मुंबई, 15 मे- अभिनेत्री तेजस्विनी पंडित ( Tejaswini Pandit ) आणि अभिनेत्री प्राजक्ता माळीची (Prajakta mali ) लवकरच एक बोल्ड सिरीज प्लॅनेट मराठीवर येते आहे. तेजस्विनी पंडित आणि अभिनेत्री प्राजक्ता माळीने या सीरिजचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. तेजस्विनीचा आणि प्राजक्ताचा देखील यामध्ये बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. हा टीझर ( RaanBaazaar Teaser ) सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. मराठीत पहिल्यांदाच आशी बोल्ड सिरीज भेटीला येत आहे. टीझरच्या बॅकग्राऊंडमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणाऱ्या माहिलेचा आवाज ऐकू येत आहे. यावेळीच तेजस्विनीची एंट्री होती. तेही सिगरेट ओढताना आणि पाठोपाठ लगेच ती तिचे कपडे उतरवताना दिसते आहे. दिग्दर्शक अभिजीत पानसे यांनी ही सीरिज दिग्दर्शित केली आहे. 20 मे पासून ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
तेजस्विनीने हा टीझर शेअर करत म्हटलं आहे की, ‘एकदा लोकांची सेवा करून पाहिली… एकदा प्रेमात त्याग करूनही पाहिला… एकदा बदलाही घेतला… आता मात्र फसत चाललीय… सत्तेच्या जाळ्यात अडकलेल्या एका फुलपाखरासारखी…,’ असं तिने हा टीझर शेअर करताना लिहिलं आहे. वेबविश्वाला हादरवून टाकणारा ‘रानबाजार’, ट्रेलर येतोय 18 मे ला, असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
प्राजक्ता माळी हिने देखील ‘रानबाजार’चा दुसरा टीझर शेअर करत म्हटलं आहे की, ‘प्रत्येक कलाकाराला आपल्या कारकिर्दीत विविधांगी भूमिकांमध्ये झळकण्याची, समाजात अस्तित्वात असणारी विविध पात्रं साकारण्याची, सतत काहितरी नवं करण्याची इच्छा असते. मी त्याला अपवाद नाही. लहानपणापासून स्मिता पाटील, रंजना यांना बघत मोठी झाले, (मी त्यांच्याइतकी मोठी नक्कीच नाही.) पण त्यांच्या कारकिर्दीतून प्रेरीत होऊन आणि तुम्हां मायबाप रसिक प्रेक्षकांवर विश्वास ठेवून केलेला हा प्रयत्न.’