JOIN US
मराठी बातम्या / Explainer / Explainer: डेल्टासारखाच डबल म्युटंट असलेला कप्पा व्हेरिएंट किती घातक? भारतात वाढतेय रुग्णांची संख्या

Explainer: डेल्टासारखाच डबल म्युटंट असलेला कप्पा व्हेरिएंट किती घातक? भारतात वाढतेय रुग्णांची संख्या

Kappa Variant: सात जणांना कप्पा व्हेरिएंटचा संसर्ग झाल्याचं जीनोम सिक्वेन्सिंगमधून (Genome Sequencing) स्पष्ट झालं आहे. या कप्पा व्हेरिएंटबद्दल जाणून घेऊ या.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 14 जुलै: कोरोना विषाणू म्युटेशनद्वारे स्वतःमध्ये बदल घडवून आणत असल्यामुळे नवनवे व्हेरिएंट्स समोर येत आहेत. कोरोना विषाणूच्या डेल्टा, डेल्टा प्लस, लॅम्ब्डा या व्हेरिएंट्सनंतर भारतात आता कप्पा व्हेरिएंटचा (Kappa Variant) संसर्ग झालेले रुग्णही आढळले आहेत. राजस्थान आणि उत्तर प्रदेशात मिळून एकूण सात जणांना कप्पा व्हेरिएंटचा संसर्ग झाल्याचं जीनोम सिक्वेन्सिंगमधून (Genome Sequencing) स्पष्ट झालं आहे. या कप्पा व्हेरिएंटबद्दल जाणून घेऊया. कोरोना विषाणूचा कप्पा व्हेरिएंट म्युटेशनच्या B.1.617 या मालिकेतला आहे. याच मालिकेत डेल्टा व्हेरिएंटचाही (Delta Variant) समावेश होतो. B.1.617 या मालिकेत (Lineage) 12हून अधिक म्युटेशन्स आहेत. त्यापैकी E484Q आणि L452R ही दोन वैशिष्ट्यपूर्ण म्युटेशन्स आहेत. त्यामुळे त्याला डबल म्युटंट (Double Mutant) असं म्हणतात. उत्क्रांत होताना B.1.617 या मालिकेच्या नव्या शाखा तयार झाल्या. त्यापैकी B.1.617.2 या व्हेरिएंटला डेल्टा असं म्हणतात. भारतात हा व्हेरिएंट मोठ्या प्रमाणावर आढळला आहे. B.1.617.1 या दुसऱ्या व्हेरिएंटला कप्पा असं नाव देण्यात आलं आहे. हा व्हेरिएंट जगात पहिल्यांदा भारतातच आढळला आणि तो ऑक्टोबर 2020मध्ये पहिल्यांदा आढळला होता. कप्पा व्हेरिएंटला जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) चार एप्रिल 2021 रोजी व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट (Variant of Interest) या वर्गात समाविष्ट केलं आहे.

लहान डोक्याच्या मुलांचे फोटो आठवतायेत? हाच झिका विषाणू पुन्हा काढतोय डोकं वर; नेमका काय आहे?

ज्या व्हेरिएंट्सचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता असते किंवा जे व्हेरिएंट अनेक देशांमध्ये आढळलेले असतात, त्या व्हेरिएंट्सचा समावेश व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट या वर्गात केला जातो, असं जागतिक आरोग्य संघटना म्हणते. कोरोना विषाणूच्या जगभरातल्या वेगवेगळ्या व्हेरिएंट्सची जनुकीय माहिती (जीनोम सिक्वेन्सिंग डेटा) GISAID Initiative द्वारे नोंद केली जाते. भारताने GISAID Initiative कडे सादर केलेल्या सुमारे 30 हजार नमुन्यांपैकी 3500हून अधिक नमुने कप्पा व्हेरिएंटचे असल्याचं आढळलं आहे. गेल्या 60 दिवसांत भारताने सादर केलेल्या एकूण नमुन्यांपैकी तीन टक्के नमुने कप्पा व्हेरिएंटचे आहेत. अन्य देशांच्या तुलनेत भारत यात आघाडीवर आहे. त्याखालोखाल ब्रिटन, अमेरिका, कॅनडा आदी देशांचा क्रमांक लागतो. ‘दैनिक भास्कर’च्या वृत्तात दिलेल्या माहितीनुसार, कप्पा हा कोरोनाचा एक सर्वसामान्य व्हेरिएंट असून, त्यावर उपचार शक्य आहे. त्यामुळे चितेंचं कारण नाही, असं उत्तर प्रदेशचे अतिरिक्त मुख्य सचिव (आरोग्य) अमित मोहन प्रसाद यांनी म्हटलं आहे.

Explainer : प्रियांका विरुद्ध राहुल गांधी खरंच भावंडांमध्ये वाद आहे का?

संबंधित बातम्या

कप्पा व्हेरिएंटचा संसर्ग होण्यापासून बचाव करण्यासाठी कोरोना प्रोटोकॉलचं (Anti COVID Protocol) पालन करणं आवश्यक आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर, स्वच्छता या बाबींना पर्याय नाही. कप्पा व्हेरिएंटमध्ये असलेल्या L453R या म्युटेशनशी आपली रोगप्रतिकारशक्ती (Immunity) लढू शकत नाही, असं संशोधनात आढळलं आहे; मात्र त्यावर अद्याप सखोल संशोधन झालेलं नाही. भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस कप्पा व्हेरिएंटविरोधात कार्यक्षम असल्याचं ICMR ने काही दिवसांपूर्वीच सांगितलं होतं. तसंच, ऑक्सफर्ड विद्यापीठानेही जूनमध्ये जाहीर केलं होतं, की कोविशिल्ड लस कप्पा व्हेरिएंटविरोधात कार्यक्षम आहे. सध्या तरी भारतात कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन लशीच प्रामुख्याने दिल्या जात आहेत. अॅस्ट्राझेनेका आणि फायझर-बायोएनटेक या कंपन्यांच्या लशी घेणाऱ्यांवर करण्यात आलेल्या संशोधनानुसार, केवळ एकच डोस घेतला असेल, तर कोरोनाच्या बीटा (Beta) आणि डेल्टा व्हेरिएंटवर फारसा काही फरक पडत नाही, असं आढळलं आहे. फ्रान्सच्या पाश्चर इन्स्टिट्यूटने केलेल्या या संशोधनाचे निष्कर्ष नेचर या प्रसिद्ध जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. कप्पा व्हेरिएंट हा देखील डेल्टाप्रमाणेच डबल म्युटंट आहे. त्यामुळे लशीच्या एका डोसचा फारसा परिणाम होणार नाही, असं मानायला वाव आहे. त्यावर अधिक संशोधन होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर लशीचे दोन्ही डोस घेणं हा कप्पा व्हेरिएंटपासून बचाव करण्याचा एक उपाय ठरू शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या