JOIN US
मराठी बातम्या / Explainer / Explainer: विराट कोहलीनं टी-20 कॅप्टनपद का सोडलं? काय आहे नेमकं कारण? वाचा सविस्तर

Explainer: विराट कोहलीनं टी-20 कॅप्टनपद का सोडलं? काय आहे नेमकं कारण? वाचा सविस्तर

दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, वेस्ट इंडीज आणि श्रीलंकेमध्ये टी-20 सीरिज जिंकण्याचा विक्रम करणारा तो एकमेव कॅप्टन आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 17 सप्टेंबर : टी-20 विश्वचषक स्पर्धा (T20 World cup) तोंडावर आलेली असताना विराट कोहलीनं (Virat Kohli quits captaincy) टी-20 प्रकारातलं टीम इंडियाचं (Team India) कॅप्टनपद सोडत असल्याचं जाहीर केल्यानं क्रिकेट जगतात (Indian Cricket news) खळबळ उडाली आहे. इन्स्टाग्रामवर आपल्या या निर्णयाबाबत एक सविस्तर पोस्ट लिहून विराटनं कामाचा ताण (Work Load) हे यामागचं कारण असल्याचं म्हटलं आहे. कॅप्टनपद सोडण्यापूर्वी टीम इंडियाचे कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) आणि उपकप्तान रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यासह अनेक मित्रांशी विचारविनिमय केला असल्याचं म्हटलं आहे. तरीही अनेक प्रश्न अनुत्तरित असून, टीम इंडियाचं नेतृत्व सोडण्याचं नेमकं कारण आहे काय, याची चर्चा रंगू लागली आहे.  इंडियन एक्स्प्रेस ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. विराट कोहली (Virat Kohli) सतत 8-9 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असून, 5-6 वर्षे वन डे, टेस्ट आणि टी-20 अशा तीनही प्रकारात टीम इंडियाचं कॅप्टनपद भूषवतो आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने कॅप्टनपद सांभाळणं हे सोपं काम नाही. गेल्या वर्षी न्यूझीलंडमध्ये झालेल्या सीरिजपूर्वी त्यानं हे व्यग्र वेळापत्रक त्रासदायक ठरत असल्याचं कबूल केलं होतं. गेली आठ वर्षे प्रवास, सराव सत्र आणि खेळ असं मिळून वर्षाला 300 दिवस आपण खेळत असून, त्याचा परिणाम आपल्या खेळावर होत असल्याचं त्यानं म्हटलं होतं. त्यामुळे फक्त टी-20 (T-20 Captaincy) सोडल्यानं त्याच्यावर किंवा त्याच्या बॅटिंगवर (Bating) नेमका कसा फरक पडणार आहे, असा सवालही उपस्थित केला जात आहे. ‘विराट आणि BCCI मध्ये सर्व आलबेल नाही’, दिग्गज क्रिकेटपटूचा मोठा दावा दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, वेस्ट इंडीज आणि श्रीलंकेमध्ये टी-20 सीरिज जिंकण्याचा विक्रम करणारा तो एकमेव कॅप्टन आहे. कॅप्टन म्हणून एमएस धोनीच्या सर्वाधिक विजय नोंदवण्याच्या विक्रमाची बरोबरी तो करू शकत नसला, तरी त्याच्या विजयाची टक्केवारी उल्लेखनीय (65.11 ते 59.28) आहे. विश्वचषकातल्या कॅप्टन्समध्ये फक्त बाबर आझम (65.22) आणि अफगाणिस्तानचा अश्गर अफगान (81) यांची विजयाची टक्केवारी चांगली आहे. ऑस्ट्रेलियाच्या अॅरन फिंचनं कॅप्टन म्हणून खेळताना कोहलीपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्यामुळे टी-20मध्ये कोहलीचं नेतृत्व आणि बॅटिंगमधील कामगिरी यांचा परस्परसंबंध आहे, असं म्हणता येणार नाही. त्याची सरासरी 52 वरून 48 पर्यंत घसरली असली तरी ही घसरण अगदी किरकोळ आहे. आयपीएलमधल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या कॅप्टनपदी असताना त्यानं जिंकण्यापेक्षा जास्त सामने गमावले आहेत आणि त्याची सरासरीही 40 पेक्षा कमी होती. एक वेळ त्याने त्या संघाचं कॅप्टनपद सोडणं योग्य ठरलं असतं. गेल्या दोन वर्षांत त्यानं फक्त 15 टी-20 सामन्यांमध्ये भाग घेतला आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांचं महत्त्व लक्षात घेता, विश्वचषक किंवा एखाद्या सीरिजमधलं दडपण फारच कमी असतं. विश्‍वचषक नसलेल्या टी-20 सामन्यांमध्ये नेतृत्व करणं तर खूपच सहज असतं. कारण आजपर्यंत टी-20 सीरिज हरल्याबद्दल कोणत्याही कॅप्टनला काढून टाकण्यात आलेलं नाही. अशा परिस्थितीत टी-20च्या दबावाचं कारण देण्यामुळे चर्चा होत आहे. विराट कोहलीनं कॅप्टनसी का सोडली? सौरव गांगुलीनं सांगितलं कारण 2020च्या सुरुवातीला श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेपासून सुरुवात करून कोहलीनं 12 टेस्ट आणि 12 वन डे, 15 टी-20 आणि 22 आयपीएल मॅचेस खेळल्या आहेत. म्हणजे साधारण दर सहा दिवसांनी त्यानं एक दिवस खेळ केला आहे. 2010 मध्ये त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं तेव्हा तब्बल साडेतीन वर्षं म्हणजे जवळपास 1024 दिवस तो आंतरराष्ट्रीय किंवा आयपीएल मॅचेस खेळत होता. यात प्रवास आणि सरावाचे दिवसही धरले तर त्यानं क्वचितच ब्रेक घेतला होता. 2019 मध्ये त्याच्या मुलीच्या जन्माच्या दरम्यान त्यानं काही काळ ब्रेक घेतला होता. तेवढा कालावधी वगळता तो सातत्यानं खेळत आहे. पदार्पणापासून आतापर्यंतच्या काळातली निम्मी वर्षं त्यानं टीम इंडियाचं नेतृत्व केलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक काळ खेळ केला आहे, असा खेळाडू टी-20 मुळे खेळावर परिणाम होत असल्याचं सांगतो तेव्हा ते पटणं कठीण असतं. त्यामुळेच कोहलीच्या या निर्णयामागे अन्य काही कारणं असल्याची अटकळ बांधली जात आहे. सध्या त्याचा काहीसा खराब झालेला फॉर्म, आयसीसीच्या (ICC) महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये जेतेपद पटकावता आलेलं नसणं, टी-20 क्रिकेटमध्ये भारताच्या विजयाचं श्रेय कोहलीला न देता टीममधल्या इतर खेळाडूंसहित राखीव फळीला दिलं जाणं अशी अनेक कारणं या निर्णयामागे असल्याची चर्चा सध्या क्रिकेट जगतात सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या