सोनू निगम
मुंबई, 21 फेब्रुवारी- काल रात्री चेंबूर येथील एका लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान बॉलिवूड गायक सोनू निगम ला धक्काबुक्की करण्यात आली आहे. शिवसेना आमदार प्रकाश फातर्पेकर यांच्या मुलाने सोनूसोबत हा प्रकार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सर्व प्रकरणात सोनू निगमच्या टीममधील दोन लोकांना दुखापत झाल्याचं समोर आलं आहे. दरम्यान आता हा नेमका प्रकार काय होता आणि काल रात्री नेमकं काय घडलं? हे आता स्वतः सोनू निगमने स्पष्ट केलं आहे. मुंबईतील चेंबूर याठिकाणी झालेल्या कार्यक्रमादरम्यान शिवसेना आमदार प्रकाश फातर्पेकर यांचा मुलगा स्वप्नील प्रकाश फातर्पेकर हा सोनू निगमसोबत जबरदस्तीने सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत होता. यादरम्यान बाचाबाची झाली. रिपोर्टनुसार, आमदाराच्या मुलाने सोनूची मॅनेजर सायरासोबतही गैरवर्तन केलं आहे. सध्या हे प्रकरण चांगलंच तापलं आहे. (हे वाचा: सोनू निगमला आमदाराच्या पुत्राने केली धक्काबुक्की, मुंबईत कॉन्सर्टवेळी घटना ) मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोनू निगमने आता या प्रकरणावर मौन सोडत नेमकं काय घडलं? हे उघड केलं आहे. याबाबत बोलताना सोनू निगम म्हणाला, ‘काहीही घडलेलं नाहीय. माझा कॉन्सर्ट संपल्यानंतर मी स्टेजवरुन खाली निघालो होतो. दरम्यान स्वप्नील नावाच्या मुलाने मला पकडलं आणि सेल्फी घेण्याचा प्रयत्न करु लागला. मला त्याच नाव सर्व प्रकार झाल्यानंतर समजलं. या सेल्फी आणि व्हिडीओच्या जगात लोक काहीही समजून घ्यायला तयार नसतात.
त्या मुलाने जबरदस्ती सेल्फी घेण्याचा प्रयत्न करताच हरिप्रकाश माझ्या मदतीसाठी पुढे आले. पण त्यांनाही त्याने धक्का दिला. त्यामुळे आम्ही दोघेही खाली पडलो. तेच व्हिडीओमध्ये दिसत आहे. दरम्यान आम्हाला वाचवायला रब्बानी पुढे सरसावले. रब्बानीनासुद्धा त्याने धक्का दिला. सुदैवाने ते वाचले. कारण मागे काही अवजड वस्तू असती तर त्यांचं डोकं त्यावर आपटलं असतं. आणि कदाचित मृत्यूही झाला असता.
सोनू निगमच्या टीममधील दोघा जखमींना रुग्णलयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान सोनू निगमने चेंबूर पोलीस ठाण्यात या घटनेबाबत गुन्हा दाखल केला आहे. सोनू निगमच्या कॉन्सर्टमधील हा प्रकार सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. गायकाचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.