बवाल
मुंबई, 27 जुलै : बॉलिवूडचे चित्रपट आणि वाद हे समीकरण जुनंच आहे. बॉलिवूडच्या चित्रपटांमधील वादग्रस्त दृश्ये, संवाद याविषयी प्रेक्षक नेहमीच जागरूक असतात. कुठल्याही चित्रपटात असं काही आढळलं तर त्याला सोशल मीडियावर जोरदार विरोध होतो आणि तो चित्रपट बॅन होण्याची मागणी होते. नुकतंच आदिपुरुष चित्रपटाबद्दल निर्माण झालेला वाद याचंच ताजं उदाहरण आहे. आता त्यानंतर बॉलिवूडच्या अजून एका चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी होतेय. हा चित्रपट आहे वरुण धवन आणि जान्हवी कपूरचा ‘बवाल’. हा चित्रपट बॅन करण्याची मागणी का होतेय, काय आहे त्यामागचं कारण जाणून घ्या. नितेश तिवारी दिग्दर्शित वरुण धवन आणि जान्हवी कपूरचा ‘बवाल’ चित्रपट 21 जुलै रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात पती-पत्नीची सुंदर लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे, पण त्यामध्येच दुसऱ्या महायुद्धाचीही कथा जोडण्यात आली आहे. आता हा चित्रपट OTT वरून हटवण्याची मागणी होत आहे.
या चित्रपटातील आधुनिक नातेसंबंध आणि दुसऱ्या महायुद्धादरम्यान अॅडॉल्फ हिटलरने केलेले अत्याचार यांच्यात तुलना केली आहे. त्यादरम्यान दाखवण्यात आलेल्या काही सीन्सवर आता वाद निर्माण झाला आहे. ज्यू मानवाधिकार संघटनेने हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवरून हटवण्याची मागणी केली आहे. यासोबतच नितेश तिवारी यांच्यावर त्या युद्धात मारल्या गेलेल्या ज्यूंना चुकीच्या पद्धतीनं दाखविल्याचा आरोप केला आहे. Tejashree Pradhan : ‘मी येतेय…’ तेजश्री प्रधाननं केली मोठी घोषणा; चाहते करतायत शुभेच्छांचा वर्षाव ‘बवाल’ चित्रपटात एक सीन आहे ज्यात वरुण (अजय) आणि जान्हवी (निशा) परदेशात सहलीवर जातात. ते त्या ठिकाणी पोहोचतात जिथे दुसरे महायुद्ध झाले होते. एका दृश्यात जान्हवी ‘आपण सगळे काही प्रमाणात हिटलरसारखे आहोत ना?’ असे म्हणताना दिसत आहे. मग ती म्हणते, ‘प्रत्येक नाते त्याच्या ऑशविट्झमधून जाते.’ चित्रपटात गॅस चेंबरमध्ये दाखवण्यात आलेल्या क्रौर्याचा वापर दोघांमधील संबंध बदलण्यासाठी करण्यात आला असून त्यावर आक्षेप घेण्यात येत आहेत. याच कारणामुळे रब्बी अब्राहम कूपर, सायमन विसेन्थल सेंटरचे असोसिएट डीन आणि ग्लोबल सोशल ऍक्शनचे संचालक, यांनी हा चित्रपट त्वरित OTT वरून काढण्यात यावा अशी मागणी केली आहे. “या चित्रपटाद्वारे नितेशने हिटलरच्या राजवटीत मारले गेलेल्या साठ लाख ज्यू आणि इतर लाखो लोकांच्या स्मृतीचा अनादर केला आहे’’ अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. याबाबत पिंकव्हिलाशी बोलताना नितेश तिवारीने आपल्या चित्रपटाचा बचाव करताना सांगितले की, ‘ज्याप्रकारे काही लोकांनी ऑशविट्झ सीक्वेन्स पाहिला त्यामुळे मी निराश झालो आहे. मला कोणत्याही प्रकारे कुठलाही सिन असंवेदनशीलपणे दाखवायचा नव्हता, अज्जू आणि निशा यांनी ऑशविट्झमध्ये जे पाहिले त्यामुळे ते पूर्णपणे अस्वस्थ झाले. तिथेच त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.’’ असं चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणाले होते.