केरळच्या मशिदीत हिंदू जोडप्याचं लग्न
मुंबई, 5 मे- ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटाचा ट्रेलर समोर येताच नव्या वादाला तोंड फुटलं आहे. इतकंच नव्हे तर वातावरण पाहून तामिळनाडूमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. हिंदू मुलींचं अपहरण करुन त्यांना इस्लाम धर्म स्वीकारायला लावत दहशतवादी संघटनांमध्ये त्यांची भरती केल्याचं या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे अनेक इस्लामिक संघटनांनी यावर आक्षेप घेतला आहे. एकीकडे हा सर्व वाद सुरु असताना दुसरीकडे एका हिंदू जोडप्याने चक्क मशिदीत लग्नगाठ बांधत हिंदू-मुस्लिम ऐक्याचं नवं उदाहरण प्रस्थापित केलं आहे. सुदिप्ता सेन यांनी ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. या ट्रेलवरुन सोशल मीडियावर चांगलाच वाद रंगला आहे. यामध्ये दाखविण्यात आलं आहे की, केरळमध्ये 32 हजार महिलांचं अपहरण त्यांना इस्लाम धर्माचा स्वीकार करायला लावला. आणि त्यांनतर त्यांना दहशतवादी संघटनांमध्ये पाठवण्यात आलं. या कथेमुळे सोशल मीडियावर एकच खळबळ माजली आहे. सोशल मीडियावर दोन गट पडलेले दिसून येत आहेत. काहींनी या चित्रपटावर आक्षेप घेतला आहे तर काहींनी पाठिंबा दर्शवला आहे. (हे वाचा: Salman Khan: ‘तू अनेकांचं करिअर खराब केलंस’, आरोपांवर सलमान खानचं Shocking उत्तर ) हा सर्व वाद सुरु असताना दुसरीकडे मात्र एक दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. केरळमध्ये एका हिंदू जोडप्याने चक्क मशिदीत लग्नगाठ बांधत सर्वांचं लक्ष वेधलं आहे. या व्हिडीओची सध्या जोरदार चर्चा होत आहे. या व्हिडीओवर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
प्रसिद्ध गायक-संगीतकार एआर. रहमान यांनी नुकतंच आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ एका नवदाम्पत्याचा आहे. या हिंदू जोडप्याने केरळमधील एका मशिदीत लग्न केल्याचं समोर आलं आहे. हा सुंदर व्हिडीओ शेअर करत एआर. रहमान यांनी लिहलंय, ‘उत्कृष्ट…. मानवतेवर असं बिनशर्त प्रेम असलं पाहिजे’.
मिळालेल्या माहितीनुसार, या व्हिडीओमध्ये असं सांगितलं जात आहे की, ज्या जोडप्याने मशिदीत लग्न केलं आहे. त्यांचं नाव अंजु आणि शरत असं आहे. माहितीप्रमाणे अंजु या मुलीच्या आईची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने त्या कुटुंबाने मस्जिद कमिटीकडे लग्न कार्यासाठी मदत मागितली होती. या मदतीला आनंदाने मान्य करत मस्जिद कमिटीने अंजुच्या लग्नसाठी मशिदीतच लग्नाचा मंडप उभारत लग्नकार्य पार पाडलं आहे. विशेष म्हणजे मशिदीत पार पडलेला हा विवाहसोहळा पूर्णपणे हिंदू विधींसह संपन्न झाला आहे.