FIR शिवाय पोलीस अटक करू शकतात का
मुंबई, 19 जून : कोणत्याही गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आधी त्याबाबत एफआयआर दाखल केला जातो. त्यानंतर पोलीस गुन्ह्याचा तपास करतात. काही वेळा पोलिसांचा तपास सुरू असतोही; मात्र एफआयआर दाखल न केल्यास पोलिसांना त्याबाबत अधिकृत कारवाई करता येऊ शकत नाही. तसं केल्यास ते कायदेशीर ठरत नाही. या संदर्भात गुवाहाटी उच्च न्यायालयाने नुकतंच आसाम पोलिसांना फटकारलं. अटक करण्याबाबतचे नेमके नियम काय आहेत व एफआयआर दाखल न करताच अटक होऊ शकते का याबाबत माहिती घेऊ या. एफआयआर दाखल न करताच अटक करण्यात आल्याच्या एका प्रकरणात गुवाहाटी उच्च न्यायालयाने आसाम पोलिसांची कानउघाडणी केलीय. पोलिसांनी तपास केल्यानंतर स्वतःच्या चुका झाकण्यासाठी एफआयआर दाखल करणं कायदेशीर नाही, असं न्यायालयानं म्हटलंय. बिलासीपुरा पोलिसांकडून एका प्रकरणात आधी अटक करून मग ती योग्य असल्याचं दाखवण्यासाठी एफआयआर दाखल करण्यात आला. पोलिसांचं हे वागणं चूक व मनमानी पद्धतीचं असल्याचं कोर्टानं म्हटलंय. या संदर्भात पोलिसांकडे काय अधिकार असतात हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरेल. पोलीस कोणत्याही व्यक्तीला कारण सांगितल्याशिवाय अटक करू शकत नाहीत. एखाद्या व्यक्तीला अटक करून पोलीस ठाण्यात ठेवलं, तर त्यांना कायदेशीर पद्धतीनं कारवाई करावी लागते व त्यामागचं कारणंही सांगावं लागतं. तसं न केल्यास पोलिसांवर कारवाई करता येते. भारतीय दंडसंहितेनुसार म्हणजेच सीआरपीसीच्या (CRPC) कलम 50 (1) नुसार पोलिसांना अटकेच्या आधी कारण सांगणं बंधनकारक असतं. एफआयआरशिवाय अटक करता येते? एफआयआर दाखल केल्याशिवाय अटक करण्याचा अधिकार पोलिसांकडे नसतो. नियमानुसार एखाद्या व्यक्तीनं गुन्ह्यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली, तर पोलीस त्याचा तपास करतात व मग एफआयआर दाखल करतात. त्यानंतर आरोपींबाबत काही पुरावा मिळाला, तर अटक केली जाते. अर्थात एखादी व्यक्ती गुन्ह्यामध्ये सहभागी असून त्या व्यक्तीला अटक केली नाही, तर गुन्हे थांबणार नाहीत, असं पोलिसांना वाटलं, तर पोलीस त्याला अटक करू शकतात. वाचा - पत्नी माहेरी गेल्याचा राग सासऱ्यासह मेव्हण्यावर; ठाण्यात धक्कादायक घटना महिलांसाठी नियम काय? काही प्रकरणांमध्ये अटकेचं वॉरंट नसेल, तरीही अटक करण्याचा अधिकार पोलिसांना असतो. काही गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी आरोपींना वॉरंटशिवाय पोलीस अटक करू शकतात; मात्र गुन्हा गंभीर स्वरूपाचा नसेल, तर एफआयआर आणि वॉरंट गरजेचं असतं. स्त्रियांबाबत अटकेचे नियम थोडे वेगळे आहेत. सीआरपीसीच्या कलम 46 नुसार, महिला आरोपीला केवळ महिला पोलीसच अटक करू शकतात. महिलांना सूर्योदयाआधी व सूर्यास्तानंतर अटक करता येऊ शकत नाही. थोडक्यात, गुन्ह्याच्या स्वरूपानुसार पोलिसांना अटकेबाबतचे अधिकार असतात. गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये पोलीस एफआयआर किंवा वॉरंटशिवाय अटक करू शकतात.