मुंबई, 14 जून : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येमुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. सुशांतच्या जाण्याने बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हळहळ व्यक्त केली आहे. अभिनेता रितेश देशमुखने ट्विटरवरून आपला शोक व्यक्त केला आहे. खूप मोठा धक्का बसल्याचं ट्वीट रितेशने केले आहे.
मुंबईच्या वांद्रे येथील राहत्या घरी सुशांतनं आत्महत्या केली. सुशांतसिंग राजपूत एकता कपूरच्या पवित्र रिश्ता या मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आला. ‘काय पो छे!’ या चित्रपटात सुशांत मुख्य अभिनेता होता. महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्यावर चित्रित करण्यात आलेल्या एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी या सिनेमातही काम केलं होतं. संगीतकार विशाल दादलानीने सुद्धा सुशांतच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर दु:ख व्यक्त केले आहे.
सुशांतने साकारलेला धोनी नेहमीच सर्वांच्या स्मरणात राहणारा आहे. सायना नेहवालने देखील यासंदर्भात ट्वीट करत दु:ख व्यक्त केले आहे. ‘ऑनस्क्रीन धोनी’ तु नेहमी आठवणीत राहशील असं ट्वीट सायनाने केले आहे. त्याचप्रमाणे विरेंद्र सेहवागने देखील सुशांतच्या अशा अचानक जाण्याने दु:ख व्यक्त केले आहे.
सुशांतबरोबर काम केलेल्या तसंच इतरांनीही त्याच्या जाण्याबाबत दु:ख व्यक्त केले आहे. मालिकांमधून अभिनय क्षेत्राकडे वळलेल्या सुशांतने बॉलिवूडमध्ये त्याचे एक स्थान निर्माण केले होते.