मुंबई, 24 सप्टेंबर : विकी डोनर फेम अभिनेता भुपेश कुमार पांड्या (Bhupesh Kumar Pandya) यांचे बुधवारी निधन झाले आहे. दीर्घकाळापासून ते कॅन्सरशी झुंज देत होते. बुधवारी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (National School of Drama) अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती देण्यात आली. NSD ने त्यांच्या ट्वीट मध्ये असे लिहले होते की, ‘विख्यात रंगकर्मी भूपेश कुमार पांड्या ( माजी विद्यार्थी एनएसडी 2001 बॅच ) यांच्या आकस्मिक मृत्यूची बातमी अतिशय दुःखदायक आहे. एनएसडी परिवार त्यांच्या प्रति श्रद्धांजली अर्पण करत आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.’
फुप्फुसाच्या कर्करोगामुळे पांड्या यांचे निधन झाले. गेले काही महिने ते या आजाराशी लढत होते. एनएसडीचे माजी विद्यार्थी असणाऱ्या भुपेश पांड्या यांच्या जाण्याने त्यांच्या सहकलाकारांनी देखील दु:ख व्यक्त केले आहे. अभिनेता मनोज वाजपेयी, गजराज राव यांनी भुपेश यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
काही दिवसांपूर्वी भुपेश यांच्या मित्राने त्यांच्या उपचारासाठी निधी आवश्यक असल्याचे शेअर केले होते. त्यांच्या कॅन्सरवरील उपचारासाठी हा निधी आवश्यक होता. अभिनेता मनोज वाजपेयीने देखील याबाबत ट्वीट शेअर केले होते. या फंडरेजर वेबसाइटनुसार गजरावर राव यांनी 25 हजारांची मदत केली होती. (हे वाचा- हिमेशनंतर अमिताभ यांच्याबरोबर दिसणार होती राणू मंडल, या कारणामुळे केलं बाहेर) भुपेश यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार ते कॅन्सरच्या चौथ्या स्टेजमध्ये होते. अहमदाबादमधील अपोलो हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. भुपेश यादव यानी विकी डोनर, हजारो ख्वाहिशे ऐसी यामध्ये काम केले होते.