नाना पाटेकर
मुंबई, 12 फेब्रुवारी-
व्हॅलेंटाइन्स डे अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. सर्वत्र प्रेमाचं वारं वाहताना दिसून येत आहे. दरम्यान लोक बॉलिवूडच्या अनके लव्हस्टोरींची आठवण काढताना दिसून येत आहेत. 90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये अनेक लव्हस्टोरी चर्चेत होत्या. आज आपण जी लव्हस्टोरी पाहणार आहोत ती 1996 मध्ये सुरु झाली होती. परंतु पुढे काही वर्षांतच ती लव्हस्टोरी कायमची संपुष्ठात आली होती. विशेष म्हणजे या जोडीमध्ये चार-पाच वर्षांचं नव्हे तर 20 वर्षांचं अंतर होतं. हे जोडपं इतर कोणी नसून मराठमोळे अभिनेते नाना पाटेकर आणि बॉलिवूड सुंदरी मनिषा कोईराला होय. या दोघांच्या लव्हस्टोरीची आजची चर्चा होते. नाना पाटेकर आणि मनिषा कोईराला या जोडीला ऑन स्क्रीन ते ऑफ स्क्रिनपर्यंत लोकांनी खूप प्रेम दिलं आहे. या जोडीने बॉलिवूडला ‘खामोशी द म्युझिकल’, ‘अग्निसाक्षी’ ‘युगपुरुष’ असे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. मनीषा कोईराला-नाना पाटेकर यांची लव्हस्टोरी ही बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय लव्हस्टोरींपैकी एक आहे. या दोघांची पहिली भेट ‘अग्निसाक्षी’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. हा चित्रपट 1996 मध्ये आला होता. 1970 मध्ये काठमांडू, नेपाळमध्ये जन्मलेली मनीषा त्या दिवसात केवळ 27 वर्षांची होती. तर महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा येथे 1951 मध्ये जन्मलेले नाना 45 वर्षांचे होते. नाना आणि मनीषा यांच्यात 20 वर्षांचं अंतर होत. हे देखील त्यांचं लग्न न होण्यामागचं प्रमुख कारण असल्याचं मानलं जातं. (हे वाचा:
Valentine’s Week 2023: ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात आकंठ बुडाले होते विवाहित महेश मांजरेकर; का झाला नात्याचा शेवट?
) मनीषाला भेटण्यापूर्वी नाना आधीच विवाहित होते आणि एका मुलाचे वडील होते. तरीही मनीषा आणि नाना यांच्यात खूप प्रेम होतं. मनीषाने आपल्याच्यापेक्षा 20 वर्षांनी मोठ्या असलेल्या नानांमध्ये परिपक्व प्रेम शोधलं होतं. दुसरीकडे नानांना मनीषा खूप गोड आणि निरागस वाटत होती. एकंदरीत प्रेमात जी स्थिरता असायला हवी ती स्थिरता मनीषाला नाना पाटेकर यांच्यामध्ये दिसली. परंतु हे नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. नानांना आपल्या पत्नीला घटस्फोट द्यायचा नव्हता, म्हणून त्यांनी हे नातं तोडल्याचं सांगितलं जातं. मनिषाशी ब्रेकअप झाल्यानंतर कित्येक वर्षांनंतर फिल्मफेअरला दिलेल्या एका मुलाखतीत नानांनी आपल्या आणि मनिषाच्या ब्रेकअपबाबत संवाद साधला होता. यावेळी त्यांनी सांगितलं की, ते मनीषाला किती मिस करतात. त्यादरम्यान त्यांनी अभिनेत्रीची तुलना कस्तुरी मृगशी केली होती. मीडिया रिपोर्टनुसार, नाना म्हणाले, ‘ती सर्वात संवेदनशील अभिनेत्री आहे. ती एका कस्तुरी मृगासारखी आहे. तिला अजूनही कोणाशीही जुळवून घेण्याची गरज नाही. तिच्याकडे हे सर्व आहे आणि ते गरजेपेक्षा अधिक आहे.
यावेळी बोलताना नाना पाटेकर यांनी असंही म्हटलं होतं की, ‘ती आज स्वत:सोबत काय करत आहे? हे मी जेव्हा पाहतो तेव्हा मला माझे अश्रू आवरता येत नाहीत. कदाचित आज माझ्याकडे तिच्याबद्दल बोलायला काही नाहीय! ब्रेकअप हा आयुष्यातील खूप कठीण काळ आहे. यातील वेदना काय असतात हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला ते स्वतः अनुभवावं लागेल. मी ज्या दु:खातून गेलोय त्याचं मी वर्णन करू शकत नाही. याबद्दल माझ्याशी बोलू नका. मला मनीषाची आठवण येते’.