मुंबई, 2 मे : टीआरपीच्या रेसमध्ये टिकून राहण्यासाठी विहिन्या नवीन प्रयोग करताना दिसतात. तसं पाहता टीआरपीच्या रेसमध्ये स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिका नंबर वनवर आहे. आता झी मराठी देखील या रेसमध्ये नंबर मारण्यासाठी लवकरच एक नवीन मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘सत्यवान सावित्री’ ही पौराणिक मालिका ( satyavan savitri new serial ) येत्या 12 जूनपासून झी मराठी वाहिनीवर प्रसारित केली जाणार आहे. ‘सत्यवान सावित्री’ या मालिकेचा प्रोमो व्हिडिओ देखील समोर आला आहे. गोष्ट एका स्त्रीच्या ईच्छा शक्तीची, गोष्ट सावित्रीच्या दृढ निश्चयाची. अशा या सावित्रीचा प्रवास मालिकेतून उलगडताना दिसणार आहे. मालिकेत सत्यवान सावित्रीची बालपणीची भूमिका बालकलाकार राधा धारणे ही साकारताना दिसत आहे. राधा धारणे हिने अभिनित केलेली ही दुसरी मालिका आहे. कारण या मालिकेअगोदर राधाने सोनी मराठी वाहिनीवरील आनंदी हे जग सारे या मालिकेत आनंदीची भूमिका साकारली होती. सत्यवान सावित्री या मालिकेत ती बालपणीची सावित्रीची भूमिका साकारत आहे. त्यामुळे राधा साठी ही मालिका खूप खास ठरणार आहे.
झी मराठी वाहिनीवरील ‘मन झालं बाजींद’ या मालिकेच्या वेळेत सत्यवान सावित्री ही मालिका प्रसारित केली जाणार आहे. त्यामुळे ‘मन झालं बाजींद’ झाली ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार की काय..अशी चर्चा देखील सोशल मीडियावर रंगली आहे. शिवाय मागच्या काही दिवसांपासून मन झालं बाजींद या मालिकेत सतत तेच तेच घडत असल्याने मालिका सतत सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. त्यामुळे मालिका खरचं निरोप घेणार का असा देखील प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. मात्र मालिकेच्या निर्मात्यांकडून याबद्दल कोणतीच अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.