मुंबई, 23 नोव्हेंबर- काही दिवसांपूर्वी झी मराठी वाहिनीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिका प्रसिद्ध होती. त्यातली नायिका राधिका मसाले नावाने उद्योग सुरू करते आणि नवऱ्यापेक्षा श्रीमंत होते, असं दाखवण्यात आलं होतं. राधिकाचं काम करणाऱ्या अनिता दातेला मसाले विकून मोठी उद्योजिका झालेली दाखवल्याने काही काळ ट्रोलही करण्यात आलं होतं. पण झी वर नव्याने सुरू झालेल्या ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ (Marathi serial tuzya mazya sansarala ani kay hava) या मालिकेत झळकलेली एक अभिनेत्री खऱ्या आय़ुष्यात खरंच एक यशस्वी उद्योजिका आहे आणि तेही मसाले विकून उद्योजिका झालेली आहे. ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’, ही मालिका हळूहळू प्रेक्षकांच्या पसंतीस उतरू लागली आहे. सुरुवातीला मालिकेतील भली मोठी स्टार कास्ट पाहून कोणती भूमिका कोणता कलाकार साकारतोय हेच समजण्यासाठी खूप वेळ गेला असा नाराजीचा सूर प्रेक्षकांकडून पाहायला मिळाला होता. अमृता पवार आणि हार्दिक जोशी या मुख्य कलाकारांना मिळालेली सह कलाकारांची साथ देखील तितकीच मोलाची आहे. या मालिकेत विसरभोळ्या नानी काकींची भूमिका अभिनेत्री “पूनम चव्हाण देशमुख” (poonam chavan) यांनी साकारली आहे. यांचा अभिनय तर सर्वांनी पाहिला आहे मात्र याशिवाय त्यांचा व्यवसाय देखील आहे. अभिनया व्यतिरिक्त पूनम चव्हाण या व्यवसाय क्षेत्रात देखील उतरलेल्या पाहायला मिळतात. “स्वादम” या नावाने त्यांचा खाद्य पदार्थांचा व्यवसाय आहे. उन्हाळी वाळवणं तसेच गाईचं तूप, ढोकळा पीठ, केळी वेफर्स, दिवाळी फराळ, आवळा कँडी, सांबर मसाला असे पदार्थ त्यांच्या या व्यवसायात समाविष्ट केले आहेत. त्यांच्या या पदार्थांना भरपूर मागणी देखील आहे. त्यांच्या इन्स्टावर या पादार्थांचे काही फोटो देखील त्यांनी शेअर केले आहेत. वाचा : आदिराज आणि मीरा यांच्यामध्ये आलेली ही तिसरी व्यक्ती कोण? तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं ही पूनम चव्हाण यांची पहिली टीव्ही मालिका आहे. परंतु झी वाहिणीसारखा मोठा प्लॅटफॉर्म मिळणे हे प्रत्येक कलाकारांचे स्वप्न असते असेच स्वप्न उराशी बाळगणाऱ्या पूनम चव्हाण त्यांनी टीव्ही क्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी मालिकेत साकारलेली नानी काकी प्रेक्षकांना देखील आवडू लागली आहे. पूनम चव्हाण यांनी मुंबईतील एसएनडीटी युनिव्हर्सिटीमधून पदवीचे शिक्षण घेतले आहे.
लग्नानंतर त्या नाशिकला आपल्या कुटुंबासोबत स्थायिक झाल्या . लहानपणापासूनच नाट्यछटा, एकांकिका तसेच नाट्यस्पर्धांमध्ये त्या सहभागी व्हायच्या. पुढे राज्यनाट्य स्पर्धांमध्ये त्यांच्या अभिनयाची सातत्याने दखल घेतली गेली यातूनच सलग तीन वर्षे त्यांनी उत्कृष्ट अभिनयाची प्रमाणपत्रे मिळवली.