्ट्रांवर खर्च करतो चिक्कार पैसे
नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर : युनायटेड नेशन्स (यूएन) ही एक आंतरशासकीय संस्था आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी, राष्ट्रांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध विकसित करण्यासाठी, आंतरराष्ट्रीय सहकार्य निर्माण करण्यासाठी ही संस्था काम करते. या संस्थेच्या स्थापनेमध्ये आणि कार्यामध्ये भारताचं मोठं योगदान आहे. ही बाब लक्षात घेऊन यूएनमधील अधिकारी अधूनमधून भारत दौऱ्यावर येतात. सध्या संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस भारत दौऱ्यावर आले आहेत. 18 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर या तीन दिवसांच्या कालावधीमध्ये ते भारतातील विविध ठिकाणी भेट देणार आहेत. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी गुटेरेस 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करतील. त्यानंतर ते आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांना संबोधित करणार आहेत. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 20 ऑक्टोबर रोजी ते गुजरातमधील केवडिया येथे होणाऱ्या ‘मिशन लाइफ’ कार्यक्रमात सहभागी होतील. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर यूएनमध्ये भारताचे स्थान किती महत्त्वाचे आहे, याबाबत आज तकनं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. यूएनच्या संस्थापक सदस्यांमध्ये भारताचा समावेश 1945 मध्ये, दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना झाली. भारत हा संयुक्त राष्ट्रांच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 1946 मध्ये दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदाचा मुद्दा संयुक्त राष्ट्रात मांडणारा भारत हा पहिला देश होता. मात्र, संस्थापक सदस्यांपैकी एक असूनही, भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं स्थायी सदस्यत्व मिळालेलं नाही. भारत दीर्घ काळापासून स्थायी सदस्यत्वाची मागणी करत आहे. सुरक्षा परिषदेच्या स्थापनेपासून आतापर्यंत भारत अस्थायी सदस्य आहे. यूएनच्या पीसकीपिंग फोर्समध्ये भारताचं मोठं योगदान संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांमध्ये योगदान देणाऱ्यांमध्ये भारत हा महत्त्वाचा देश आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या अहवालानुसार, 1950 पासून आतापर्यंत 2.53 लाखांहून अधिक भारतीय सैनिक संयुक्त राष्ट्रांच्या पीस कीपिंग फोर्सचा भाग झाले आहेत. 31 ऑक्टोबर 2020 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, भारत हा संयुक्त राष्ट्रांच्या पीस कीपिंग फोर्समध्ये सर्वाधिक योगदान देणाऱ्या देशांच्या यादीमध्ये पाचव्या स्थानावर आहे. जगभरातील आठ शांतता मोहिमांमध्ये भारतातील पाच हजार 353 सैनिक तैनात आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत आतापर्यंत 175 भारतीय जवान शहीद झाले आहेत. याशिवाय, जगभरात शांतता कार्यात तैनात असलेल्या भारतीय पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये 44 टक्के महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. वाचा - ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थ्यावर जबर हल्ला, 11 वेळा चाकूने भोसकलं संयुक्त राष्ट्राच्या बजेटमध्ये भारताचं योगदान किती? संयुक्त राष्ट्र संघात 193 देशांचा सहभाग आहे. दरवर्षी हे सर्व देश संयुक्त राष्ट्रांच्या बजेटमध्ये योगदान देतात. युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीच्या माहितीनुसार, यूएनच्या बजेटमध्ये एखादा देश कमीतकमी 0.001 टक्के ते जास्तीतजास्त 22 टक्के आर्थिक योगदान देऊ शकतो. संयुक्त राष्ट्रांच्या बजेटमध्ये अमेरिकेचं सर्वाधिक 22 टक्के योगदान आहे. भारतदेखील संयुक्त राष्ट्रांमध्ये योगदान देणाऱ्या महत्त्वाच्या देशांपैकी एक आहे. या वर्षी भारतानं 29.9 दशलक्ष डॉलर्सचं योगदान दिलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या एकूण बजेटमध्ये भारताचा एक टक्क्यांहून अधिक वाटा आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षी म्हणजे 2021 मध्ये भारताने 24.12 दशलक्ष डॉलर्सचं योगदान दिलं होतं. यापूर्वी 2020 मध्ये, भारताने 23.39 दशलक्ष डॉलर्स दिले होते तर 2014 मध्ये, भारताने 17.19 दशलक्ष डॉलर्सचं योगदान दिलं होतं. दरम्यान, संयुक्त राष्ट्रांचे दुसऱ्यांदा महासचिव बनल्यानंतर अँटोनियो गुटेरेस यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. गुटेरेस यांनी यापूर्वी ऑक्टोबर 2018 मध्ये भारताला भेट दिली होती. विशेष म्हणजे, पुढील आठवड्यात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीची भारतात बैठक होणार आहे. त्यामुळे गुटेरेस यांचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.